ली, यूआन त्से : (२९ नोव्हेंबर १९३६). अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ. ⇒ डड्ली आर्. हर्शबाख (अमेरिका) व जॉन सी. पोलॅन्यी (कॅनडा) यांच्या समवेत त्यांना १९८६ सालचे रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले आहे. या तिघांच्या संशोधनामुळे रासायनिक विक्रियांच्या गतिकीचा (गतिशास्त्रीय अध्ययनाचा) विकास झाला असून त्यामुळे रासायनिक विक्रियांची मूलभूत यंत्रणा उघड होण्यास मदत झाली आहे.
ली यांचा जन्म सिन-चू (तैवान) येथे झाला. १९५९ मध्ये त्यांनी तैपे येथील नॅशनल तैवान युनिव्हर्सिटीची पदवी व १९६१ मध्ये सिन-चू येथील नॅशनल त्सिंग हुआ युनिव्हर्सिटीची स्नातकोत्तर पदवी मिळविली. त्यानंतर ते अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठात (बर्कली) दाखल झाले व तेथे हर्शबाख यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करून १९६५ मध्ये त्यांनी रसायनशास्त्राची पीएच्. डी. पदवी मिळविली. १९६८ पर्यंत त्यांनी हर्शबाख यांच्याबरोबर पदवीपुढील संशोधन चालू ठेवून पीएच्. डी. अधिछात्र म्हणून काम केले. नंतर त्यांनी जेम्स फ्रांक इंन्स्टिट्यूट व शिकागो विद्यापीठाचा रसायनशास्त्र विभाग येथे सहप्राध्यापक (१९६८–७१), सहयोगी प्राध्यापक (१९७१-७२) व रसायनशास्त्राचे प्राध्यापक (१९७३-७४) म्हणून काम केले. १९७४ मध्ये ते वरील कॅलिफोर्निया विद्यापीठात परत आले व रसायनशास्त्राचे प्राध्यापक झाले. व त्याच वर्षी त्यांना अमेरिकेचे नागरिकत्व मिळाले.
हर्शबाख यांनी वायूरूप द्रव्यांच्या रासायनिक विक्रियांच्या सखोल अनुसंधानासाठी टक्कर होणाऱ्या रेणवीय शलाका (दिशा दिलेले व सुस्पष्ट असे रेणूंचे स्त्रोत) शोधून काढल्या होत्या. ली यांनी ही शलाका पद्धती सर्वसाधारण विक्रियांच्या अध्ययनासाठी वापरण्याच्या दृष्टीने संशोधन केले. अशाप्रकारे हे तंत्र सापेक्षत: मोठ्या व जटिल रेणूंमधील महत्त्वाच्या विक्रिया अभ्यासण्यासाठी वापरणे शक्य झाले. नंतर त्यांनी अभिज्ञातक (ओळख पटविण्याचे साधन) म्हणून एक द्रव्यमान वर्णपटमापक [→ द्रव्यमान वर्णपटविज्ञान] वापरला. यामुळे अधिक विविध प्रकारच्या विक्रियांचे अध्ययन करता येऊ लागले. नंतर त्यांनी या तंत्राला ⇒ लेसरची जोड दिली. यामुळे दोन्ही शलाकांमधील रेणूंची टक्कर होण्यापूर्वी त्यांच्यातील ऊर्जेच्या वाटणीत बदल घडवून आणणे शक्य झाले. परिणामी विक्रियेत निर्माण होणाऱ्या रेणूंचे अधिक तपशीलवारपणे विश्र्लेषण करता येऊ लागले. अशा प्रकारे त्यांनी जटिल कार्बनी रेणू आणि फ्ल्युओरीन किंवा ऑक्सिजन यांच्यातील विक्रियांचे तपशीलवार अध्ययन केले. यातून मिळालेल्या माहितीमुळे ज्वलन किंवा वातावरणीय प्रक्रिया (उदा., हवेत जाणारी प्रदूषक द्रव्ये व ओझोन यांच्यात घडणाऱ्या आंतरक्रिया) यांच्यासारख्या अतिजलद व गुंतागुंतीच्या प्रक्रियांचे विश्लेषण करण्याचे काम बरेच सोपे झाले. म्हणजे यामुळे या प्रक्रियांतील महत्त्वाच्या रासायनिक विक्रियांचे अध्ययन करता येऊ लागले. यातून ज्वलन प्रक्रियेतील विविध टप्प्यांची माहिती मिळाली. याचा उपयोग ⇒ अंतर्ज्वलन एंजिनाची कार्यक्षमता वाढविण्यासाठी व उर्जानिर्मितीसाठी होऊ शकेल, असा संशोधकांचा कयास आहे.
स्लोन अधिछात्रवृत्ती (१९६९), गुगेनहाइम अधिछात्रवृत्ती (१९७६), मिलर प्राध्यापकपद (१९८१), अमेरिकेच्या पर्यावरण खात्याचा ई. ओ. लॉरेन्स पुरस्कार आणि इतर पुष्कळ पुरस्कार व पारितोषिके हे सन्मान त्यांना मिळाले आहेत. त्यांचे संशोधनपर लेख अनेक ज्ञानपत्रिकांतून प्रसिद्ध झाले आहेत.
जमदाडे, ज. वि.; ठाकूर अ. ना.