लीमा : दक्षिण अमेरिकेतील पेरू देशाच्या राजधानीचे शहर लोकसंख्या ५२,५८,६०० (१९८३-अंदाज). ते पॅसिफिक महासागर किनऱ्यापासून सु. १३ किमी.वर कायाओ बंदराच्या पूर्वेस रिमॉक नदीकाठी वसले आहे. हे देशातील सर्वांत मोठे शहर (नागरी क्षेत्र ७० चौ. किमी.) असून जगातील अत्यंत झपाट्याने वाढणाऱ्या शहरांपैकी एक आहे. उष्ण कटिबंधीय सकल भाग आणि किनारपट्टीचा वाळवंटी पट्टा असूनही अँडीज पर्वतश्रेणींचे सान्निध्य व हंबोल्ट शीतप्रवाह यांमुळे त्याला आल्हाददायक पर्यावरण लाभले आहे. मरूद्यान म्हणूनच हा भाग प्रसिद्ध आहे. शीतप्रवाहामुळे येथील हवामानात उल्लेखनीय बदल आढळतात. उन्हाळ्यात (जानेवारी ते मे) सरासरी तापमान २३.३°से. व हिवाळ्यात (जून ते नोव्हेंबर) सरासरी तापमान १६°से. असते वार्षिक सरासरी पर्जन्यमान ३.९० सेमी. असून रीमॉक नदीला पावसाळ्यात पुरेसे पाणी आढळते पण शहरात पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे.
लीमाचा प्राचीन इतिहास ज्ञात नाही तथापि पुरातत्त्वीय अवशेषांवरून, विशेषतः पिरॅमिडसारख्या वास्तूंवरून, इंका संस्कृती (इ.स. १२०० ते १६००) या प्रदेशात नांदत होती, असे आढळते. या लोकांचे तांत्रिक ज्ञान तसेच वास्तुशिल्पकलेतील कौशल्य प्राचीन अवशेषांतून दृष्टोत्पत्तीस येते. इंका साम्राज्याचे कूस्को हे केंद्र लीमाजवळच होते. पनामाहून स्पॅनिश वसाहतकार फ्रांथीस्को पिझारो हा नोव्हेंबर १५३२ मध्ये काहामार्का येथे आला. त्याने इंकांचा सम्राट आतावाल्पा यास विश्वासघाताने पकडून पुढे ठार मारले (१५३३) आणि हळूहळू सभोवतालचा परिसर पादाक्रांत केला. जानेवारी १५३५ मध्ये त्याने लीमा ही नवीन राजधानी वसविली. सुरुवातीस ‘सिटी ऑफ किंग्ज’ (राजांचे नगर) हे नामाभिधान त्याने त्या वसाहतीस दिले होते. पुढे रिमॉकच्या सान्निध्यामुळे त्या शब्दाचा अपभ्रंश होऊन ते लीमा झाले. व्हेनेझुएला हा भाग वगळता स्पॅनिश वसाहतवाल्यांची दक्षिण अमेरिकेची ती सु. ३०० वर्षे राजधानी होती आणि या वसाहतींचा व्हाईसरॉय तेथेच राहत असे. १८२१ मध्ये होसे दे सान मार्तीन याने पेरू स्वतंत्र झाल्याचे येथूनच प्रथम घोषित केले. पेरू व बोलिव्हिया यांची स्पेनपासून मुक्तता करण्यासाठी सिमॉन बोलिव्हारला हे शहर उपयुक्त ठरले. पॅसिफिक युद्धात (१८८१-८३) चिलीने तारापाका, ताक्ना व आरिके हे जिल्हे जिंकून लीमाही पादाक्रांत केले. पुढे सु. ६०-७० वर्षे पेरूत सत्तासंघर्ष व उठाव यांनी धुमाकूळ घातला. त्यानंतर १९७९ मध्ये लष्करी हुकूमशाही अस्तित्वात आली.
विद्यमान लीमा आधुनिक इमारती, भव्य प्रवेशद्वार, उद्याने, रस्त्याच्या बाजूच्या वृक्षवल्ली इत्यादींमुळे सुशोभित दिसते. पेरू देशाचे ऐश्वर्य व दारिद्र्य या दोन्हींचे प्रतिबिंब या नगरात जाणवते. विसाव्या शतकात आधुनिकीकरणामुळे त्यात अनेक फेरफार झाले असले, तरी येथे अद्यापि वसाहतिक वास्तुशैलीची छटा प्रकर्षाने जाणवते. शहरात सु. ६७ जुन्या चर्चवास्तू आणि लहान मोठे ३४ चौक आहेत. नक्षीदार काष्ठसज्जे असलेले प्रासाद, जुनी चर्चे यांतून पोलाद आणि काच यांचा अधिकतर उपयोग तावदानांसाठी केलेला आढळतो. तोरे ताग्ले राजवाडा (स्था. १७३५) हा वसाहतिक वास्तुशैलीसाठी प्रसिद्ध आहे. शहराच्या मध्यवर्ती असलेला प्लाझा दे आर्मास चौक, प्लाझा दे सान मार्तीन सर्कल इत्यादींमुळे शहराला एक आगळे सौंदर्य प्राप्त झाले आहे. यांशिवाय येथे राष्ट्रीय ग्रंथालय आणि इंडियन व स्पॅनिश कलांचे दिग्दर्शन करणारे वस्तुसंग्रहालय आहे. एका कॅथीड्रलमध्ये पिझारोच्या अस्थी ठेवलेल्या आहेत. देशातील सर्वांत जुने विद्यापीठ – युनिव्हर्सिटी ऑफ सान मार्कोस (स्था. १५५१) येथे असून पाच राष्ट्रीय व सात खाजगी विद्यापीठे उच्च शिक्षण देतात. शहरातून वृत्तपत्रे तसेच तीस नभोवाणीकेंद्रे व पाच दूरचित्रवाणीकेंद्रे प्रसार माध्यामाचे काम करतात.
या सांस्कृतिक वैशिष्ट्यांबरोबरच लीमा हे पश्चिमेकडील जगतातील एक प्रसिद्ध व्यापारी शहर आहे. येथे लोकरी व सुती कापड उद्योग आणि साखरकारखाने असून येथून किंमती गालिचे व लोकरी रग यांची निर्यात होते. त्याशिवाय येथे तेलशुद्धीकरणाचे कारखाने असून मच्छीमारी हा उद्योगही मोठ्या प्रमाणावर चालतो. बहुदेशीय बँका व व्यापारी संस्था यांचे हे केंद्र असून देशातील इतर शहरांशी रस्ते, लोहमार्ग व विमानमार्ग यांनी ते जोडलेले आहे. हे पॅन अमेरिकन महामार्गावर असून जवळच कायाओ येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. औद्योगिक विकासामुळे शहरात झोपडपट्टीही वाढली आहे. ती प्रामुख्याने नदीकाठ व डोंगरउतार यांवर आढळते. त्यांना स्थानिक लोक ‘बॅरिअड्स’ म्हणतात. शहराला अनेकवेळा भूकंपाचे धक्के बसलेले असून १९४७ चा धक्का जबरदस्त होता. त्याने शहरातील फार मोठा भाग उद्ध्वस्त झाला. साधारणतः प्रत्येक शहरात दोनतरी विध्वंसक भूकंप येथे होतात त्यामुळे शक्यतो दुमजली घरे बांधण्यात येत नाहीत.
मगर, जयकुमार