लिव्हिंग्स्टन, डेव्हिड : (१९ मार्च १८१३-१ मे १८७३). प्रसिद्ध स्कॉटिश समन्वेषक व धर्मोपदेशक. त्याचा जन्म धार्मिक परंपरा असलेल्या सामान्य कुटुंबात ग्लासगोजवळ ब्लँटायर (लॅनार्कशर) येथे झाला. डेव्हिडला दहाव्या वर्षीच वडिलांना अर्थसाहाय्य करण्यासाठी कापडगिरणीत काम करावे लागले. त्यातून मिळणाऱ्या पैशातून त्याने लॅटीन व्याकरणाचे पुस्तक विकत घेतले आणि त्याला वाचनाचा छंद जडला. त्याने धर्मशास्त्र, वैद्यक आणि ग्रीक यांचा अभ्यास केला व मिळेल तसे शिक्षण घेतले. तेविसाव्या वर्षी तो महाविद्यालयीन पात्रता परीक्षेत उत्तीर्ण झाला आणि पुढे त्याने ग्लासगो विद्यापीठातून वैद्यकशास्त्राची पदवी मिळविली(१८४०). सुरुवातीपासूनच त्याने धर्मोपदेशक बनण्याचे ठरविले होते. कॅल्व्हिनपंथीय चर्चचा तो अनुयायीही होता. त्याची प्रथम चीनमध्ये धर्मप्रचारक म्हणून निवड झाली परंतु अफूच्या युद्धामुळे ती रद्द झाली. रॉबर्ट मॉफट या स्कॉटीश धर्मोपदेशकाच्या साहाय्याने दक्षिण आफ्रिकेतील मिशनरी कामासाठी कूरूमान येथे त्याची नियुक्ती झाली (१८४१) उर्वरित जीवनात आफ्रिका खंड हेच त्याने आपले कार्यक्षेत्र निवडले.
त्याला धर्माधिकाऱ्याची दीक्षा देण्यात आली. आफ्रिकेतील गुलामांचा व्यापार आणि तेथील सत्ताधाऱ्यांचे अत्याचार त्यास प्रथम जाणवले. धर्मप्रसाराबरोबर हा अमानवी व्यापार बंद झाला पाहिजे, अशी त्याची धारणा झाली. सुरुवातीच्या काळात त्याने आसपासच्या प्रदेशात खूप भ्रमंती केली. या काळात त्याने एकदा उत्तरेस कालाहारी प्रदेशापर्यंत पेरफटका मारला. तेथील लोकांची भाषा, चालीरीती, धार्मिक परंपरा इत्यादींची माहिती त्याने मिळविली काही लोकभाषा व चालीरीतीही आत्मसात केल्या.
लिव्हिंग्स्टनने मेरी या मॉफटच्या मुलीबरोबर लग्न केले (१८४५) त्यांना चार मुले झाली. मेरी त्याच्याबरोबर अनेक प्रवासांत असे. त्यावेळेपर्यंत कालाहारीचा प्रदेश अज्ञातच होता. ऑस्वेल व मरी हे दोन यूरोपीय सहकारी, बायका-मुले आणि काही नोकर घेऊन लिव्हिंग्स्टनने कालाहारी वाळवंट ओलांडले व १८४९ मध्ये एन्गामी सरोवराचा शोध लावला. पुढील प्रवासात त्सेत्से माशांमुळे मुले-माणसे आजारी पडली म्हणून तो कोलोबेंगला परतला. त्यानंतर त्याने मॉकोलोलो लोकांची राजधानी लिन्याटी येथे काही दिवस राहून क्वांडो (चोबे) या झँबीझी नदीच्या उपनदीचा शोध लावला. झँबियातील सेशेके येथे ४ ऑगस्ट १८५१ रोजी झँबीझी नदीचा शोध घेऊन तो केपटाउनला परतला. त्याबद्दल त्याला ‘ब्रिटिश रॉयल जिऑग्राफिक सोसायटी’ या संस्थेने सुवर्णपदक व रोख रक्कम ही बक्षिसे दिली. मुलांच्या