लाला ग्रंथि : पृष्ठवंशी (पाठीचा कणा असलेल्या) प्राण्यांत मुखगुहेत (तोंडाच्या पोकळीत) लाळेचे स्त्रवण करणाऱ्या ग्रंथींना लाला ग्रंथी म्हणतात. जीभ, तालू, व गाल यांतील अनेक लहान लहान लाला ग्रंथींखेरीज मानवात प्रमुख लाला ग्रंथींच्या तीन जोड्या असतात आणि सुविकसित वाहिन्यांद्वारे त्या मुखगुहेत उघडतात. या प्रमुख ग्रंथींना त्यांच्या स्थानावरून पुढील नावे दिली गेली आहेत : (१) अनुकर्ण ग्रंथी, (२) अधोहनु ग्रंथी आणि (३) अधोजिव्हा ग्रंथी. लाल ग्रंथी प्राधान्याने लसी द्रव, श्लेष्मल द्रव किंवा दोन्ही प्रकारच्या द्रवांचे मिश्रण स्त्रवणारी असते. श्लेष्मल द्रव दाट, स्वच्छ, काहीसा चिकट व बुळबुळीत असतो. लसी द्रव स्त्राव अधिक द्रवरूप (पातळ) व स्वच्छ असतो. ग्रंथीमध्ये असलेल्या कोशिकांच्या (पेशींच्या) प्रकारानुसार या ग्रंथी दोहोंपैकी एकच किंवा मिश्र स्वरूपाचा द्रव स्त्रवतात.
अनुकर्ण ग्रंथी : वरील तीन ग्रंथींपैकी सर्वांत मोठी असलेली ही ग्रंथी बाह्यकर्णासमोर असते. तिचा स्त्राव नील्स स्टेनसन या डॅनिश शारीरविज्ञांच्या नावावरून ओळखण्यात येणाऱ्या स्टेनसन वाहिनीद्वारे वरच्या जबड्यातील दुसऱ्या दाढेशेजारीच सूक्ष्म छिद्रातून मुखगुहेत जातो. प्रत्येक ग्रंथी ऊतकाच्या (समान कार्य व रचना असलेल्या कोशिकांच्या समूहाच्या) संपुटात वेष्टित असून ती वसायुक्त (स्निग्ध पदार्थयुक्त) ऊतक आणि कोशिका यांची बनलेली असते. लाळेतील लसी द्रव प्रामुख्याने याच ग्रंथीत तयार होतो.
अधोहनू ग्रंथी : या ग्रंथी खालच्या हन्वस्थीच्या (जबड्याच्या हाडाच्या) बाजूवर असतात. यांचा स्त्राव टॉमस व्हॉर्टन या ब्रिटिश शारीरविज्ञांच्या नावावरून ओळखण्यात येणाऱ्या व्हॉर्टन वाहिनीद्वारे जिभेचा अग्रभाग मुखाच्या तळाला जेथे मिळतो तेथील मुखाच्या तळावरील सूक्ष्म छिद्रातूंन तोंडात सोडला जातो. या ग्रंथीभोवतीही ऊतक संपुट असते.
अधोजिव्हा ग्रंथी : या ग्रंथी जिभेच्या खालच्या बाजूस मुखतळाच्या श्लेष्मकलेच्या (पातळ अस्तर-पटलाच्या) खाली हनुवटी क्षेत्राच्या जवळ अधोहनू ग्रंथीच्या जरा पुढे असतात. जिव्हाग्राखाली दिसणारा उंचवटा या ग्रंथीमुळेच असतो. या ग्रंथींचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या भोवती ऊतक संपुट नसते व त्या त्यामुळे भोवतालच्या संपूर्ण ऊतकात विखुरलेल्या असतात. या ग्रंथींना अनेक वाहिन्या (यांना जर्मन शारीरविज्ञ ए. क्यू. रिव्हीनुस यांच्या नावावरून रिव्हीनूस वाहिन्या म्हणतात) असून त्यांच्याद्वारे मुखतळ व जीभ यांच्या संधिस्थानापाशी लाळ सोडली जाते. या वाहिन्यांपैकी कित्येक वाहिन्या एकत्रित होऊन सी. टी. बार्थोलिन या डच शारीरविज्ञांच्या नावाने ओळखण्यात येणारी बार्थोलिन वाहिनी बनते व तिच्याद्वारे अधोहनू ग्रंथीत वा तिच्याजवळ लाळ सोडली जाते.
