लूसर्न : स्वित्झर्लंडमधील याच नावाच्या परगण्याचे प्रमुख ठिकाण व एक प्रसिध्द पर्यटन केंद्र (लोकसंख्या ६०,६००-१९८८). हे शहर झुरिकच्या नैर्ॠत्येस सु. ४० किमी. वर रेयूस नदीकाठी आणि लूसर्न सरोवराच्या वायव्य किनाऱ्यावर वसले आहे. त्याचा प्राचीन इतिहास ज्ञात नाही तथापि ७५० च्या सुमारास सेंट लिओदेगर (लुसिएरिआ) याने येथे वेनेडिक्टाइन मठाची स्थापना केली व त्यावरूनच शहरास लूसर्न हे नाव पडले. प्रथम त्याच्या सभोवती मठातील सेवकवर्गाने वसाहती केल्या होत्या. सेंट गॉथर्ड खिंडीतून दळणवळण सुरू झाल्यावर (१२३०) इटलीतील लाँबर्डी व अपर ऱ्हाईन यांदरम्यानच्या व्यापारमार्गावरील हे प्रमुख शहर बनले. मुर्बाकच्या (फ्रान्स) ॲबटने (मठाधिपती) हॅप्सबर्ग घराण्यातील चौथ्या रूडॉल्फला येथील काही भूभाग विकला (१२९१). पुढे १३३२ मध्ये उरी, श्वीझ, व अंटर वॉल्डन यांच्या स्विस संघात लूसर्न सामील झाले आणि त्याने हॅप्सबर्ग सत्तेविरूद्ध स्वातंत्र्यलढा आरंभिला परिणामतः सेम्पॅक येथील लढाईत हॅप्सबर्गच्या राजाचा पराभव होऊन या राज्यसंघास स्वातंत्र्य मिळाले (१३८६). १४१५ मध्ये शासनकर्त्यांनी विद्यमान लूसर्न कँटनमध्ये समाविष्ट असलेला भूप्रदेश कराराने तर काही प्रदेश लष्करी कारवाई अथवा खरेदी करून मिळविला. धर्मसुधारणा आंदोलनाच्या वेळी (१५१७-९८) कॅथलिक कँटनचे नेतृत्व लूसर्नने केले. १५७९ ते १८७४ दरम्यान हे पोपच्या उच्च राजकीय दूताचे (नन्शिओ) प्रमुख केंद्र होते. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस पहिल्या नेपोलियनच्या सैन्याने पादाक्रांत केले (१७९८) आणि त्याचे वैभव संपुष्टात आले. परंतु स्वित्झर्लंडमधील हद्दपारीतील लोकांच्या विनंतीवरून त्यास हेल्वेटिक प्रजासत्ताकाच्या (१७९८-१८०३) राजधानीचा दर्जा देण्यात आला. नेपोलियन सर्वसत्ताधीश झाल्यानंतर (१८०३) हे प्रजासत्ताक संपुष्टात आले आणि लूसर्नला कँटनच्या राजधानीचा दर्जा प्राप्त झाला.
विद्यमान शहराचे रेयूस नदीने दोन भाग केले असून ते सात पुलांनी जोडले आहेत. त्यांपैकी कॅपेल-ब्रुक (१३३३) व स्प्रुअर-ब्रुक (१४०७) हे जुने मध्ययुगीन लाकडी पूल असून त्यांवर छत आहे. छतावर सतराव्या शतकात चितारलेली काही कथात्मक चित्रे सुस्थितीत आहेत. उजव्या तीरावरील प्राचीन शहरात चौदाव्या शतकातील तटबंदी असून त्यावर नऊ प्राचीन मनोरे आहेत. या भागात मध्ययुगीन वास्तू व बोळ तसेच काही जुने चौक आढळतात. यांतील बहुसंख्य वास्तू प्रबोधनकालीन, तर काही घरे बरोकशैलीतील आहेत. त्यांपैकी नगरभवन (१६०२)व त्यातील ऐतिहासिक वस्तुसंग्रहालय, आमरीनहाऊस (१६१७), सेंट पीटर्स चॅपेल (११७८-पुनर्बांधणी १७५०), मॅरिॲहिल्फ चर्च (१६७६) इ. वैशिष्ट्यपूर्ण इमारती आहेत. यांशिवाय पॅरिस येथे १७९२ मध्ये धारातीर्थी पडलेल्या स्विस रक्षकांच्या स्मरणार्थ ए. बी. थॉर्व्हल्डसन या कलाकाराने उभारलेले ‘लायन ऑफ लूसर्न’ हे स्मारक (१८१९-२१), हिमयुगातील अवशेष असलेले ग्लॅसिअर उद्यान (१८७२-७५), तारांगण, स्विस पारंपरिक वेशभूषाविषयक उतेन्बर्ग संग्रहालय, ही या भागातील आणखी काही लक्षवेधी स्थळे होत.
