लेमूर : स्तनी वर्गातील ⇨ नरवानर गणाच्या लेमुरिडी कुलातील प्राणी.⇨लोरिसचे अगदी जवळचे नातेवाईक असलेले हे प्राणी वनचर असून झाडांवर, बांबूंच्या जाळ्यात किंवा लव्हाळ्यांच्या बेटात राहतात. यांच्या सहा प्रजाती आणि सोळा जाती असून त्या फक्त मादागास्कर आणि त्यालगतच्या कोमोरो बेटांत आढळतात.
लेमूर मध्यम आकाराच्या उंदरापासून तो लहान कुत्र्याएवढे असतात. शरीर सडपातळ व पाय काटकुटे असतात अंगावर लोकरीसारखे जाड पण मऊ व दाट केस असतात शेपटी लांब व झुपकेदार असते निरनिराळ्या जातींत शरीराचे रंग वेगवेगळे असतात चेहरा लांबोडका असून कोल्ह्याच्या चेहऱ्यासारखा दिसतो. डोळे मोठे आणि किंचित बाजूला असतात कान आखूड किंवा मध्यम लांबीचे व अंशतः केसाळ असतातदात एकंदर ३६ असतात पुढच्या पायांपेक्षा मागचे पाय लांब असून काही जातींमध्ये मागच्या पायांच्या दुसऱ्या बोटावर नखर (नखी) असतो इतर बोटांवर सपाट नखे असतात तळहात आणि तळपायांवर जाड गाद्या असतात.
लेमूर झाडांवर राहणारे असले, तरी जमिनीवर उतरतात. अंगाभोवती आली शेपटी गुंडाळून हे दिवसभर झाडावर झोपलेले असतात आणि रात्री भक्ष्य शोधण्याकरिता बाहेर पडतात. यांची नेहमी टोळकी असून प्रत्येकात ६-२० प्राणी असतात.
लेमूर चपळ आणि चुळबुळे असून पुष्कळदा झाडांच्या फांद्यांवर उड्या मारताना दिसतात.जमिनीवर त्यांना चालता, धावता व उड्या मारता येतात कधीकधी ते दोन पायांवरही चालतात. त्यांचा आवाज कर्कश, शीळ घातल्यासारखा किंवा किंकाळ्या फोडल्यासारखा असतो. प्रतिस्पर्ध्यांशी झुंजताना ते आपल्या हातांचा आणि दातांचा उपयोग करतात.
लेमुरांचे अन्न मिश्र असते कीटक, लहान पक्षी व त्यांची अंडी, सरडे, पाली, फळे, पाने इ. यांचे भक्ष्य होय फळे यांना विशेष आवडतात.
मादीची गर्भधारणा वर्षातून एकदाच होते गर्भावधी १४६ दिवसांचा असतो दर खेपेस मादीला एक किंवा दोन पिल्ले होतात ती तिच्या पाठीला किंवा छातीला चिकटून राहतात आणि काही काळानंतर तिच्या मागोमाग हिंडतात.
लेमूर निरुपद्रवी प्राणी असून सहज माणसाळतात. मादागास्करमधील काही आदिवासी विविध अंधश्रद्धांमुळे लेमुरांची शिकार करीत नाहीत, तर काही आदिवासी त्यांचे मांस खातात. लेमूर प्रसंगी शेतीचे नुकसान करतात पण तसे ते फारसे उपद्रवी नाहीत.
लेमुरांची शरीररचना व वर्तन यांतील आदिमपणाच्या लक्षणांवरून ते नरवानर गणातील आदिम प्राणी आहेत हे दिसते. मेंदूतील गंधकेंद्रे उत्तम विकास पावलेली असतात व डोळे डोक्याच्या दोन्ही बाजूंना सरकल्यामुळे द्विनेत्री दृष्टी शक्य नाही. मोठा मेंदू आकारमानाने लहान असतो.
सध्या त्यांचा प्रसार मर्यादित असला, तरी इओसीन कल्पात (सु. ५.५ कोटी वर्षांपूर्वी) त्यांचा प्रसार यूरोप व उत्तर अमेरिकेत सर्वत्र होता.
लेमूरांचे काही प्रमुख प्रकार पुढील होत.
रिंग-टेल्ड लेमूर : (लेमूर कट्टा). पश्चिम मादागास्कराच्या खडकाळ भागात हा राहतो. हा मांजराएवढा असून याच्या शेपटीवर एकाआड एक पांढरे व काळे वलयाकार पट्टे असतात. याचा रंग तपकिरी करडा असतो. हा खडकांच्या मोठ्या कपारीत व गुहांत राहतो. हा दिवाचर आहे.
रफ्ड लेमूर : (ले. व्हेरिॲगॅटस). हा आकारमानाने मोठा आणि सुंदर असतो. मानेच्या दोन्ही बाजूंना आयाळीप्रमाणे लांब केसांचे झुपके असून अंग काळ्या व पांढऱ्या रंगाचे असते. रोज सकाळी हा दोन पायांवर उभा राहून आपले दोन्ही हात सूर्याकडे पसरतो. जणू काही हा सूर्याची आराधनाच करीत असावा असे वाटते. हा निर्वंश होण्याच्या मार्गावर आहे.
तपकिरी लेमूर : (ले. फल्व्हस). हे प्राणी मळकट रंगाचे असतात. मंगूस लेमूर (ले. मंगोस) व लाल पोटाचा लेमूर (ले. रुब्रिव्हेंटर) यांच्यासारख्या इतर जातींपासून ते वेगळे ओळखणे अवघड असते. मायक्रोसेबस म्युरिनस ही लेमुरिडी कुलातील सर्वांत छोटी जाती आहे. हिचे प्राणी उंदरापेक्षा थोडे मोठे, निशाचर असून त्यांच्या हालचाली खारीसारख्या असतात. हे किडे खाऊन उपजीविका करतात.
इंड्री : (इंड्री इंड्री). हा सगळ्यांत मोठा लेमूर असून मादागास्करच्या पूर्व किनाऱ्यावरील अरण्यांत आढळतो. चेहऱ्यावर केस नसतात. शेपूट अगदीच लहान म्हणजे सु. ५ सेंमी. लांब असते.
पहा : आय-आय नरवानर गण लोरिस.
डाहाके, शा.ल. जमदाडे, ज.वि.
“