लॉरेसी : (तमाल कुल). फुलझाडांपैकी [⟶ वनस्पति, आवृतबीज उपविभाग] या कुलाचा समावेश ⇨ जॉन हचिन्सन यांनी लॉरेलीझ अथवा तमाल गणात व ⇨ आडोल्फ एंग्‍लर यांनी ⇨ रॅनेलीझ अथवा मोरवेल गणात केलेला आढळतो. या कुलात सु ४०-४५ प्रजाती व १,०००-१,१०० जाती असून त्या सर्व वनस्पती वृक्ष किंवा झुडपे आहेत (अपवाद : जीवोपजीवी आकाशवेल : कॅसिथा). त्यांचा प्रसार बहुतांशी उष्ण कटीबंधीय आशिया व ब्राझील, चिली ते उत्तरेस कॅनडापर्यंत झालेला आढळतो. ऑस्ट्रेलिया, दक्षिण चीन, जपान, आफ्रिका व दक्षिण यूरोप (भूमध्य सामुद्रिक प्रदेश) येथेही काही जाती आढळतात. भारतात सु. २० प्रजाती आणि महाराष्ट्रात सु. ८ प्रजाती व १५ जाती आहेत. ह्या वनस्पती घनदाट जंगलात (उदा ., कारवार, महाबळेश्वर, आसाम, बंगाल इ.) आढळतात. यांच्या खोडावरील साल गुळगुळीत असून पाने साधी, एकाआड एक, कचित समोरासमोर, चिवट, गुळगुळीत, कचित गळणारी, सदैव हिरवी व प्रपिंडयुक्त (तेलाच्या ग्रंथींचे ठिपके दर्शविणारी असतात. विविध प्रकारच्या फुलोऱ्यांवरची फुले लहान, हिरवट किंवा पिवळट, द्विलिंगी किंवा एकलिंगी (व विभक्त झाडांवर) अरसमात्र (कोणत्याही उभ्या पातळीने दोन सारखे भाग होणारी), त्रिभागी (प्रत्येक मंडलात तीन भाग-पुष्पदले-असणारी) व परिकिंज (इतर पुष्पदले किंजदलांच्या पातळीवर असणारी) असतात. प्रत्येक फुलात पाकळ्या नसून सहा (किंवा क्वचित चार) परिदले दोन मंडलांत असतात व तळाशी ती जुळलेली असतात, त्यांची नलिका बहुधा फळाबरोबर वाढून त्याच्या तळाशी चिकटून कायम राहते. फुलात केसरदले बहुधा १२ असून त्यांची ४ मंडले असतात व सर्वांत आतील मंडलात बहुधा वंध्य केसरदले आढळतात (उदा., ॲव्होकॅडो व तमाल)किंवा त्यांचा अभाव असतो. कधीतर एक किंवा दोनच केसरमंडले कार्यक्षम असतात. परागकोशात २ किंवा ४ कोटर असून त्यांना खालून वर उघडणाऱ्या झडपा असतात. किंजदले तीन, जुळलेली किंवा एक व किंजपुटात एकच कप्पा व त्यात एकच बीजक (लोंबते व अधोमुख) असून बहुधा किंदल्क त्रिखंडी असतो, किंजपुट ऊर्ध्वस्थ (क्वचित अधःस्थ) [⟶ फूल] फळ आठळीयुक्त किंवा मृदुफळ असून ते पुष्पस्थलीने किंवा परिदलांच्या तळाने कमीजास्त वेढलेले असते. बियांत पुष्क (दलिकाबाहेरील अन्नांश) नसते. मॅग्‍नोलिएसी (चंपक कुल), ॲनोनेसी (सीताफल कुल) व मिरीस्टिकेसी (जातिफल कुल) यांच्याशी लॉरेसीचे निकट आप्तसंबंध आहेत व त्याचा उगम रॅनेलीझमधून झाला असावा. या कुलातील अनेक वनस्पती उपयुक्त (सुगंधी तेले, फळे, लाकूड इत्यादीकरीता) असून सॅसॉफ्रस, फुडगूस, लॉरेल, दालचिनी, तमाल, कापूर, ॲव्होकॅडो, मैदालकडी इ. महत्त्वाच्या आहेत व मराठी विश्वकोशात यांवर स्वतंत्र नोंदी आहेत.

संदर्भ : 1. Lawrence, G. H. M. Taxonomy of Vascular Plants, New York, 1965.

           2. Rendle, A. B. The Classfication of Flowering plants, Vol. ll, Cambridge, 1963.

जमदाडे, ज. वि. परांडेकर, शं. आ.