लिकासी: झादोव्हिल. मध्य आफ्रिकेतील झाईरे देशाच्या शाबा प्रांतातील (पूर्वीचे कटांगा) तांबे व कोबाल्ट यांच्या उत्पादनाचे व त्यांवर प्रक्रिया करणारे महत्वाचे केंद्र. लोकसंख्या १,९४,४६५ (१९८४). १९६६ पर्यंत हे झादोव्हिल या नावाने ओळखले जाई. हे देशाच्या आग्नेय भागात, लिकासी नदिकाठावर, लूबूंबाशी-पोर्ट फ्रांकी लोहमार्गावर व सडकेवर, लूबूंबाशीच्या वायव्येस १४० किमी. वर बसले आहे. बेल्जियनांनी १८९२ मध्ये लिकासी तसेच त्याच्या वायव्येस २४ किमी. वर असलेल्या कांबोव्हे येथील तांब्याच्या खाणींचा शोध लावला. परंतु येथे शहराची स्थापना मात्र १९१७ मध्ये करण्यात आली. १९४३ मध्ये त्याला नागरी जिल्ह्याचे स्थान देण्यात आले. १९६० ते १९६५ दरम्यान तांबे व कोबाल्ट यांच्या उत्पादनात जगातील प्रमुख केंद्रामध्ये याची गणना होऊ लागली. तांबे व कोबाल्ट यांची धातुके शुद्ध करणे तसेच गंधकाम्ल, ग्लिसरीन इ. रसायने, सिमेंट यांचे मोठे कारखाने येथे आहेत. शहरात पुरातत्वविद्या व खाणकाम यांसंबंधीचे वस्तुसंग्रहालय आहे.
लिमये, दि. ह. चौधरी, वसंत