लेऑन : (१) पूर्ण नाव सांतिआगो दि ले ऑन दि लॉ कॅबॅलेरो. निकाराग्वातील (लॅटिन अमेरिका) लेऑन परगण्याचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या १,००,९८२ (१९८५ अंदाज). हे मानाग्वाच्या (निकाराग्वाची राजधानी) वायव्येस सु. ७५ किमी. अंतरावर पॅसिफिक महासागराच्या किनारी भागात वसले असून ते लोकसंख्येच्या दृष्टीने देशातील दुसऱ्या क्रमांकाचे शहर आहे. किनारी लोहमार्ग तसेच रस्ते यांनी ते देशातील महत्त्वाच्या शहरांशी जोडलेले आहे. १५२४ मध्ये फ्रॅन्सिस्को कॉर्दोबा या स्पॅनिशाने मानाग्वा सरोवराच्या काठावर मोमोतोम्बो ज्वालामुखीच्या पायथ्याशी सध्याच्या शहराच्या पश्र्चिमेला ३२ किमी.वर या शहराची स्थापना केली होती. १५५० मध्ये येथे स्पॅनिश राजवटीविरुद्ध पहिला उठाव झाला. १६०९ मध्ये झालेल्या भूकंपात जुने शहर जमीनदोस्त झाले व १६१० मध्ये इंडियनांच्या सुतियाबा या पवित्र ठिकाणी नव्याने शहराची स्थापना करण्यात आली. जुन्या शहराचे अवशेष अजुनही पाहावयास मिळतात. सुतियाबा ही इंडियनांची जुनी राजधानी होती. १८५२ पर्यंत लेऑन निकाराग्वाच्या राजधानीचे ठिकाण होते. ग्रानाडाशी असलेल्या वैरातून पुढे येथे यादवी युद्ध सुरू झाले आणि विल्यम वॉकर या अमेरिकन राजकीय बंडखोराचे या भूमीत आगमन झाले. १९७८-७९ मध्ये येथे सॅन्दिनिस्ता गनीम व लष्कर यांच्यात झालेल्या चकमकीत शहराच्या मध्य भागाचे अपरिमित नुकसान झाले.
शहराच्या पूर्वेकडे ज्वालामुखी टेकड्या असून आजूबाजूच्या प्रदेशात ज्वालामुखीने तयार झालेली सूपीक जमीन आहे. या शेतीप्रधान प्रदेशात मक्यासारख्या अन्नपिकांबरोबर तीळ, कापूस, ऊस यांसारख्या नगदी पिकांचेही उत्पादन होते. पशुपालनाचा व्यवसायही येथे मोठ्या प्रमाणावर चालतो. त्यामुळे लेऑन हे या भागातील शेतमालाच्या व्यापाराचे तसेच त्या मालावर प्रक्रिया करण्याचे महत्त्वाचे केंद्र बनले आहे. या उद्योगात कापसातील सरकी काढणाऱ्या अत्याधुनिक कारखान्यांचा समावेश होतो. त्याशिवाय सिगार, बृट, फर्निचर इत्यादींचे उत्पादनदेखील येथे होते.
लेऑनचे राजकीय दृष्ट्या महत्त्व १८५२ नंतर कमी झाले असले, तरी देशाची बौध्दिक राजधानी म्हणून त्याचे स्थान कायम आहे. या पुरातन शैक्षणिक केंद्रात १८१२ मध्ये विद्यापीठाची स्थापना झाली. या विद्यापीठात कायदा, वैद्यक, दंतविद्या, औषधनिर्माणशास्त्र इ. शाखा आहेत. १९५२ मध्ये त्याला निकाराग्वा राष्ट्रीय विद्यापीठाचा भाग म्हणून मान्यता मिळाली याशिवाय शहरात शाळा आणि इतर शिक्षणसंस्थाही मोठ्या प्रमाणावर आहेत. लॅटिन अमेरिकेतील सुप्रसिद्ध स्पॅनिश कवी रूबेन दारीओ येथेच वाढला व मरण पावला. (१९१६).
शहरावर वसाहतकाळाचा ठसा आजही दिसून येतो. दगडांच्या सरळ रस्त्यांचे जाळे, बरोक शैलीतील विटांच्या भिंतींची एकमजली घरे, लाल रंगाच्या कौलांची छपरे, घराच्या कोपऱ्यात प्रवेशद्वार, कमानी इ. गोष्टी आपल्याला भूतकाळात नेऊन सोडतात. येथील पाच-दालनी कॅथीड्रल (१७४७-१८२५) मध्ये अमेरिकेत सर्वांत मोठे असून त्याचा लोकजीवनावर फार मोठा प्रभाव आहे. शहरात इतरही अनेक चर्च असून त्यांपैकी बारा चर्च वसाहत काळातील आहेत. सॅन यूआन बॅटिस्टा (१५६०-१७०५), ला मर्सिडी (१६८५ मध्ये प्रांरभ), ला रिकलेक्शन (१७९५) ही वसाहत काळातील प्रमुख चर्च होत. लेऑन विभागाच्या बिशपचे वसतिस्थानदेखील या शहरीच आहे.
फडके, वि. शं.
(२) स्पेनच्या वायव्य भागातील लेऑन प्रांताचे शहर. लोकसंख्या १,३७,४०० (१९८६). यूरोपातील हे एक जुने शहर माद्रिदच्या वायव्येस २९० किमी. अंतरावर स्पॅनिश मेसेटा पठारावर वसलेले आहे. इसवी सनाच्या पहिल्या शतकात रोमची सातवी लीजन (पलटण) जेमिना हिने बेर्नेझ्गा व टोरिओ नद्यांच्या संगमावरील मोक्याच्या ठिकाणी याची स्थापना केली. सहाव्या शतकात ते गॉथक लोकांकडे व नंतर मूर लोकांकडे गेले. मूर लोकांकडून नवव्या शतकात ते ॲस्टुरियन राजांनी जिंकून घेतले व स्पॅनिश लोकांकडे आले.ॲस्टुरियन राज्याची येथे तेराव्या शतकापर्यंत राजधानी होतीत्यानंतर हे राज्य कॅस्टील राज्यात विलीन झाले. प्रबोधनकालातील हे यूरोपमधील महत्त्वाचे शहर असून त्याचा राजकीय, आर्थिक व सांस्कृतिक प्रभाव मोठा होता. वास्तुकलेसाठी ते विख्यात आहे. सान ईसीद्रोच्या चर्चच्या छतावरील बाराव्या शतकातील चित्रे आजही सुस्थितीत आहेत. सांता मारिया दि रेग्ला हे गॉथिक कॅथीड्रल चित्रकाचेच्या वास्तुशिल्पाचा स्पेनमधील प्रबोधनकालातील सर्वोत्तम नमुना आहे. या व इतर जुन्या चर्चमुळे हे शहर हौशी प्रवाशांचे आकर्षण स्थळ बनले आहे. विसाच्या शतकाच्या उत्तरार्धात येथील खाणींच्या विकासामुळे व जलविद्यूत्शक्तीच्या पुरवठ्यामुळे उद्योगांचाही झपाट्याने विकास झाला व केवळ २० वर्षांत लोकसंख्या दुप्पट झाली. लोहपोलाद, अन्नप्रक्रिया, मद्य, बेदाणेव कागदनिर्मिती इ. महत्त्वाचे उद्योग येथे आहेत.
डिसूझा, आ. रे.