वॉटर टाउन : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील न्यूयॉर्क राज्याच्या जेफर्सन परगण्याचे मुख्यालय, औद्योगिक शहर तसेच राज्याच्या कृषि-दुग्धोत्पादन क्षेत्राचे प्रमुख विपणन व वितरण केंद्र. लोकसंख्या २७,९६१ (१९८०). हे शहर ब्लॅक नदीच्या दोन्ही तीरांवर वसले असून ते सिरॅक्यूजच्या उत्तरेस १०४ किमी. आणि आँटॅरिओ सरोवराच्या पूर्वेस सु. १२ किमी. अंतरावर आहे. न्यू इंग्लंडच्या ओनिडा परगण्यातील मोहॉक खोऱ्यातून आलेल्या दोन कुटुंबांनी हे खेडे इ. स. १८०० मध्ये वसविल्याचे सांगितले जाते. त्यांनी येथील ब्लॅक नदीच्या सु. ३४ मी. उंचीच्या धबधब्यातील पाण्यापासून मिळणाऱ्या शक्तीचा उपयोग करून प्रारंभी या भागात लाकूडकापणीच्या व सातूच्या पीठगिरण्या उभारल्या. पुढे इतर वसाहतकऱ्यांनाही याचे आकर्षण वाटून त्यांनीही या ठिकाणी यंत्रमाल, सुतारकाम वगैरेंनी लहानलहान दुकाने काढली. या धबधब्यावरूनच शहराला सांप्रतचे नाव पडल्याचे मानले जाते. या धबधब्याच्या योगे निर्माण झालेल्या शक्तीमुळे येथे कागद उद्योगाचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला, १८०९ मध्ये येथे पहिली कागदलगदागिरणी कार्यान्वित झाली व १८९० पर्यंत वॉटरटाउन हे अमेरिकेतील कागद उत्पादनाचे एक महत्त्वाचे केंद्र बनले. ब्लॅक नदीवरील धबधबा व सॅकेट्स हार्बर हे १६ किमी.वरील विकसित बंदर यांच्यायोगे शहराच्या औद्योगिक विकासात भरच पडली. वॉटरटाउनला १८२५ मध्ये खेड्याचा, तर १८६९ मध्ये शहराचा दर्जा प्राप्त झाला.

वॉटरटाउन हे राज्यातील प्रमुख व्यापारी केंद्र असून दूध व दूधउत्पादने, तसेच बटाटा, मका, गहू, सफरचंद या शेतमालाचे प्रमुख उत्पादन व विपणनकेंद्र म्हणून विख्यात आहे. यांखेरीज शहरात कागद व कागदउद्योगातील यंत्रे, रबर, प्लॅस्टिके, नळकाम साहित्य, रंग, कापड व तयार कपडे, रेशीम, मोटारींचे सुटे भाग, लोहमार्ग वायुगतिरोधक, निदानीय तापमापके, शिरोवेष्टने, दुर्गंधिनाशक द्रव्ये इत्यादींचे निर्मितीउद्योग आहेत.

‘थाउजंड आयलंड्स’ हे आरोग्यस्थान तसेच पूर्वेकडील ‘ॲडिराँडॅक मौंटन्स’ हा हिवाळी क्रीडांकरिता प्रसिद्ध पर्वतीय प्रदेश व सेंट लॉरेन्स सी-वे प्रकल्प यांच्याकडे जाण्याचे प्रवेशद्वार म्हणून वॉटरटाउनला विशेष महत्त्व लाभले आहे.

वॉटरटाउनमधील बहुतेक व्यापार शहराच्या मध्यभागी एकवटला आहे. येथील लक्षणीय सार्वजनिक वास्तूंमध्ये ‘फ्लॉवर मिमॉरिअल लायब्ररी’ व ‘जेफर्सन काउंटी हिस्टॉरिकल सोसायटी होम’ यांचा अंतर्भाव होतो. या दोन्ही इमारतींमध्ये मूळचे अमेरिकन इंडियन व फ्रेंच वसाहतकरी यांच्यावेळचे अवशेष जतन करण्यात आले असून ते प्रवाशांचे आकर्षण ठरले आहेत. मध्यवर्ती चौकात फ्रँक विन्फील्ड वुलवर्थ (१८५२-१९१९) या अमेरिकन साखळी दुकानांचा जनक व ‘एफ्.डब्ल्यू-वुलवर्थ कंपनी’ (१९११) या बहुराष्ट्रीय साखळी दुकानांचा मालक याची एक प्रचंड वास्तू उभारण्यात आली आहे. १८७८ मध्ये वुलवर्थने वॉटरटाउनच्या जत्रेमध्ये पाच व दहा सेंट अशा ठराविक किंमतींना ग्राहकांना विविध वस्तू विकण्याची योजना प्राथम राबविली पुढे ही योजन एवढी यशस्वी ठरली की, अल्पावधीतच वुलवर्थची विस्तृत भांडारसाखळी निर्माण झाली. वॉटरटाउन येथे अमेरिकेन परराष्ट्र सचिव जॉन फॉस्टर डॅलस यांचे अल्पकाल (१९५३-५९) वास्तव्य होते. त्यांचे वडील रेव्हरंड ॲलन मॅसी डॅलस हे येथील प्रेस्बिटेरियन चर्चचे प्रमुख म्हणून काम करीत होते. जॉन फॉस्टर डॅलस यांचे शालेय शिक्षण येथील सार्वजनिक शाळांमधून, तर पदवी-प्राप्ती वॉटरटाउन उच्च माध्यमिक विद्यालयातून झाली. शहरात जेफर्सन कम्यूनिटी महाविद्यालय (१९६३), कनिष्ठ महाविद्यालय व सैनिकी राखीव दलाचा (नॅशनल गार्ड) मोठा वाद्यवृंदविभाग आहे.

दळवी, र. कों.