लायसीन : प्राण्यांच्या वाढीस आवश्यक असलेले एक ⇨ ॲमिनो अम्ल. हे आल्फा एप्सायलॉन-डायॲमिनो- कॅप्रॉइक अम्ल या नावानेही ओळखले जाते. रेणवीय सूत्र (रेणूतील अणूंचे प्रकार व त्यांच्या संख्या दर्शविणारे सूत्र) C6H14O2N2, संरचना सूत्र (रेणूतील अणूंची मांडणी दर्शविणारे सूत्र) खालीलप्रमाणे आहे.

लायसिनाची रेणवीय संरचना

या संरचनेतील तारांकित कार्बन अणू असममित (ज्याला चार वेगवेगळे अणू अथवा अणुगट जोडलेले आहेत असा) असल्यामुळे याचे दोन प्रकाशीय समघटक आहेत. त्याचे D व L हे विन्यासही ज्ञात आहेत. निसर्गात सामान्यतः L विन्यास आढळून येतो. (प्रकाशीय समघटक D व L चिन्हे तसेच खाली दिलेले भौतिक स्थिरांक यांच्या स्पष्टीकरणासाठी) ‘ॲमिनो अम्ले’ या नोंदीतील ‘भौतिक गुणधर्म’ हा परिच्छेद पहावा).

२५° से. तापमानाला वामवलनी समघटकाच्या भौतिक स्थिरांकांची मूल्ये खालीलप्रमाणे आहेत :

pK1 (COOH) : २.१८ pK2 (NH3+) : ८.९५ pK3(ϵ. NH3+) : १०.५३

 समविद्युत भार बिंदू : ९.७४.

प्रकाशीय वलन : (α)D (पाण्यात): + १३°.५

                             (α)D (५ सममूल्यी हायड्रोक्लोरिक अम्लात):   +२६°.०

 हे प्रथम ई. ड्रेक्सेल यांनी १८८९ मध्ये व पुढे एस्. जी. हेडीन यांनी १८९५ मध्ये प्रथिनांचे जलीय विच्छेदन (पाण्याच्या विक्रियेने संयुगाच्या रेणूचे तुकडे करण्याची क्रिया) करून अलग केले. याची संरचना १९०२ मध्ये एमील फिशर व एफ्. व्हिगर्ट यांनी सिद्ध केली आणि त्यांनी त्याचे संश्लेषणही (कृत्रिम रीतीने तयारही) केले. आर्. गौड्री यांनी १९४८ मध्ये शोधून काढलेल्या पद्धतीने डाय-हायड्रोपायरानापासून याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करतात. प्राणिजन्य प्रथिनांत लायसीन बहुधा असते पण वनस्पतिजन्य प्रथिनांत ते अत्यल्प वा अजिबात नसते. ग्लायडिन, केसीन, फायब्रीन, जिलेटीन, हीमोग्लोबिन या प्रथिनांत ते अधिक प्रमाणात आढळते पण धान्यातील झाईन प्रथिनात ते नसते.

माणसांच्या व प्राण्यांच्या वाढीसाठी लायसीन आवश्यक असल्याने त्याचा आहारात समावेश करणे जरूरीचे असते. याकरिता पाव व इतर खाद्यपदार्थांत तसेच पशुखाद्यांत लायसिनाचा पुष्टीकारक म्हणून समावेश करण्यात येतो. मनुष्याच्या आहारात लायसिनाची दैनंदिन गरज ०.८ ग्रॅ. आहे. ते आहारात कमी पडल्यास सल्फेटे जास्त प्रमाणात शरीराबाहेर टाकली जातात, चक्कर येते व धातूंचा आवाज नकोसा वाटतो. सूक्ष्मजीवांच्या संवर्धन माध्यमांत व औषधांतही त्याचा उपयोग करतात.

ॲमिनो-अंतरणाच्या (एक अगर अधिक ॲमिनो गट एका संयुगातून दुसऱ्यात जाण्याच्या) प्रक्रियामंध्ये लायसीन भाग घेत नाही. तथापि सस्तन प्राण्यांमधील ऊतकांतील (समान रचना व कार्य असलेल्या पेशींच्या समूहांतील) आणि काही सूक्ष्मजीवांतील प्रमुख चयापचयात्मक (शरीरात सतत होणाऱ्या भौतिक-रासायनिक घडामोडींतील) विघटनमार्गात लायसिनातील ॲमिनो गट कायमचा वेगळा होतो व आल्फा-कीटो-एप्सायलॉन-ॲमिनो-कॅप्रॉइक अम्ल तयार होते. त्यापासून ग्लुटारिक अम्ल मिळून मग त्याच्या चयापचयामुळे आल्फा-कीटो ग्लुटारिक अम्ल तयार होते.

L-लायसिनाच्या कार्यास प्रतिरोध करणारी आर्जिनीन, ऑक्झॅलायसीन इ. संयुगे माहीत आहेत.

रानडे, अ. चिं. हेगिष्टे, म. द.