लेंटिब्युलॅरिएसी : (दृतिपर्ण कुल). फुलझाडांचे [ →वनस्पति, आवृत्तबीज उपविभाग) एक कुल. याचा समावेश जी. बेंथॅम आणि जे. डी. हूकर यांनी पर्सोनेलीझ गणात इतर ७ कुलांबरोबर आणि ए. एंग्लर व सी. प्रांट्ल यांनी ट्युबिफ्लोरी  गणात इतर १९ कुलांबरोबर केला आहे. नीरब्राह्मी कुलाशी  [ → स्क्रोफ्यूलॅरिएसी ] याचे आप्तसंबंध आहेत. या कुलात सु. २६० जाती व ५ प्रजाती (जे. सी. विलिस : ४ प्रजाती व १७० जाती ए. बी. रेंडेल : ५ प्रजाती व २५० जाती) असून त्यांचा प्रसार उष्ण व समशीतोष्ण कटिबंधांत आहे. सर्वांत जास्त (सु. २००) जाती युट्रिक्युलेरिया प्रजातीत असून त्या सर्व जलवासी आहेत व कीटक पकडून त्यांचा अन्नासारखा उपयोग करण्याकरिता त्यांच्या काही पानांचे रूपांतर गेळ्यात (दृति = गेळा) झालेले आढळते त्यावरून या कुलाला ‘दृतिपर्ण कुल’ या अर्थाचे ब्लॅडरवर्ट फॅमिली हे इंग्रजी नाव पडले आहे. इतर प्रजातींमधील जातींत पानांचे रूपांतर नळीसारख्या अथवा कलशासारख्या कीटकभक्षक अवयवात [ कलशपर्णी गण → सॅरासेनिएलीझ] झालेले आढळते.

या कुलातील वनस्पती वर्षायू किंवा बहुवर्षीयू (एक किंवा अनेक वर्षांत जीवनक्रम पूर्ण करणाऱ्या) असून त्या ओलसर जागी किंवा पाण्यात असतात पाण्यातील जातींना मुळे नसतात त्या सर्व कीटकभक्षक आहेत. पाने एकाआड एक किंवा जमिनीवर गुच्छाप्रमाणे असून जलवासींना दोन प्रकारची पाने असतात बुडलेली पाने अतिशय विभागलेली व काहींचे रूपांतर गेळ्यात झालेले असते आणि वायवी पाने पाण्यावर तरंगणाऱ्या गुच्छ रूपात किंवा लहान खव्वल्यांसारखी असतात, कधी ती नसतातच. ओलसर जमिनीवर वाढणाऱ्या काही जातींत नित्याच्या सामान्य पानांचा एक झुबका व नळीसारखी किंवा कलशसारखी काही पाने जमिनीलगत असतात (उदा., जेन्लिसिया). फुले सच्छद (तळाशी लहान उपांगे असलेली), कधी सच्छदक व एका लांबट दांड्यावर (पुष्पबंधाक्षावर) एकटी किंवा अनेक [ मंजऱ्यांवर किंवा कणिशावंर →पुष्पबंध] येतात. ती द्विलिंगी व अनियमित असून संदले दोन ते पाच, सुटी किंवा काहीशी जुळलेली असतात पाकळ्या (प्रदले) पाच, जुळलेल्या आणि दोन ओठांसारख्या (द्व्योष्ठक) असून खालच्या ओठापासून शुंडिका (लहान सोंडेसारखी पिशवी) निघते किंवा तेथे कोशासारखा भाग असतो. केसरदले चार व त्यांपैकी दोन वंध्य (वांझ) व सर्वच पुष्पमुकुटाच्या तळापासून वर वाढलेली असून परागकोश एक कप्प्याचे (एककोशिक) असतात. दोन ऊर्ध्वस्थ किंजदलांपासून (स्त्री-केसरांपासून) बनलेल्या एका कप्प्याच्या किंजपुटात मध्यवर्ती मुक्त अक्षावर बीजके (कोवळी अपक्व बीजे) बहुधा अनेक (बायओव्ह्युलॅरियात फक्त दोन) व अधोमुखी असतात [→फुल]. फळ (बोंड) सभोवार गोलाकार किंवा उभे तडकून २-४ शकले होतात किंवा ते अनियमितपणे तडकते काहींत (बायओव्ह्युलॅरियात) ते एकबीजी व न तडकणारे असते. बियांत पुष्क (दलिकाबाहेरील  अन्नांश) नसतो आणि त्या बहुधा विपुल व फार लहान असतात. युट्रिक्युलॅरिया प्रजातीतील (इं. ब्लॅडरवर्ट म. गेळ्याची वनस्पती सं.दृतिपर्ण) सु. दोनशे जाती पिंग्विक्युलाच्या (इं. बटरवर्ट) स. ३२ जाती व जेन्लिसियाच्या सु.१२-१५ जातींपैकी युट्रिक्युलॅरियाच्या जाती बहुतेक सर्वत्र, पिंग्विक्युलाच्या जाती उत्तरेकडील उष्ण कटिबंधाबाहेरील प्रदेशांत आणि जेन्लिसियाच्या जाती मध्य अमेरिका, वेस्ट इंडीज, उष्ण व द. आफ्रिका व मॅलॅगॅसी येथे आढळतात. द. अमेरिकेत आणि आस्ट्रेलियाच्या उष्ण भागात पॉलिपोंफोलिक्सच्या दोन जाती आढळतात त्यांचे युट्रिक्युलॅरियाशी साम्य आहे बायओव्ह्युलॅरियाच्या दोन जाती वेस्ट इंडीजमध्ये व उत्तर ब्राझील येथे आढळतात व त्यांचेही युट्रिक्युलॅरियाशी साम्य आहे. पिंग्विक्युला, जेन्लिसिया व पॉलिपोंफोलिक्स यांची गणना स्थलवासी वनस्पतींत करतात इतर सर्व कमीजास्त प्रमाणात जलवासी आहेत. भारतात युट्रिक्युलॅरियाच्या सु. २८ जाती असून पिंग्विक्युलाची एक जाती (पिं. आल्पिना)हिमालयात आढळते. जलजीवपात्रात (शोभेकरिता ठेवलेल्या लहान काचेच्या पेटीत) छंद व शोभा यांकरिताच या कुलातील काही जाती उपयुक्त आहेत. त्यांच्या कीटकभक्षणासंबंधीची माहिती ‘कीटकभक्षक वनस्पती’ या नोंदीत आली आहे.

पहा : कीटकभक्षक वनस्पति स्क्रोफ्यूलॅरिएसी.

संदर्भ :  1. Lawrence, G. H. M.Taxonomy of Vascular Plants, New York, 1965.

2.  Mitra, J. N. An Introduction to Systematic Botany and Ecology, Calcutta, 1964.

3. Rendle, A. B. The Classification of Flowering Plants, Vol.II, Cambridge, 1963.

परांडेकर, शं.आ.