फ्रांट्स लिस्टलिस्ट, फ्रांट्स : (२२ ऑक्टोबर १८११-३१ जुलै १८८६). हंगेरियन पियानोवादक संगीतरचनाकार. जन्म रेंडिग येथे त्याच्या संगीतप्रेमी वडिलांनी त्याला पियानोचे प्राथमिक धडे दिले. त्याच्या सांगीतिक प्रतिभेची चुणूक बालवयातच दिसून आली. वयाच्या केवळ अकराव्या वर्षी चमकदार पियानोवादक म्हणून त्याला युरोपभर मान्यता मिळाली.  

तसेच वयाच्या चौदाव्या वर्षी त्याने स्वरबद्ध केलेल्या डॉन सॅन्को (१८२५) या एकांकी संगीतिकेलाही प्रचंड यश लाभले. त्याच्या कुटुंबियांनी १८२१ मध्ये व्हिएन्नाला स्थलांतर केले. तेथे कार्ल चेर्नीकडे पियानोवादनाचे आणि आंतॉन्यो साल्येअरीकडे संगीतरचेनेचे त्याने धडे घेतले. पॅरीसमध्ये आंतॉन राय्काकडूनही त्याला संगीतरचनेचे शिक्षण लाभले. १८३४ ते १८४९ पर्यंत त्याचे वास्तव्य पॅरिसला होते. तेथे इतर कलाभ्यासकांशी त्याचा परिचय झाला व अन्य ललित कलांची जाणकारी त्याला प्राप्त झाली. १८४९ मध्ये त्याने वायमारला प्रयाण केले. तेथे व्हाग्‍नरशी त्याची गाढ मैत्री जडली. व्हाग्‍नरच्या संगीताला त्यानेच पहिल्यांदा मान्यता दिली. लिस्टच्या धामिक भावना प्रबळ होत्या व तो वारसा त्याला आईकडून लाभला होता. या उत्कट धर्मभावनेतून त्याने कॅथलिक चर्चसंगीतात सुधारणा घडवून आणल्या, तसेच क्रिस्टस (१८५५-१८६७), सेंट एलिझाबेथ (१८५७-६२) सारख्या ऑर्रटिरिओ-रचनाही केल्या. १८६१ मध्ये त्याने रोमला जाऊन उपाध्यायाची वस्त्रेही धारण केली. त्याचे पियानोवादनाचे तांत्रिक प्रभुत्व असामान्य होते. संगीतरचनाकार या नात्याने दोन विशेषांचा जनक म्हणून त्याला श्रेय दिले जाते : ‘सिम्फनी काव्य’ (सिम्फनिक पोएम) व रचनासंकेतांचे रूपांतर. समकालीन सौंदर्यवादी प्रवृत्तींनी प्रेरित होऊन लिस्टने संगीतात साहित्यिक, नाट्यात्म आणि चित्रात्म तत्त्वे आणली व ‘प्रोगॅम म्यूझिक’ ची संकल्पना (सर्वसाधारणत: वर्णनपर आशय असलेल्या संगीतास ‘प्रोगॅम म्यूझिक’ म्हणता येईल) आकारास आणली. याच संकल्पनेच्या छत्राखाली एकच चलनभेद वापरून मुक्त संगीतरचना केल्यामुळे सिम्फनी काव्य सिद्ध झाले. याशिवाय विशिष्ट व्यक्तिरेखेशी विशिष्ट धुन निगडित ठेवून व्यक्तिरेखेच्या बदलानुसार धुन विकसित करण्याची युक्तीही लिस्टने रूढ केली. स्वतःच्या सु. ४०० मौलिक संगीतकृती आणि अन्य संगीतकारांच्या सु. ७०० पुर्नरचित संगीतकृती त्याच्या नावावर मोडतात. सर्वश्रेष्ठ पियानोवादक म्हणून त्याची प्रामुख्याने ख्याती असली, तरी त्याचे इतर सांगीतिक कार्यही महत्त्वाचे आहे. बाइरॉइट, बव्हेरिया येथे त्याचे निधन झाले.

संदर्भ : Sitwell, Sacheverell, Liszt, London, 1956.

मोदी, सोराब (इं.) रानडे, अशोक (म).