लाल, देवेंद्र : (१४ फेब्रुवारी १९२९ –   ). भारतीय भौतिकीविज्ञ. पृथ्वीविज्ञान आणि अवकाशविज्ञान या विषयांतील अणुकेंद्रीय भौतिकीचे व रसायनशास्त्राचे अनुप्रयोग यासंबंधी त्यांनी विशेष संशोधन केलेले आहे.

लाल यांचा जन्म वाराणसी येथे झाला. त्यांनी बनारस हिंदू विद्यापीठाची एम्.एस्‌सी. व मुंबई विद्यापीठाची पीएच्.डी. या पदव्या मिळविल्या. ते मुंबई येथील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च या संस्थेत सहयोगी प्राध्यापक (१९६०-६३), प्राध्यापक (१९६३-७०) व वरिष्ठ प्राध्यापक (१९७०-७२) होते. १९६५-६६ मध्ये त्यांनी कॅलिफोर्निया विद्यापीठात अभ्यागत प्राध्यापक म्हणून काम केले आणि १९६७ पासून सॅन डिएगो येथील स्क्रिप्स इन्स्टिट्यूशन ऑफ ओशियानोग्राफी या संस्थेत ते अर्धवेळ प्राध्यापक आहेत. अहमदाबाद येथील फिजिकल रिसर्च लॅबोरेटरीचे १९७२-८३ मध्ये ते संचालक होते व तेथेच १९८३ पासून वरिष्ठ प्राध्यापक आहेत.

लाल यांनी वैश्विक भूभौतिकी आणि तीत किरणोत्सर्गी समस्थानिकांच्या मार्गण तंत्राद्वारे [⟶ अणुऊर्जेचे शांततामय उपयोग] अन्वेषण करणे यांविषयी महत्त्वाचे कार्य केले. भूभौतिकीय परिस्थितीत विश्वकिरणांद्वारे (बाह्य अवकाशातून पृथ्वीवर येणाऱ्या भेदक किरणांद्वारे) तयार झालेल्या अनेक किरणोत्सर्गी समस्थानिकांचा त्यांनी शोध लावला. त्यांनी भारतीय पुरातत्त्वविद्येच्या ⇨किरणोत्सर्गी कार्बन   कालनिर्णय  पद्धतीने करण्यात आलेल्या अभ्यासात सहकार्य केले. अशनी (बाह्य अवकाशातून पृथ्वीवर येऊन पोहोचलेले पृथ्वीबाहेरचे पदार्थ) व चांद्र द्रव्य यांतील किरणोत्सर्गी अणुकेंद्रीय जातींच्या (प्रोटॉनांची संख्या, न्यूट्रॉनांची संख्या व अणुकेंद्रातील ऊर्जासंचय यांनी विशेषित होणाऱ्या आणि सामान्यतः १०-१० सेकंदापेक्षा अधिक आयुर्मान असलेल्या अणूंच्या जातींच्या) मार्गासंबंधीही त्यांनी संशोधन कार्य केले.

लाल यांनी पुढील पदांवरही काम केलेले आहे : उपाध्यक्ष, इंडियन ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस, बंगलोर (१९७८-८२) अध्यक्ष, इंटरनॅशनल ॲसोसिएशन फॉर फिजिकल सायन्सेस ऑफ द ओशन (१९७९-८२) अध्यक्ष, इंटरनॅशनल युनियन ऑफ जिओडेसी अँड जिओफिजिक्स (१९८३-८७) अध्यक्ष, इंडियन जिओफिजिकल युनियन (१९८०-८२) विदेशी सचिव, इंडियन नॅशनल सायन्स ॲकॅडेमी, नवी दिल्ली (१९८१-८४) सदस्य, केंद्रीय मंत्रिमंडळाची वैज्ञानिक सल्लागार समिती (१९७९-८३) सदस्य, वर्ल्ड मिटिऑरॉलॉजिकल ऑर्गनायझेशनची संयुक्त वैज्ञानिक समिती (१९७९-८३) सदस्य, युनेस्कोचा सागरी प्रदूषणाच्या वैज्ञानिक स्वरूपासंबंधीचा तज्ञांचा गट (१९७९-८१). ते इंडियन ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस, बंगलोर इंडियन नॅशनल सायन्स ॲकॅडमी, नवी दिल्ली व सेंटर ऑफ द अर्थ सायन्सेस, कोचीन या भारतीय वैज्ञानिक संस्थांचे सदस्य आहेत. त्याचप्रमाणे ते लंडनच्या रॉयल सोसायटीचे सदस्य (१९७९), अमेरिकेच्या नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचे परदेशी सहयोगी सदस्य (१९७५), अमेरिकेच्या मिटिऑरिटिकल सोसायटीचे सदस्य, इटलीतील थर्ड वर्ल्ड ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचे संस्थापक सदस्य (१९८३),  रॉयल ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे सहयोगी सदस्य (१९८४) व इंटरनॅशनल ॲकॅडेमी ऑफ ॲस्ट्रॉनॉटिक्सचे सदस्य (१९८५) आहेत. त्यांना मिळालेल्या सन्मानांत इंडियन जिओफिजिकल युनियनचे भूरसायनशास्त्र व भूभौतिकीचे कृष्णन पदक (१९६५), कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्चचे भौतिकीचे शांतिस्वरूप भटनागर पारितोषिक (१९६७), पद्मश्री हा राष्ट्रीय पुरस्कार (१९७१), फेडरेशन इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचा विज्ञान व तंत्रविज्ञा पुरस्कार (१९७४), बनारस हिंदू विद्यापीठाची सन्माननीय डी.एस्‌सी. पदवी (१९८१) आणि जवाहरलाल नेहरू पुरस्कार (१९८६) यांचा समावेश आहे. विविध वैज्ञानिक नियतकालिकांतून त्यांचे २०० हून अधिक संशोधन व पुनर्विलोकनात्मक निबंध प्रसिद्ध झालेले आहेत. अर्ली सोलर सिस्टिम प्रोसेसेस अँड द प्रेझेंट सोलर सिस्टिम या ग्रंथाचे त्यांनी संपादन केलेले आहे.

 फाळके, धै. शं.