नदीच्या डाव्या किनाऱ्यावर नवीन शहर विस्तारलेले असून त्यात मध्ययुगीन व आधुनिक इमारतींची सरमिसळ आढळते. कँटोनमेंटचे कार्यालय (१५५७-६४), महापालिका (१६७५), चर्चचे मनोरे (१६७७), नगरभवन व वस्तुसंग्रहालय (१९१३), मध्यवर्ती ग्रंथालय (१९५१), काँग्रेस सभागृहइ. काही वास्तू प्रेक्षणीय आहेत. या भागात वाहतूक, संगीत, तांत्रिक शिक्षण, बेकरी, हॉटेल व्यवसायविषयक काही जुन्या शैक्षणिक संस्था आहेत. यांशिवाय विविध शासकीय कार्यालये व न्यायालयांच्या भव्य इमारती याच भागात आढळतात.
समशीतोष्ण हवामान, आल्प्स पर्वताचे सान्निध्य, नयनरम्य परिसर, ऐतिहासिक प्रेक्षणीय वास्तू, हिवाळ्यातील खेळांसाठी प्रसिद्ध असलेले एंजलबर्ग स्थळ, सरोवरालगतच्या जंगलाच्छादित उतारावरील विश्रामधामे आणि सरोवरातील नौकानयन, यांमुळे लूसर्न हे एक प्रमुख पर्यटन केंद्र म्हणून विकसित झाले आहे. याशिवाय रेशीम उद्योग, लाकडावरील कोरीव काम, चित्रकाच व अलंकार बनविणे इ. उद्योगही शहरात चालतात. प्रतिवर्षी वसंतॠतूत येथे आंतरराष्ट्रीय संगीत सभा आयोजित करण्यात येते. लूसर्न हे आल्प्स पर्वताचे प्रवेशद्वार मानतात.
लूसर्न सरोवर स्वित्झर्लंडच्या मध्यभागी लूसर्न शहराच्या आग्नेयीस आल्प्सच्या पायथ्याशी विस्तारलेले आहे. त्याला फ्रेंच व जर्मन भाषांत अनुक्रमे लॅक देस क्कामे-कँटन्स व व्ह्यूअरबाल्ड-स्टाटर्सी असे म्हणतात. दोन्हींचा अर्थ साधारणतः चार अरण्यमय कँटनचे सरोवर असाच आहे. त्याचा आकार अनियमित असून त्याच्या शाखा उतारानुसार असंबद्ध पसरलेल्या आहेत. त्यामुळे त्याच्या आकाराची तुलना ऑक्टोपसच्या असंबद्ध संस्पर्शकांबरोबर करण्यात येते. सरोवराचे क्षेत्रफळ सु. ११४ चौ. किमी. असून सर्वांत जास्त खोली २१५ मी. आहे. सरोवराला स्वित्झर्लंडच्या इतिहासात आगळे महत्त्व आहे. स्वित्झर्लंडमधील सुरुवातीच्या चार कँटनमधील प्रतिनिधी १२९१ मध्ये सरोवराच्या काठी रुट्ली येथील कुरणावर जमले आणि त्यांनी ऑस्ट्रियन हॅप्सबर्ग घराण्याविरूद्ध स्वातंत्र्यलढा देण्याचा करार येथे केला. त्यातून पुढे स्विस संघराज्याची निर्मिती झाली. याशिवाय विल्यम टेल या प्रसिद्ध धनुर्धारीच्या साहसी कथांशीही ह्या सरोवराचा संबंध जोडतात. सरोवराच्या काठी लूसर्नशिवाय वेगिस, फिट्सनाऊ व ब्रुनन ही शहरे वसली असून आल्प्स पर्वतातून येणारी रेयूस नदी सरोवरातून पुढे जाते.
संदर्भ : 1. Gottmann, J. A. Geography of Europe, New York, 1969.
2. Hughes, C. Switzerland, London, 1975.
3. Monkhouse, F. J. The Countries of North-Western Europe, London, 1965.
देशपांडे, सु. र. फडके, वि. शं.