लाळ : अनुकर्ण ग्रंथीत लसी कोशिका असतात व त्यामुळे त्यांचा स्त्राव लसी किंवा अल्ब्युमीनयुक्त पाणीदार असतो. या स्त्रावात म्युसीन हे ग्लायको प्रथिन नसते पण खनिज लवणे, इतर प्रथिने व ॲमिलेज किंवा टायलीन (पाचक एंझाइम-जीवरासायनिक विक्रिया घडून येण्यास मदत करणारे प्रथिन) यांचे प्रमाण जास्त असते आणि त्यामुळे त्याची पाचन शक्ती उच्च असते. अधोहनु या अधोजिव्हा ग्रंथीत श्लेष्मल व लसी या दोन्ही प्रकारच्या कोशिका असतात. त्यांतून स्त्रवणारी लाळ जास्त चिकट असते व तीत म्युसीन जास्त प्रमाणात असते. इतर लहान लाला ग्रंथीचा स्त्राव बहुतांशी म्युसीनयुक्तच असतो. एकूण लाळेत प्रामुख्याने पाणीच जास्त प्रमाणात (९८-९९.५%) असते आणि याखेरीज अमायलेज व म्युसीन ही द्रव्ये असतात. अमायलेजामुळे कार्बोहायड्रेटांचे थोड्या प्रमाणात पाचन होते, तर म्युसिनामुळे लाळेच्या वंगणासारख्या होणाऱ्या कार्यात मदत होते. रक्तप्लाविकेत [रक्तातील द्रव पदार्थात मात्र यात रक्त साखळल्यानंतर मिळणाऱ्या रक्तरसातील द्रव्यांखेरीज फायब्रिनाचे पूर्वगामी द्रव्यही असते ⟶ रक्त] आढळणारे सर्व पदार्थ लाळेतही आढळतात मात्र त्यांचे प्रमाण रक्तप्लाविकेतील प्रमाणापेक्षा भिन्न असते. ⇨ रक्तगट निर्धारित करण्यासाठी आवश्यक असणारे पदार्थ सु. ८०% व्यक्तींच्या लाळेत असतात. या व्यक्तींच्या लाळेतील रक्तगट पदार्थांची कार्यशीलता रक्तातील तांबड्या कोशिकांपेक्षा शेकडो पट जास्त असते. या गोष्टीला न्यायवैद्यक शास्त्रात मोठे महत्त्व आहे, कारण एखाद्या व्यक्तीने नुकत्याच वापरलेल्या पिण्याच्या पात्रावरील किंवा टाकून दिलेल्या सिगारेटच्या थोटकावरील लाळेवरून त्या व्यक्तीचा रक्तगट निर्धारित करणे आणि त्यावरून तिची ओळख पटविणे शक्य असते.