शिक्षणाची व प्रकृतीची आबाळ होऊ लागली. म्हणून त्याने आपल्या कुटुंबियांस ग्रेट ब्रिटनला धाडले (१८५२). त्याने केपटाउनमध्ये खगोलशास्त्राचा अभ्यास केला आणि जून १८५४ मध्ये लिन्याटी येथे पुढील समन्वेषणाच्या तयारीसाठी तो आला. त्याला झँबीझीच्या उगमापर्यंतचा तसेच पूर्व किनाऱ्याचा प्रवास करावयाचा होता परंतु वाईट हवामानामुळे ते शक्य झाले नाही. तेव्हा त्याने प.आफ्रिकेच्या किनाऱ्यावरील लूअँडा बंदर हे लक्ष्य ठेवून मॉकोलोलो राजाच्या सहकाऱ्याने ३१ मे १८५४ रोजी लूअँडा गाठले. तेथून तो लिन्याटाला माघारी फिरला व काही दिवस विश्रांती घेऊन झँबीझी नदीकाठाने तो झँबिया व झिंबाब्बे यांच्या सीमेवरील एका प्रेक्षणीय धबधब्याजवळ आला (१७ नोव्हेंबर १८५५). या धबधब्यास त्याने ‘व्हिक्टोरिया फॉल्स’ हे आपल्या सम्राज्ञीचे नाव दिले. हा शोध लावल्यानंतर १८५६ च्या अखेरीस तो मायदेशी परतला. लिव्हिंग्स्टनने विविध समन्वेषित भूप्रदेश व त्यांसाठी केलेले चित्तथरारक प्रवास यांचा वृत्तांत मिशनरी ट्रॅव्हल्स अँड रिसर्चिस इन साउथ आफ्रिका (१८५७) या ग्रंथात प्रसिद्ध केला. त्याच्या सत्तर हजार प्रती खपल्या. लिव्हिंग्स्टनला अनेक मानसन्मान मिळाले, त्याबरोबरच संपत्ती व कीर्तीही लाभली. त्याने लंडन मिशनरी सोसायटीपासून फारकत घेऊन देशभर प्रवास केला व आपल्या संशोधनावर व्याख्याने दिली.केंब्रिज विद्यापीठातील विद्यार्थ्यांना आपले समन्वेषणाचे काम पूर्ण करण्यास त्याने उत्तेजनपर व्याख्याने दिली. ती पुढे डॉ. लिव्हिंग्स्टन्स केंब्रिज लेक्चर्स या शीर्षकाने प्रसिद्ध झाली त्याने तरूण पिढीत नवचैतन्य निर्माण केले. तो पुन्हा झँबीझीच्या शोध-मोहिमेवर पत्नी, भाऊ या सर्वाना घेऊन गेला. त्याची मोझँबीकमध्ये किलिमाने येथे ब्रिटिश कॉन्सल म्हणून नियुक्ती करण्यात आली (१८५८). पुढे सु. सहा वर्षांच्या काळात त्याने न्यासा सरोवर प्रदेश आणि शीरे नदी यांचा शोध लावला व तो चिल्वा सरोवराजवळ येऊन पोहोचला. या प्रवासात झँबीझी नदीकाठी शुपंगा येथे त्याची पत्नी निवर्तली (२७ एप्रिल १८६२). या सफरीत आपला मुलगा सहभागी होईल असे त्याला वाटले होते पण तो अमेरिकेत गेला व यादवी युद्धात मरण पावला. लिव्हिंग्स्टन १८६४ मध्ये पुन्हा ग्रेट ब्रिटनला परतला. त्याने आपला भाऊ चार्ल्स याच्या सहकाऱ्याने नॅरटिव्ह ऑफ ॲन एक्स्पिडिशन टू द झँबीझी अँड इट्स ट्रिब्युटरिज हा दुसरा ग्रंथ लिहिला (१८६५). या सुमारास त्यास मूळव्याधीचा त्रास होऊ लागला. डॉक्टरांनी शस्त्रक्रियेचा सल्ला देऊनही तो नाईल नदीच्या शोधार्थ पुन्हा आफ्रिकेला गेला. (१८६६).
