लिंटन, राल्फ : (२७ फेब्रुवारी १८९३-२४ डिसेंबर १९५३). प्रसिद्ध अमेरिकन सांस्कृतिक मानवशास्त्रज्ञ. जन्म फिलाडेल्फिया (पेनसिल्व्हेनिया राज्य) येथे. फिलाडेल्फियाच्या स्वॉर्थमोर महाविद्यालयातून त्यांनी बी. ए. ही पदवी घेतली. (१९१५) त्याच वर्षी न्यू जर्सी येथील का प्राचीन स्थानाचे निरीक्षण करून त्यावर त्यांनी लिखाण केले. विद्यार्थिदशेतच लिंटन यांना पुरातत्वविद्येत रस होता. पदवी घेतल्यानंतर १९१९ मध्ये ते पुन्हा त्याच विषयाकडे वळले परंतु १९२०-२१ या दोन वर्षांच्या मार्केझास बेटावरील वास्तव्याने त्यांच्यात परिवर्तन होऊन ते पुरातत्त्वविद्येच्या अभ्यासाकडून मानवशास्त्राकडे वळले. १९२२ मध्ये पॉलिनीशियातून आल्यानंतर ते शिकागोत क्षत्रीय वस्तुसंग्रहालयाच्या कर्मचारीवर्गात सामील झाले. हे वस्तुसंग्रहालय नैसर्गिक इतिहासाचे असून, सागरी आणि अमेरिकन इंडियनांच्या वस्तू गोळा करण्याचे काम प्रामुख्याने ते करू लागले. पुढे त्यांनी हार्व्हर्ड विद्यापीठातून पीएच्. डी. घेतली (१९२५). त्यांनी मादागास्कर (विद्यमान मॅलॅगॅसी प्रजासत्ताकात) या फ्रेंच वसाहतीत तसेच पूर्व आफ्रिकेत १९२५-२७ दरम्यान संशोधनात्मक सर्वेक्षण केले. या पाहणीतून त्यांनी मादागास्करमधील तनाला या डोंगरी आदिवासींवर द तनाला, अ हिल ट्राइब ऑफ मादागस्कर (१९३३) हा मौलिक ग्रंथ लिहीला. मार्केझास बेटावरील लोकजीवन आणि तेथील पुराणवस्तू यांच्या अभ्यासाचा त्यांनी आपल्या प्रबंधासाठी उपयोग केला. तनाला या जमातीच्या अभ्यासातून कोणत्याही समाजाची संस्कृती ही एकसंध असते. आणि कोणत्याही भागामध्ये थोडे परिवर्तन घडून आले, तरी इतर भागांमध्ये आणि परिणामतः संपूर्ण संस्कृतीमध्ये त्यानुसार बदल घडून येतो, हे त्यांनी दाखवून दिले. प्राध्यापक म्हणून त्यांनी विस्कॉन्सिन (१९२८-३७), कोलंबिया (१९३७-४६) आणि येल (१९४७-५३) या विद्यापीठांत अध्यापन केले. कनेक्टिकट राज्यांतील न्यू हेवेन येथे ते कालवश झाले.

द स्टडी ऑफ मॅन (१९३६), द कल्चर बॅकग्राउंड ऑफ पर्सनॅलिटी (१९४५), द सायन्स ऑफ मॅन इन द वर्ल्ड क्राइसिस (१९४९) आणि द ट्रि ऑफ कल्चर (१९५५) हे त्यांनी लिहिलेले महत्त्वाचे ग्रंथ होत. कोलंबिया विद्यापिठात असताना अब्रहम कार्डिनर या मनोविश्लेषणज्ञाचा सहवास त्यांन लाभला. कार्डिनरने द इंडिव्हिज्युअल अँड हिज सोसायटी (१९३९) आणि द सायकॉलॉजिकल फ्राँटियर्स ऑफ सोसायटी (१९४५) हे समाजाचे विश्लेषण करणारे दोन ग्रंथ लिहिले. या ग्रंथांतून ‘मूलभूत व्यक्तिमत्त्वाची संरचना’ किंवा ‘बहुलक व्यक्तिमत्वा’चा प्रकार या संकल्पना उद्यास आल्या. मनोविश्लेषणाच्या अभिक्रमासंबंधी भ्रमनिरास होऊन लिंटन यांनी समाजाच्या संदर्भातच व्यक्तिमत्वाचा अर्थ लावणे पसंत केले. त्यानुसार त्यांनी कल्चरल बॅकग्राउंड ऑफ पर्सनॅलिटी हा ग्रंथ लिहिला. कल्चर अँड मेंटल डिसॉर्डर्स (१९५६) हा ग्रंथ त्यांच्या मरणोत्तर प्रसिद्ध झाला. या ग्रंथात नमुनेदार व्यक्तिमत्वापासून व्यक्ती ढळू लागल्या म्हणजे त्यांच्याकडून अतिचार घडला, तर त्यातून कोणत्या समस्या निर्माण होतात. याचे विवेचन आहे.

