लूनकारस्की, अंतोली व्हासिल्येव्ह्यिच : (२३ नोव्हेंबर १८७५-२६ डिसेंबर १९३३). रशियन साहित्यिक. जन्म पल्टाव्हा येथे. शिक्षण झुरिक विद्यापीठात. तरुण वयातच क्रांतिकारी विचारांनी प्रभावित होऊन बोल्शेव्हिक गटात तो सामील झाला. ह्या गटाच्या ‘फॉरवर्ड’ (इं. शी.) ह्या नियतकालिकाच्या संपादकमंडळावर तो होता. १९०५ साली झालेल्या रशियन क्रांतीच्या वेळी त्याला तुरुंगवास घडला. लेनिनबरोबर त्याचे वैचारिक मतभेद होते तथापि १९१७ मध्ये लेनिनबरोबर त्याने मिळते घेतले. रशियातील महान ऑक्टोबर क्रांतीनंतर त्याला शिक्षण खात्याचा प्रमुख करण्यात आले. क्रांतीनंतरच्या नव्या समाजव्यवस्थेत धर्माचे स्थान काय असावे, ह्या प्रश्र्नाचा तो क्रांतीच्या पूर्वीही सातत्याने विचार करीत होता. ‘आउट-लाइन्स ऑफ ए कलेक्टिव्ह फिलॉसफी’ (१९०९, इं. शी.) हा त्याचा ग्रंथ ह्या संदर्भात निर्देशनीय आहे.

लूनकारस्कीने झारकालीन कला आणि वास्तू ह्यांचा विध्वंस होऊ नये ह्याची काळजी घेतली. ह्या कामी त्याला विख्यात रशियन साहित्यिक मॅक्झिम गॉर्की ह्याचा पाठिंबा आणि सहकार्य मिळाले. त्याने शिक्षणाच्या संदर्भात प्रागतिक आणि प्रयोगशील दृष्टिकोन ठेवला. नाटक आणि रंगभूमी ह्यांत त्याला खूप स्वारस्य होते. ह्या क्षेत्रातही त्याने नवीन कल्पनांना आणि प्रायोगिकतेला उत्तेजन दिले. त्याने स्वतःही काही नाटके लिहिली आहेत. त्यांपैकी तीन नाट्यकृतींचा इंग्रजी अनुवाद थ्री प्लेज (१९२३) ह्या नावाने प्रसिद्ध झालेला आहे.

सोव्हिएट रशियाचा स्पेनमधील राजदूत म्हणून १९३३ साली त्याची नेमणूक झाली. परंतु त्या पदाची सूत्रे घेण्यासाठी स्पेनला जात असताना फ्रान्समधील मेंताँ येथे त्याचे निधन झाले.  

कुलकर्णी, अ. र.