स्त्रवण नियंत्रण व प्रमाण : लाला ग्रंथींच्या स्त्रवणावर स्वायत्त तंत्रिका तंत्राचे [विशेषतः परानुकंपी तंत्रिका तंत्र विभागाचे ⟶ तंत्रिका तंत्र] नियंत्रण असते. तोंडात असलेल्या अन्नामुळे ⇨प्रतिक्षेपी क्रियेने लाळेचे स्त्रवण होते. लाळेच्या स्त्रवणाचे सहजपणे अवलंबीकरण होते आणि अन्न पाहिल्याने, त्याचा वास आल्याने किंवा मानवाच्या बाबतीत केवळ त्याच्या विचाराने सुद्धा लाळेच्या स्त्रवणात वाढ होते. लाळेचा मूळ प्रवाह तोंडात उत्पन्न होणाऱ्या संवेदनांद्वारे अनैच्छिकपणे सतत चालू राहातो. लाळ उत्पन्न होण्याचे प्रमाण वय, आजार, दिवसातील विशिष्ट वेळ, आहार यांनुसार कमी जास्त होऊ शकते. आजारामुळे लाळेच्या उत्पादनाचे प्रमाण कमी होते व त्यामुळे आजारात तोंड सारखे कोरडे पडते. तीव्र आंबट चवीच्या अन्नामुळे वा पदार्थामुळे लाळेचे स्त्रवण त्वरेने वाढते. चिंच, आवळा यांसारख्या अम्लोत्पादक पदार्थांमुळे व शुष्क अन्नामुळे लसी लाळेचे उत्पादन जास्त प्रमाणात होते. दूध व थंड पेये यांमुळे श्लेष्मल लाळेचे थोड्या प्रमाणात स्त्रवण होते. मासे, मटन इ. मांस पदार्थांमुळे लाळेचे स्त्रवण खूप मोठ्या प्रमाणात होते व या लाळेत पाचक एंझाइमाचे प्रमाण पुष्कळच जास्त असते. मुखगुहेच्या गरजेप्रमाणे लाळेचे स्त्रवण वाढविणारी एक संस्कारपूर्ण यंत्रणा शरीरात असते, असे इव्हान पाव्हलॉव्ह व त्यांचे सहकारी यांनी प्रथम दाखविले. याखेरीज लाळेचे स्त्रवण (निदान प्राण्यांत तरी) पूर्णपणे मुखबाह्य उद्यीपनावर अवलंबित करणे शक्य असते. उदा., भुकेल्या कुत्र्याला त्याचे खाणे द्यावयाच्या प्रत्येक वेळी घंटा वाजविली, तर नंतर लवकरच अन्न न देता नुसतीच घंटा वाजविल्यास त्या कुत्र्याच्या तोंडात लाळेचे स्त्रवण होऊ लागते, असे आढळून आले आहे.
सर्वसामान्यतः समजण्यात येते त्यापेक्षा किती तरी जास्त परिमाणात लाळेचे स्त्रवण होते. सर्वसामान्य माणसाने एका दिवसात स्त्रवलेली लाळ अचूकपणे मोजण्यात आलेली नाही तथापि विश्रांत व उद्यीपित परिस्थितीतील लाळ स्त्रवणासंबंधीच्या उपलब्ध माहितीवरून दैनंदिन स्त्रवण सु. ६०० मिलि. होत असावे, असा अंदाज आहे. मानवातील लाला ग्रंथींची स्त्रवणक्षमता सर्वसामान्यतः उपयोगात आणण्यात येणाऱ्या त्यांच्या क्षमतेपेक्षा कितीतरी जास्त आहे, कारण सतत तीव्र उद्यीपनाच्या परिस्थितीत सामान्य निरोगी मनुष्यात दर ताशी सु. ३०० मिलि. लाळेचे स्त्रवण होऊ शकते. शुष्क चाऱ्यावर ठेवलेले घोडे, गायी व मेंढ्या यांसारखे प्राणी दर दिवशी ६० लिटरपर्यंत लाळ उत्पादित करू शकतात. मानवी लाळेचे विशिष्ट गुरूत्व १.०० ते १.०१० या दरम्यान असून तिच्या स्त्रवणाच्या वाढत्या प्रमाणानुसार ते वाढत जाते. लाळ द्रवाचा पाण्यात फारसा व्यय होत नाही. त्याचा बहुतांश मोठ्या आतड्यात मलनिर्मिती होताना पुनर्शोषित होतो.