या सफरीत त्याने धर्मप्रसारावर भर दिला तसेच पूर्व आफ्रिकेतील गुलामांचा व्यापार बंद करण्याच्या कार्यास स्वतःला वाहून घेतले. नाईल नदीचे उगमस्थान शोधण्यासाठी तो मध्य आफ्रिकेच्या अंतर्भागात घुसला. या प्रवासात अनेक सहकारी त्याला सोडून गेले त्याला रानटी लोकांनी उपद्रव दिला आणि त्याची उपासमारही झाली. त्यामुळे अनेक दिवस त्याच्याविषयी काहीच कळू शकले नाही या मोहिमेत तो मरण पावला, अशाही अफवा उठल्या. न्यूयॉर्क हेरल्ड या वृत्तपत्राने त्याच्या शोधार्थ हेन्री स्टॅन्ली या ब्रिटिश संशोधकास औषधे व भरपूर अन्नसाठा देऊन आफ्रिकेत पाठविले. दरम्यान लिव्हिंग्स्टनने ग्वेरू आणि बेंग्वेलू ही दोन सरोवरे शोधून काढली होती, नंतर तो टांगानिका सरोवराजवळ पोहोचला (१८६७). त्यानंतर तो वायव्येकडे लूआलावा नदीकाठच्या न्यांग्वे येथे पोहोचला (१८७१). स्टॅन्ली झांझिबारमार्गे १८७१ मध्ये तेथे आला. त्याने लिव्हिंग्स्टनला परतण्याचा सल्ला दिला परंतु स्टॅन्लीच्या सर्व विनंत्या धुडकावून त्याने आफ्रिकेतच फिरण्याचा दृढनिश्चय केला आणि तो पुन्हा नाईल नदीच्या उगमाच्या शोधार्थ व गुलामगिरीचा विक्रीव्यवसाय नष्ट करण्यासाठी निघाला परंतु त्याची प्रकृती अधिक क्षीण झाली व तो रक्तस्त्रावाने चीतांबा (झँबिया) येथे मरण पावला. पुढे त्याचे प्रेत लंडनला आणून वेस्टमिन्स्टिर ॲबी येथे पुरण्यात आले (१८७४). त्याच वर्षी द लास्ट जर्नल्स ऑफ डेव्हिड लिव्हिंग्स्टन हा ग्रंथ प्रकाशित झाला.
दक्षिण, मध्य व पूर्व आफ्रिकेत त्याने सु. तीस वर्षे सतत प्रवास केला. या प्रवासात त्याने ख्रिस्ती मिशनरी कार्य अत्यंत कळकळीने व निष्ठेने केले. गुलामांचा व्यापार बंद करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि ज्या प्रदेशात अद्यापि एकही यूरोपीय प्रवासी गेला नव्हता, अशा अनेक अज्ञात भूप्रदेशांचा त्याने प्रथमच शोध घेतला. त्याच्या शोधकार्यात तांत्रिक, भौगोलिक, वैद्यकीय व सामाजिक हेतू दडलेले होते आणि मिळेल ती माहिती तो टिपून ठेवत असे. त्याला असा विश्वास होता, की आफ्रिकेत आज ना उद्या राष्ट्रवाद उफाळून येईल. तथापि त्याच्या शोधांमुळे आफ्रिकेच्या वसाहतीकरणास मात्र चालना मिळाली.
संदर्भ : 1. Debenbam, Frank, The way to Ilala, Toronto, 1955.
2. Huxley, Elspeth J. Livingstone and His African Journeys, New York, 1974.
3. Seaver, George, David Livingstone : His life and Letters , New York, 1957.
4. Stanley, Sir Henry M. How I Found livingstone, New York, 1970.
शाह, र. रू.