लीड्स : ग्रेट ब्रिटनच्या पश्चिम यॉर्कशर परगण्यातील एक औद्योगिक व व्यापारी शहर. लोकसंख्या ७,१०,९०० (१९६८). वेस्ट राइडिंग या प्रशासकीय विभागात हे शहर मँचेस्टरच्या उत्तरेस ४८ किमी., आणि लंडनच्या वायव्येस २९८ किमी. अंतरावर एअर नदीकाठी वसलेले आहे. दगडी कोळसा व लोहखनिज यांच्या खाणी एअरच्या उपनद्यांपासून मृदू पाण्याची मोठ्या प्रमाणात उपलब्धता आणि रेल्वेद्वारा तसेच एअर नदी व लीड्स-लिव्हरपूल कालवे यांमधून होणारी जलवाहतूक यांच्यायोगे यॉर्कशरचे औद्योगिक राजधानीचे शहर म्हणून लीड्सला महत्त्व मिळाले. लीड्सच्या वायव्येस १३ किमी. अंतरावर येडन येथे विमानतळ आहे.

बीड (इ. स. ६७३-७३५) या अँग्लो-सॅक्सन विद्वानाने लीड्सचा उल्लेख केल्याचे आढळते. हेन्री डी लॅसी-लॉर्ड ऑफ पाँटिफ्रॅक्ट-याने ११५१ मध्ये कर्कस्टॉल ॲबी हा मठ बांधला. त्याचे अवशेष आजही सापडतात. लीड्सला १६२६ मध्ये बरोचा व १८९३ मध्ये शहराचा दर्जा मिळाला. चौदाव्या शतकात येथे फ्लेमिश विणकरांनी सुरू केलेल्या कापड विणण्याच्या उद्योगाला मोठी चालना मिळाली. एकोणिसाव्या शतकापर्यंत हा येथील प्रमुख उद्योग गणला जात होता. लोखंड व पोलाद उद्योगाच्या विकासामुळे विसाव्या शतकाच्या मध्यापासून उद्योगांचा विविधांगी विस्तार करण्यात येऊ लागला. लोकरी कापड उत्पादन तसेच तयार कपडे-उद्योग हे आजही जरी येथे महत्त्वाचे असले, तरी सांप्रत लीड्स हे अवजड उद्योग, छपाई उद्योग, रसायने, इलेक्ट्रॉनिकी व अभियांत्रिकीय उद्योग, कागद, वाहतूक वितरण उद्योग, फर्निचर, रेल्वे एंजिने, कृषियंत्रे, विमानांचे सुटे भाग, चामड्याच्या वस्तू, काच या उद्योगांचे एक प्रमुख केंद्र म्हणून गणले जाते. उत्कृष्ट शिलाई कामाचे शहर म्हणून लंडननंतर लीड्सचे नाव घेण्यात येते.

गलिच्छ वस्ती निर्मूलन तसेच आधुनिक गृहनिवसन प्रकल्पांची उभारणी याबाबत प्रयोग करणारे शहर म्हणून लीड्सचा लौकिक आहे. शहरातील सु. १,४३० किमी. लांबीच्या रस्त्यांमध्ये ‘हीड्रो’ हा २४ किमी. लाबींचा मार्ग हा सबंध यॉर्कशरमधील रस्त्यांमध्ये उत्कृष्ट म्हणून ओळखला जातो. शहरात सु. २,००० हे क्षेत्रात वने-उपवने तसेच मनोरंजनाची सुविधा स्थाने असून त्यांमध्ये ‘टेंपल न्यूसॅम इस्टेट’-स्कॉटिश राणी मेरी हिचा पती हेन्री स्ट्यूअर्ट लॉर्ड डार्न्ली याचे जन्मस्थान प्रसिद्ध आहे ‘राउंड हे पार्क’ हे जॉन ऑफ गाँट (ड्यूक ऑफ लँकास्टर-१३४०-९९) या राजपुत्राचे मृगयाक्षेत्र म्हणून विख्यात आहे. लीड्समध्ये सु. ३०० प्रार्थनागृहे असून त्यांपैकी सेंट ॲनीचे रोमन कॅथलिक कॅथीड्रल, सेंट पीटर्स चर्च, सेंट जॉन्स चर्च (१६३४) इ. प्रक्षेणीय आहेत. किरकोळ व्यापारपेठा, धान्य विनिमय केंद्र तसेच रोखे बाजार, व्हिक्टोरियाकालीन नगरभवन व भव्य, सुंदर कमानी जुन्या शहरात आढळतात.

शहरात १८७४ मध्ये स्थापण्यात आलेले यॉर्कशर महाविद्यालय हे १८८७ मध्ये व्हिक्टोरिया विद्यापीठाचे संलग्न महाविद्यालय बनले आणि १९०४ मध्ये ह्याचेच-लीड्स विद्यापीठा’त रूपांतर झाले. इतर अनेक शैक्षणिक संस्थांपैकी ‘ग्रामर स्कूल’(सोळावे शतक) ही प्रसिद्ध संस्था आहे. ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ ख्रिस्ती धर्मोपदेशक जोसेफ प्रीस्टली (१७३३-१८०४) तसेच ब्रिटिश नाटककार विल्यम काँग्रीव्ह (१६७०-१७२९) या दोहोंच्या लीड्स येथील अल्पकालीन वास्तव्याने शहराचे महत्त्व वाढले. लीड्सच्या कॉरिंथियन नगरभवनातील (१८५८) त्रैवार्षिक संगीतोत्सव प्रसिद्ध असून तेथील हेडिंग्ली (क्रिकेट), एलँडरोड (सॉकर) आणि मूरटाउन (गोल्फ) ही विख्यात मैदाने समजली जातात.

दळवी, र. कों.