कार्य : लाळेमुळे अन्न मऊसर व ओलसर होत असल्याने ते गिळल्यास सुलभ जाते. लाळेमुळे तोंडाचा आतील भाग ओलसर राहतो व म्युसिनामुळे वंगणासारखी क्रिया होत असल्याने बोलताना तोंडाच्या सुलभपणे हालचाली होऊ शकतात. अन्नातील घटक प्रथम लाळेत विरघळतात आणि त्यानंतर जिभेवरील व तोंडातील अन्य भागांवरील रूचिकलिका [⟶ जीभ] उत्तेजित झाल्याने अन्नाची चव चांगल्या प्रकारे कळू शकते. शरीरातील पाण्याचे संतुलन राखण्यास लाळेची मदत होते जर पाण्याचे प्रमाण कमी झाले, तर लाला ग्रंथींचे निर्जलीभवन होऊन तोंड कोरडे पडते आणि त्यामुळे तहानेची संवेदना उत्पन्न होऊन पाणी पिण्याची गरज निर्माण होते. लाळेमुळे मुखगुहेतील सर्व अवयव व दात स्वच्छ राहातात. तोंडातील मागे राहिलेले अन्नकण, मृत कोशिका, सूक्ष्मजंतू कोशिका, श्वेत कोशिका इ. काढून टाकण्यास लाळेची मदत होते. त्यामुळे दात किडण्याच्या क्रियेस आणि सूक्ष्मजंतूच्या संक्रामणास व वाढीस आळा बसतो. लाळेत लायसोझोम व अन्य सूक्ष्मजंतुविरोधी पदार्थ असतात, तसेच सौम्य रक्तस्त्रावरोधक पदार्थही असतो. यामुळे जिभेने जखम चाटल्यास रक्तस्त्राव थांबण्यास व जखम बरी होण्यास मदत होते. प्राण्यांमध्ये हा गुणधर्म विशेष उपयुक्त असल्याचे दिसून येते. काही प्राण्यांच्या लाळेतील विषारी पदार्थामुळे त्यांना शत्रुपासून संरक्षण करण्यास मदत होते.
विकार : लाला ग्रंथींच्या सर्वसामान्य विकारांमुळे लाळेच्या उत्पादनावर परिणाम होतो. लाळेचा प्रवाह लक्षणीय प्रमाणात कमी झाल्यास मुखशुष्कता उद्भवते आणि तीमुळे मुखातील श्लेष्मल पटलांचा क्षोभ, झीज व व्रणोत्पत्ती होऊन परिबंधन विकार (हिरड्या वगैरे दाताच्या आधार-ऊतकांचे विकार) होण्याची व दात किडण्याची शक्यता वाढते. प्रमुख लाला ग्रंथी व त्यांच्या वाहिन्या यांना स्थानिक स्वरूपाची इजा झाल्यास तीमुळे मुखावर फारसा महत्त्वाचा परिणाम होत नाही पण अनुकर्ण व अधोहनू भागांत सूज, वेदना व अस्वस्थता उद्भवतात. अधोजिव्हा ग्रंथींना अर्बुदासारखा (नवीन कोशिकांच्या अत्यधिक वाढीमुळे निर्माण होणाऱ्या गाठींसारखा) स्थानिक स्वरूपाचा विकार क्वचितच होतो.
मुखशुष्कता : अनुकंपी तंत्रिकेशी [⟶ तंत्रिका तंत्र] सदृश अशी क्रिया करणारी औषधे, भावनात्मक विक्षोभ, ग्रंथिक्षेत्रावर प्रारण (तरंगरूपी ऊर्जा) पडल्यामुळे ग्रंथींचा होणारा ऱ्हास, वयोवृद्धीनुसार होणारे अपक्षयात्मक बदल, ग्रंथिक रोग(फुप्फुसे, त्वचा इत्यादींमध्ये खऱ्या क्षयपीटिकेसारख्या गाठी होणारा रोग) व एच्.एस्.सी. स्येग्रेन या स्वीडिश नेत्रवैद्यांच्या नावाने ओळखण्यात येणारा स्येग्रेन रोग (चिरकारी दाहयुक्त सूज असणारा रोग) यांसारखे रोग अशा कारणांमुळे मुखशुष्कता निर्माण होऊ शकते. ⇨गालंगुडासारखा तीव्र संसर्ग अल्पकाळच टिकतो व त्याच्यामुळे क्वचितच कायम स्वरूपाचा लाला ग्रंथीय रोग होतो पण तात्पुरती मुखशुष्कता येते. वाहिनीमध्ये अश्मरी (खडा) तयार झाल्याने वा आकस्मिक इजेमुळे वण तयार झाल्याने लाळ स्त्रवणाचे प्रमाण कमी होऊ शकते पण बहुधा उर्वरित ग्रंथींचे स्त्रवण कार्य पुरेसे असते. त्याचप्रमाणे अर्बुदामुळेही लाळ स्त्रवणावर परिणाम होतो पण तो गौण स्वरूपाचा असतो. स्येग्रेन रोगात [हा रोग कदाचित स्वयंरोगप्रतिकारक्षमताजन्य असावा ⟶ रोगप्रतिकारक्षमता] लाला ग्रंथी नाश पावत असल्याने हा रोग मुखशुष्कतेचे एक प्रमुख कारण आहे. मुखशुष्कता कमी करणारे काही कृत्रिम पदार्थ तयार करण्यात आलेले आहेत.
