लामचित्ता : याचा समावेश फेलिडी (मार्जार) कुलात होत असून निओफेलिस नेब्युलोसा असे याचे शास्त्रीय नाव आहे. याचा प्रसार नेपाळ व सिक्कीमच्या पूर्वेस, दक्षिण चीन, हैनान, तैवान आणि इंडोनेशियाच्या दक्षिणेस, मलेशिया येथे आहे. हा अरण्ये, झुडपाळ जंगले व दलदलीच्या प्रदेशांतही आढळतो. मोठा नर डोके, शरीर व शेपटीसहित १९५ सेंमी. लांब व १८-२० किग्रॅ. वजनाचा असतो. याचे शरीर व शेपटी लांब असते व पाय आखूड असून कान काळे व गोलसर असतात. कानांवर एक करडसर ठिपका असतो. याच्या पायांची संरचना बरीचशी वाघ व सिंहाच्या पायांच्या रचनेसारखी असते. याचे पंजे रुंद असतात. हा वृक्षवासी असूनही पंजे कडक असतात. कवटीची संरचना व दातांची संख्या हा याच्यात व वाघ-सिंहात मुख्य फरक आहे. याच्या वरच्या सुळ्यांची वाढ बरीच झालेली असते. त्यावरून निर्वंश झालेला आणि मोठाले सुळे असलेला (सेबर टुथ्ड) वाघ व सध्या अस्तित्वात असलेले वाघ-सिंह यांसारखे प्राणी यांच्यामध्ये जवळचे नाते असल्याचा पुरावा मिळतो.
लामचित्त्याच्या अंगावरील खुणांमुळे तो सुंदर व त्याच्यासारख्या इतर प्राण्यांपेक्षा वेगळाही दिसतो. शरीराचा रंग सर्वसाधारणतः करडा किंवा मातीसारखा भुरा ते फिकट किंवा गर्द पिवळसर भुरा असून पोट व पायांकडे तो पांढरट किंवा फिकट पिंगट होत जातो. भारतीय प्राण्यांच्या रंगात पिवळा रंग कमी असतो व सामान्यतः ते जास्त गर्द व करड्या रंगाचे असतात. चेहऱ्यावर नेहमीसारख्या खुणा असून गालफडांवर पट्टे असतात. डोक्यावर ठिपके असतात. मधे अरुंद पट्टे किंवा लांबट ठिपके असलेले दोन रुंद पट्टे दोन्ही कानांच्या मधून निघून खांद्यांपर्यंत जातात. ते पुढे वाढून कमीअधिक नियमित आकाराच्या मोठ्या अंडाकृती किंवा लांबट खुणांच्या रूपात पाठीवर जातात. कमीअधिक प्रमाणात काळ्या रंगाने वेढलेले व फिकट मोकळ्या जागी यांनी विभागलेल्या गर्द डागांनी दोन्ही बाजूंवरील अभ्राच्छादित (ढगांनी व्यापल्यासारखी) रचना तयार होते. पाय व पोटाकडील भागांवर मोठ्या ठिपक्यांच्या खुणा असतात व शेपटीवर गोल कडी असतात आणि ती बाजूवर बहुधा अर्धवट पूर्ण असतात.
“