लॉस्की, निकोलस अनू फ्र्यियेव्ह्यिच : (६ डिसेंबर १८७०-२४ जानेवारी १९६५). अलीकडच्या काळातील प्रमुख रशियन तत्त्ववेत्ते. जन्म रशियाच्या व्हीटेप्स्क प्रांतातील क्रेस्लाव्हका ह्या खेड्यात. सेन्ट पीटर्झबर्ग विद्यापीठातून पदवी संपादन केल्यानंतर जर्मनीत पदव्युत्तर शिक्षण. प्रसिद्ध जर्मन तत्त्ववेत्ते व्हिल्हेल्म व्हिंडेलबांट, व्हिल्हेल्म व्हुंट आणि जी. ई. म्यूलर हे त्यांचे शिक्षक होते. १९०७ मध्ये डॉक्टरेट संपादन केल्यावर त्यानी सेन्ट पीटर्झबर्ग विद्यापीठात अध्यापक म्हणून १९२१ पर्यंत काम केले. १९२२ मध्ये सोव्हिएट सरकारने त्यांना देशातून बहिष्कृत केले. त्यानंतर त्यांनी प्राग येथील विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम केले. १९४६ मध्ये ते अमेरिकेला गेले व पुढील अनेक वर्षे ते न्यूयॉर्क येथील सेन्ट व्ह्लद्यीम्यिर रशियन ऑर्थडॉक्स सेमिनरीमध्ये प्राध्यापक होते. लॉस्की यांनी विपुल लिखाण केले आहे. त्यांच्या अनेक ग्रंथांची परभाषांत भाषांतरेही झाली आहेत.
लॉस्की ह्यांच्या तत्त्वज्ञानावर लायप्निट्स आणि आंरी बेर्गसाँ ह्यांचा विशेष प्रभाव आहे. बेर्गसाँच्या प्रभावामुळे त्यांनी प्रतिभान ह्या संकल्पनेला आपल्या ज्ञानमीमांसेत मध्यवर्ती स्थान दिले. लॉस्की यांच्या मताप्रमाणे ज्ञानाचा विषय असलेली जी वस्तू असते, ती वस्तूच त्या ज्ञानात आपल्याला साक्षात गोचर झालेली असते. तिचे प्रतिनिधित्व करणारी संवेदना, प्रतिमा इ. हा ज्ञानाचा विषय नसतो ती वस्तूच ज्ञानाचा साक्षात विषय असते. अशा साक्षात ज्ञानाला प्रतिभान म्हणतात. लॉस्की यांनी प्रतिभानांचे तीन प्रकार कल्पिले आहेत. अवकाश आणि काळ ह्याच्यात स्थाने असणाऱ्या ज्या वस्तू किंवा घटना असतात, त्यांची प्रतिभाचे आपल्याला असतात. ही ऐंद्रिय प्रतिभाने. अशा वस्तू घटनांना वास्तव सत्ता असते, असे लॉस्की म्हणतात. संख्या, वस्तू आणि तिचे गुण यांच्यामधील संबंध इ. ह्यांना अस्तित्व, म्हणजे सत्ता आहे पण हे अस्तित्व स्थळकाळातील नसते. अशा अस्तित्वांची आपल्याला जी प्रतिभाने लाभतात, ती वौद्धिक प्रतिभाने असतात. शिवाय लॉस्की ह्यांच्या मताप्रमाने स्थळकाळातील अस्तित्वापलीकडची अशी केवल सत्ता आहे. ही केवल सत्ता म्हणजे ईश्वर. ईश्वराचेही आपल्याला प्रतिभान होऊ शकते. हे गुह्य प्रतिभान होय.
लॉस्की ह्यांची वस्तुमीमांसा लायप्निट्स ह्यांच्या वळणाची आहे. लायप्निट्स ह्यांच्या एकक ह्या संकल्पनेच्या जागी ते द्रव्यात्मक कर्ता ही संकल्पना स्वीकारतात. लायप्निट्स यांच्या म्हणण्याप्रमणे हे सबंध वस्तुजात जसे अखेरीस एककांचे बनलेले आहे, एकक असलेली द्रव्ये हे जसे त्याचे अंतिम घटक आहेत, त्याप्रमाणे लॉस्की ह्यांच्या मतानुसार द्रव्यात्मक कर्ते हे वस्तुजाताचे अंतिम घटक आहेत. प्रत्येक द्रव्यात्मक कर्त्याला निवड करण्याचे स्वातंत्र्य असते. एखादा परमाणू हा सर्वांत कनिष्ठ प्रकारचा द्रव्यात्मक कर्ता होय. माणूस हा उच्चतर प्रकारचा द्रव्यात्मक कर्ता आहे. निवडीचे स्वातंत्र्य असल्यामुळे कनिष्ठ पायरीवरील द्रव्यात्मक कर्ता वरच्या आणि मग त्याच्या वरच्या अशा पायऱ्यांवरील स्वरूप प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करतो. असा प्रयत्न करण्याचे सामर्थ्य अंगी असल्यामुळे तो कर्ता असतो. अशा रीतीने कनिष्ठ स्तरावरील द्रव्यात्मक कर्ते उच्चतर प्रकारांत उत्क्रांत होत जातात. जेव्हा एखाद्या द्रव्यात्मक कर्त्याला अंतिम नैतिक मूल्यांची प्रतिभाने प्राप्त होतात आणि त्यांना अनुसरून तो आपली निवड वा नर्णय करतो, तेव्हा तो एक व्यक्ती किंवा पुरूष (पर्सन) ह्या पदाला पोहोचतो.
ईश्वर हा सर्व द्रव्यात्मक कर्त्यांचा निर्माता आहे. ह्या द्रव्यात्मक कर्त्यांचे एकमेकांशी जे कलह-सहकार्याचे संबंध असतात आणि त्यांचा एकमेकांवर जो प्रभाव पडतो, त्यांतून विश्वाचा व्यवहार निष्पन्न होतो. विश्वातील सर्व वस्तू एकाच अवकाशात आणि काळात आहेत म्हणून विश्व एक आहे असे नाही, तर ईश्वराने सर्व वस्तू म्हणजे द्रव्यात्मक कर्ते निर्माण केले आहेत म्हणून विश्व एक आहे. ज्याला आपण अवकाश आणि काल म्हणतो, ती द्रव्यात्मक कर्त्यांमधील संबंधांची रूपे आहेत. माणसाचे अंतिम भवितव्य हे ईश्वराचे म्हणजे केवल सत्तेचे साक्षात दर्शन किंवा गुह्या प्रतिभान प्राप्त करून घेणे हे आहे. ईश्वराच्या अशा प्रतिभानातून माणसाला निरपेक्ष अथवा केवल नीतीचे तत्त्व लाभते. सर्व निर्णय ह्या तत्त्वाला अनुसरून करण्याने माणूस आपले आदर्श स्वरूप प्रत्यक्षात सिद्ध करतो.
संदर्भ : 1. Duddington, N. A. ‘The Philosophy of N. O. Lossky’, Dublin Review, Vol. 192, 1933.
2. Kohanski, A. S. Lossky’s Theory of Knowledge, Nashville (Tenn.), 1936.
रेगे, मे. पुं.