लेपचा भाषा : (रोङ्‌ भाषा). लेपचा-भाषक लोक हे सिक्कीमच्या मूळच्या प्राचीन रहिवाशांपैकी एका समूहातील आहेत. लेपचा बोलणारे लोक पश्चिम भूतान, पूर्व नेपाळ आणि पश्चिम बंगालमध्ये दार्जिलिंग जिल्हा येथेही आढळतात. लेपचा बोलणाऱ्यांची संख्या भारताच्या १९८१ च्या जनगणनेप्रमाणे २६,०७८ इतकी आहे (नेपाळमधील लेपचा-भाषक यात नाहीत). लेपचा भाषिक स्वतःला ‘रोङ्‌’ असे म्हणवतात. ‘लेपचा’ शब्दाचा वापर नेपाळी लोकांनी केला आहे. याचा मूळ उच्चार ‘लप्‌-चा’ किंवा ‘लप्‌चे’ आहे. ‘लप्‌’ याचा अर्थ ‘वाणी’ आणि ‘चा’ याचा अर्थ ‘खालच्या दर्जाचा’. लेपचा हे नाव भाषा आणि लोक या दोहोंनाही लागते.   

लेपचा-भाषकांचा बौद्ध धर्माशी पूर्वीपासून संबंध आहे आणि तिबेटी लोकांनी जवळजवळ चौदाव्या किंवा पंधराव्या शतकापासून त्यांना सिक्कीमपासून दूरच्या भागात रेटण्याला आरंभ केला. म्हणूनच तिबेटी भाषेचा लेपचा भाषेवर प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष परिणाम झाला आहे.

लेपचा भाषेचे स्थानिक देशी साहित्य धार्मिक ग्रंथांत संगृहीत केलेले दिसते. १६८६ मध्ये राजा चाकदोर नमगचे याने लेपचा लिपी तयार केली. ही लिपी तिबेटी लिपीपेक्षा खूपच भिन्न आहे. नंतरचे धार्मिक साहित्य याच लिपीतून लिहिले गेले.

या भाषेत पूर्वप्रत्ययांचा वापर लक्षणीय प्रकारे केला आहे. या प्रत्ययांना तसा काही स्वतःचा अर्थ नाही पण शब्दनिर्मितीस ते साहाय्य करतात. काही वेळा ते लोपही पावतात विशेषतः मोठ्या वाक्यात. ‘आ’ हा पूर्वप्रत्यय क्रियाधातू यांच्या संयोगाने संज्ञा किंवा विशेषण निर्माण करतो. उदा., ‘चोर’=आंबट होणे &gt  ‘आ-चोर’ = आंबट. ‘तीह’ = मोठा होणे / वाढणे, ‘आ-तीह’ = मोठा / वाढलेला.

वचनांत एकवचन, द्विवचन, बहुवचन प्रयोगात आढळते. द्विवचनाच्या बाबतीत ‘न्युम’ प्रत्यय वापरतात. बहुवचनात सजीव पदार्थांना ‘साङ्‌’ व निर्जीव पदार्थांना ‘पाङ्‌’ प्रत्यय लावला जातो. उदा., ‘मा – रो – साङ्‌’ = अनेक माणसे ‘ली-पाङ्‌’ = अनेक घरे. क्रियाधातू आपले रूप बदलत नाहीत. पूर्वप्रत्यय, उत्तरप्रत्यय इत्यादींमुळे काळ वगैरे व्यक्त केला जातो. संयुक्त शब्दांत काही प्रत्ययांचा लोप होतो. निषेधात्मक क्रियेसाठी ‘मा’ हा पूर्वप्रत्यय आणि ‘ने’ हा प्रत्यय लावला जातो. उदा., ‘मा-नोङ्‌-ने’  = आपण दिले नाही. दोन्हीकडे प्रत्यय लावून मध्ये क्रियापद येते. लेपचा भाषेत तिबेटी शब्दांचा व प्रत्ययांचा वापर मोठ्या प्रमाणात आहे. कारण तिबेटशी तिचे फार प्राचीन संबंध आहेत.

संदर्भ : 1. Grierson, G. A. Linguistic Survey of India, Vol. III, Part I, Delhi 1967.

           2. Mainwaring Genl., G. B. Dictionary of Lepcha Language (Revised and completed by

               Grunweldel), Berlin, 1898.

          3. Sprigg, R. K. “The Glottal Stop and Glottal Construction in Lepcha and Borrowing

               Tibetan”, Bulletin of Tibetology, III, I, 5-14, Gangtok, 1966.

          4. Tamsang, K. P. Lepcha-English Encyclopaedic Dictionary, Kalimpong, 1981.

शर्मा, सुहनुराम (हिं.) रानडे, उषा (म.)