ग्रंथीय वाहिनी अवरोध : स्टेनसन किंवा व्हॉर्टन वाहिन्यांमध्ये शोथयुक्त (दाहयुक्त सूज असलेली) तंत्वात्मकता किंवा अश्मरी तयार झाल्याने ग्रंथीला फुगवटा येतो व तो बहुधा वेदनायुक्त असतो. वाहिनी अवरोधामुळे तोंडातील सूक्ष्मजंतू उलट दिशेने पसरू शकतात व त्यामुळे लाला ग्रंथिशोध उद्भवतो. असे संसर्गाचे उलट प्रसारण वाहिनी अवरोधाशिवाय क्वचितच घडून येते पण शस्त्रक्रियेतील शुद्धिहरणात (भूल देण्यात) काही वेळा असे प्रसारण होते आणि त्याला ‘शस्त्रक्रियापश्च अनुकर्ण ग्रंथिशोथ’ म्हणतात.
अर्बुदे : लाला ग्रंथींच्या सौम्य व मारक अर्बुदांचे अनेक प्रकार आहेत. सामान्यतः अर्बुदे अनुकर्ण ग्रंथींत ७५ ते ८५% , अधोहनू ग्रंथीत १० ते २०% आणि राहिलेली गौण (मुख्यत्वे तालूतील) लाला ग्रंथीत आढळून येतात. सौम्य व मारक अर्बुदांचे गुणोत्तर निरनिराळ्या ग्रंथींच्या बाबतीत निरनिराळे असल्याचे आढळते अनुकर्ण ग्रंथी ३- ५ : १, अधोहनू ग्रंथी २ : १ तालूतील ग्रंथी १ : १. यावरून गौण लाला ग्रंथीचे अर्बुद अनुकर्ण ग्रंथीच्या अर्बुदापेक्षा मारक असण्याची शक्यता पुष्कळच जास्त असल्याचे दिसून येते. लाला ग्रंथींची अधिस्तरीय मारक अर्बुदे मंद गतीने प्रगत होतात आणि त्यांत स्थानिक पुनरावर्तने, संलग्न भागात आक्रमण, उशिरा निर्माण होणारे ⇨प्रक्षेप व मृत्यू अशी लक्षणे आढळतात.निदान झालेली ग्रंथीय मारक अर्बुदे सामान्यतः २ ते ६ सेंमी. व्यासाची असतात व स्पर्श केल्यास गतिशील असतात. ती मंद गतीने मोठी होतात, अन्यत्र आक्रमण व प्रक्षेप निर्माण करीत नाहीत आणि वेदनारहित असतात. आक्रमक मारक अर्बुदांचा आनन (चेहऱ्याच्या) तंत्रिकेशी निकटचा संबंध असल्याने त्यांच्यामुळे वेदना, बधिरता, चुरचुरणे किंवा प्रत्यक्ष तंत्रिका गोवली गेलेली असल्यास आनन तंत्रिका पक्षाघात ही लक्षणे संभवतात. सौम्य अर्बुदे बहुधा ४५ वर्षाच्या सुमारास होतात आणि अनुकर्ण ग्रंथींची मारक अर्बुदे होणाऱ्या व्यक्तीचे वय सरासरीने यापेक्षा थोडे जास्त आढळते. सौम्य अर्बुदांच्या बाबतीत लक्षणांचा काळ सुमारे दोन वर्षे, तर मारक अर्बुदाच्या बाबतीत ते नऊ ते दहा महिने असल्याचे दिसून आले आहे. व्यवच्छेदक निदानासाठी आकारविज्ञानीय विश्लेषण व प्रत्यक्ष ऊतकाचा तुकडा काढून ⇨जीवोतक परीक्षा करणे अधिक विश्वसनीय ठरते.
संदर्भ: 1. Grollman, S. The Human Body, New York, 1964.
2. Robbins, S. L. and others Pathologic Basis of Disease, Philadelphia, 1984.
“