लुलै : (लाली गु. मोटो सरसिओ क. चिगरे, बळुकंबी सं. कृष्णशिरीष लॅ. ॲल्बीझिया ॲमारा कुल-लेग्युमिनोजी उपकुलमिमोजॉइडी) फुलझाडांपैकी [èवनस्पति, आवृतबीज उपविभाग]èशिरीषाच्या ॲल्बीझिया ह्या प्रजातीतील पण भिन्न जातीचा हा पानझडी, बहुशाखित, लहान व सु. २.५-३ मी. उंच व ०.६-०.९ मी. घेर असलेला शिंबावंत (शेंगा येणारा) वृक्ष महाराष्ट्र, गुजरात व कर्नाटक येथील रुक्ष जंगलांत व मध्य भारतात आढळतो. श्रीलंका आणि पूर्व आफ्रिकेचा उष्ण कटिबंधातला भाग इकडेही याचा प्रसार आहे. ॲल्बीझिया प्रजातीत एकूण सु. ५० जाती असून त्यांपैकी सु. १२ भारतात आहेत. याच्या कोवळ्या फांद्यांवर पिवळट करड्या रंगाची लव असते. साल गडद रंगाची, गुळगुळीत, पातळ आणि खवलेदार असते. पाने संयुक्त, दोनदा पिसासारखी विभागलेली, काळ्या व पांढऱ्या शिरीषासारखी पण लहान असतात (५-१० सेंमी. लांब). उपपर्णे लहान आणि दले संख्येने अधिक (६-१५ जोड्या) पण लहान आणि दलके संख्येने जास्त (१५-३० जोड्या) असतात. फुलोरे एप्रिल ते जूनमध्ये पानांच्या बगलेत १२-२० फुलांच्या (गेंदासारख्या) झुबक्यांनी येतात. फुले अल्पवृंत (लहान देठांची), पिवळी व सुवासिक आणि केसरदले लालसर असतात. शिंबा (शेंग) १०-१८ x २-२.८ सेंमी., पातळ चपटी, लहान व पिंगटपण टोकदार आणि बीजे ६-८ असतात. फुलांची संरचना व इतर सामान्य शारीरिक लक्षणे èलेग्युमिनोजी अथवा शिंबावंत कुलातील मिमोजॉइडी अथवा शिरीष उपकुलात वर्णन केल्याप्रमाणे असतात.
लुलैचे जांभळट पिंगट लाकूड बळकट, टिकाऊ, कठीण व जड असते. रंधून व घासून त्याला उत्तम झिलई होते. हत्यारांचे दांडे, कपाटे, शेतीची अवजारे इत्यादींसाठी ते उपयुक्त असते. दक्षिण त्रावणकोरात हिरव्या खताकरिता ह्या झाडांची लागवड करतात. पाने स्तंभक (आकुंचन करणारी), मूळव्याध, अतिसार आणि प्रमेहावर उपयुक्त असतात. तेल श्र्वेतकुष्ठावर गुणकारी असते. फुले थंड असून गळवे, फोड व सूज इत्यादींवर बांधतात. नेत्रदाहावर (डोळ्यांच्या आगीवर) पाने उपयुक्त असतात. शिरीष, लुलै व ॲल्बीझियाच्या इतर कित्येक जाती शोभेकरिता रस्त्यांच्या दुतर्फा लावतात. त्यांची चहा व कॉफी यांच्या मळ्यात सावलीकरिता लागवड करतात.
पहा : लेग्युमिनोजी शिरीष.
परांडेकर, शं. आ.
“