लीरी : मध्य इटलीतील एक नदी. लांबी १५८ किमी. नदी खोऱ्याचा विस्तार सु. ४,९५० चौ. किमी. रापिडो (गारी) व लिरी या दोन जलप्रवाहांपासून लीरी नदी बनली आहे. तिचा उगम रोमच्या पूर्व भागातील आव्हझानोजवळ होतो. हा भूप्रदेश सस. पासून सु. १,५०० ते २,००० मी. उंचीचा आहे. सुरूवातीला मध्य ॲपेनाइन्स पर्वताच्या दोन समांतर श्रेण्यांमधून ही नदी आग्नेयीस वाहत जाते. तिचे येथील खोरे अतिशय रमणीय आहे. ईझॉला दे लीरी या शहराजवळ लीरी नदीवर दोन निसर्गरम्य धबधबे निर्माण झाले आहेत. फ्रोझनोनीजवळ लीरी नदीस डावीकडून साको नदी येऊन मिळते. त्यानंतर पालेस्त्रीना व सेन्यी यांदरम्यान पाण्याचे अनेक लहानलहान प्रवाह येऊन मिळतात. मेल्फा ऑटीना पर्वतीय प्रदेशातून वाहत आलेली मेल्फा नदी लीरी नदीस उजवीकडून मिळते. त्यानंतर लीरी नदी दक्षिणेस वळते. लीरी खालच्या टप्प्यात गारील्यानो या नावानेही ओळखली जाते. शेवटी मिंटुर्नोजवळ भूमध्य समुद्राचा भाग असलेल्या टिरीनियन समुद्रातील गाएताच्या आखातास ती मिळते. मिंटुर्नो जवळची सस. पासूनची उंची सु. १०० ते १५० मी. आहे. दक्षिण भागातील नदीप्रवाह लेशियम व कँपेन्या प्रदेशांच्या सरहद्दीवरून वाहतो. दुसऱ्या महायुद्धात १९४३-४४ मधील हिवाळ्यात दोस्त राष्ट्रांच्या सैन्यांचे रापिडो व लीरी नदीकाठांवर इटलीशी जोरदार युद्ध झाले होते.
लीरी खोऱ्यातील हवामान समशीतोष्ण प्रकारचे आहे. डोंगराळ प्रदेश व समुद्रसान्निध्य यांमुळे वार्षिक सरासरी तापमान जास्त नसते. हिवाळा सौम्य उबदार व दमट असतो, तर उन्हाळ्यातील हवा उष्ण व कोरडी असते. वसंत ॠतुत पाऊस पडतो. येथील पिकांच्या बाबतीत विविधता आढळते. ऑलिव्ह, द्राक्षे, लिंबूवर्गीय फळे, गहू, तांदूळ, मका, तंबाखू, कापूस, तेलबिया, बीट, अंबाडी इ. कृषिउत्पादने या नदीखोऱ्यातून घेतली जातात.
मगर, जयकुमार