समाजशास्त्रात आज सर्वसामान्यपणे स्वीकारलेल्या सामाजिक प्रतिष्ठा वा स्थान आणि भूमिका (रोल) ह्या संकल्पना प्रथम लिंटन यांनीच मांडल्या. त्याचप्रमाणे ‘आरोपित स्थान’ (ॲस्क्राइब्ड स्टेटस) आणि ‘संपादित स्थान’ (अचिव्हड स्टेटस) ह्याही संकल्पना त्यांच्या विश्लेषणासहित त्यांनी मांडल्या. स्थान आणि भूमिका यांच्या संरचनात्मक विश्लेषणाने लिंटन यांनी त्या काळी सामाजिक विश्लेषणामध्ये संस्कृतीला जे अवास्तव महत्त्व प्राप्त झाले होते, ते कमी करण्यास हातभार लावला. एखाद्या समाजात प्रचलित असलेले रीतिरीवाज आणि इतर सांस्कृतिक बंधने यांमुळे प्रत्येक समाजिक स्थानावरील व्यक्तीची भूमिका प्रमाणित बनते. त्यामुळे समाजात स्थानानुसार व्यक्तीमत्वाचे नमुने निर्माण होतात, असे त्यांनी प्रतिपादन केले. हाच व्यक्तिमत्वाचा सामाजिक संदर्भ वा आधार होय.

प्रसिद्ध आंग्‍ल सामाजिक मानवशास्त्रज्ञ ⇨ रॅडक्‍लिफ- ब्राऊन (१८८१-१९५५) हे लिंटनचे समकालीन होते परंतु शिकागो विद्यापीठात असताना रॅडक्‍लिफ ब्राऊन यांच्या विचारांच्या विद्यार्थिवर्गावरील प्रभावाबद्दल लिंटन यांनी खेद व्यक्त केला होता. कारण लिंटन हे स्वतः सामाजिक विश्लेषणातील ऐतिहासिक अभिक्रमाचे (अप्रोच) महत्त्व मानणारे होते परंतु रॅडक्‍लिफ ब्राऊन यांच्या संरचनात्मक कार्यात्मक (स्ट्रक्चरल-फंक्शनल) अभिक्रमामध्ये ऐतिहासिक मागोवा घेण्याला काही स्थान नव्हते. त्यामुळे मानवशास्त्राच्या भवितव्यालाच धोका आहे, असे लिंटन यांना वाटले. त्या दोघांमध्ये नंतर झालेल्या चर्चेचा परिणाम म्हणून संरचनात्मक-कार्यात्मक विश्लेषणामध्ये ऐतिहासिक घटकांची दखल घ्यावी, विचारसरणीचा पुरस्कार करण्यात आला.

त्यांची द ट्रि ऑफ कल्चर हा ग्रंथ संस्कृतीविकासाचा सखोल व काटेकोर अभ्यास म्हणून विद्वन्मान्य झाला आहे. जगात प्रादेशिक संस्कृती कशी उदयाला येते आणि तिचा कसा-कसा विकास होत जातो, तसेच संस्कृतीच्या प्रादेशिक स्वरूपाला भौगोलिक परिस्थिती कशी कारणीभूत असते, याचे विवेचन या ग्रंथात आले आहे. भौगोलिक मर्यादा अगर सोयी नसत्या, तर काही शोध लागलेच नसते असे त्यांचे म्हणणे होते. प्रेमावर आधारित विवाहाची पद्धत केवळ अमेरिकी समाजातच दिसून येते. असेही त्यांचे मत होते. 

लिंटन यांना भौतिकीतही गती होती आणि इतिहास व साहित्य यांचेही ते व्यासंगी होते. 

संदर्भ : Kluckhohn, Clyde, Ralph Linton, Biographical Memoirs, Vol 31, Oxford, 1958.

कुलकर्णी, मा. गु.