अमेरिकन लिंडेन (बासवुड) : (१) पान, (२) छद, (३) फुलोरा लाइम: (४) फूल, (५) फळ, (६) बीजाचा उभा छेद.लिंडेन : (इं. लाइम, बासवूड लॅ. टिलिया कुल – टिलिएसी). फुलझाडांपैकी [⟶ वनस्पति, आवृत्तीबीज उपविभाग] एका प्रजातीचे इंग्रजी नाव. हिचे शास्त्रीय नाव टिलिया असून तीत सु. ५० जाती आहेत व त्यांचा प्रसार उ. गोलार्धातील समशीतोष्ण प्रदेशांत, मेक्सिकोच्या डोंगराळ मूलखात व द. आशिया ते मध्य चीनपर्यंत आहे. भारतास एकही जाती आढळत नाही. लिंडेनच्या सर्व जाती पानझडी वृक्ष आहेत कित्येक नैसर्गिक व सुस्थित संकरज (मिश्र संतती) आहेत. भिन्न भिन्न जातींत बरीच विविधता आढळते तसेच लागवडीतही अनेक संकरज निर्माण झाले आहेत.

अग्रस्थ (शेंड्यावर) कळ्यांचा अभाव व हिवाळ्यात ठळकपणे आढळणाऱ्या कळ्या हे यांचे वैशिष्ट्य असते. पाने साधी, सामान्यपणे गोलसर, अंडाकृती, तळाशी हृदयाकृती, बाजूस तिरपी व एकाआड एक असून खालच्या बाजूस शिरांच्या बगलेत दाट झुपकेदार लव असते. फुल फिकट पांढरी किंवा पिवळट, १-२ सेंमी. व्यासाची असून ती कक्षास्थ (बगलेतील) वल्लरीवर [फुलोऱ्यावर ⟶ पुष्पबंध] जून-ऑगस्टमध्ये येतात. फुलोऱ्याच्या देठास खाली एक लांबट सपाट पानासारखे छंद (उपांग) असून ते लोंबते असते. फळ शुष्क, कठीण सालीचे (कपाली), गोलसर, १.५ सेंमी. व्यासाचे व एक कप्प्याचे असून त्यात १-२ बिया असतात. छदाचा उपयोग पुढे फळांच्या प्रसारास [⟶ विकीरण, फळांचे व बीजांचे] होतो. फुलांची संरचना व वनस्पतींची इतर सामान्य शारीरीक लक्षणे ⇨ टिलिएसी अथवा परुषक कुलात वर्णन केल्याप्रमाणे असतात.

या झाडांची साल भेगाळ व जाड असते. ⇨ परिकाष्ठ (अन्नरस वाहक भाग) सूत्रल (कठीण व लांब कोशिकांचा-पेशींचा-बनलेला) असल्याने त्यापासून कुजवून धागा मिळतो त्याचे दोर व चटया बनवितात. रशियात कापड, दोरखंडे व बूट इत्यादींसाठी ही झाडे उपयोगात आहेत. खोडातील मऊ भागाचा उपयोग जखमा बांधण्यास करतात. यांचे फिकट रंगाचे लाकूड फार मऊ, ठिसूळ व हलके असून फारसे बळकट नसते. ते सुतार कामास फार सोयीचे असते. यूरोपात कोरीव कामास वापरतात त्यापासून कलाकुसरीच्या वस्तू बनवितात.

धार्मिक प्रसंग कोरलेली चित्रे, करंड्या, पेट्या, पिंजर, तक्ते, कृत्रिम अवयव, खेळणी, सजावटी सामान, मधमाश्यांच्या पेट्या, साचे, मुखवटे, मोजपट्ट्या चित्रांच्या चौकटी इ. विविध वस्तू या लाकडापासून तयार करतात. काही झाडांचे फुलोरे फार सुवासिक असून सोनेरी व बदामी रंगाच्या फुलांतील मध फिकट पण उच्च प्रतीचा असतो. काही जाती व संकरजे रस्त्यांच्या दुतर्फा लावतात. नवीन लागवड ताज्या बिया किंवा दाबकलमे लावून करतात. 

मोठ्या पानाचा लाइम (टिलिया प्‍लॅटिफायलॉस) ३० मी. पर्यंत उंच वाढणारा मोठा वृक्ष असून तो यूरोप, फ्रान्स, जर्मनी, बेल्जियम, पोलंड, स्पेन, इटली, ग्रीस व क्रिमिया येथे आढळतो. लहान पानांचा लाइम (टि. कॉर्‍डॅटा ) स्कँडिनेव्हियन देश, स्पेन, बाल्कनच्या दक्षिणेस आणि क्रिमिया व सायबीरियाच्या पूर्वेस आढळतो. यूरोपीय लिंडेन (टी. यूरोपिया) हा वरील दोन्हीचा संकरज असावा. तो शोभेकरिता लावतात. जपानी लिंडेन (टि. जॅपोनिका) व मँगोलियन लिंडेन (टि. मँगोलिका) या दोन आशियाई जाती इमारती लाकडाकरिता उपयोगात आहेत. अमेरिकी लिंडेन (टि. अमेरिकाना ) हा वृक्ष सु. ४० मी. उंच वाढतो. सामान्य लाइम (टि. व्हल्गॅरिस) हा फार दीर्घायुषी असून तो रस्त्यांच्या दुतर्फा व मैदानांभोवती लावतात.  

संदर्भ : 1. Bailey, L. H. The Standard Cyclopedia of Horticulture, Vol lll, New York, 1961.

           2. Hill, A. F. Economic Botany, Tokyo, 1952.

           3. Mitra J. N. An Introduction to Systematic Botany and Ecology, Calcutta 1964.

जमदाडे, ज. वि परांडेकर, शं. आ.