ला फाँतेन, डेनिस अँटनी : (१७ सप्टेंबर १९२९ – ). भारताचे भूतपूर्व हवाई दल प्रमुख. जन्म मद्रास येथे. वडील स्वातंत्र्यपूर्व काळात सैन्यात मेजर होते. ला फाँतेन यांनी नवी दिल्ली येथील राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालयातून पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांना भारतीय हवाई दलात लढाऊ वैमानिक म्हणून कमिशन मिळाले (१९५०). त्याच वर्षी रिटा सिलीन यांच्याशी ते विवाहबद्ध झाले. त्यांना तीन विवाहित कन्या आहेत.
हैदराबादच्या वायुसेना अकादमीचे प्रमुख निदेशक म्हणून त्यांनी काही काळ काम पाहिले. त्याचप्रमाणे वायुसेनेत दोन सैन्यतळांचे व एका लढाऊ स्क्वाड्रनचे प्रमुख म्हणून त्यांनी नेतृत्व केले. वैमानिकी मुख्यालयात एअर-ऑफिसर-इन-चार्ज आणि मध्यवर्ती व पश्चिम हवाई दल विभागांचे एअर-ऑफिसर-कमांडिंग-इन-चीफ म्हणूनही त्यांनी विशेष कामगिरी बजावली. वायुसेनेत विविध पदांवर असताना सैनिक भरतीसंबंधीचे धोरण ठरविण्यात त्यांचा मोठा वाटा होता. त्यांच्या प्रमुखत्वाखाली भारत सरकारने नेमलेल्या ‘ला फाँतेन समिती’ने (१९८२) वायुसेनेतील वैमानिकी ज्ञान, विज्ञान, तंत्र इ. कक्षांतील वैमानिकांची तसेच विमान-साहित्यांची सुरक्षा परिणामकारक व प्रभावी करण्याच्या दृष्टीने एक आचारसंहिता बनविली. ती आजही कार्यवाहीत आणली जाते. याच समितीने विमान अपघात टाळण्याच्या दृष्टीने गेल्या पाच वर्षांतील विमान अपघातांचा संशोधनपूर्ण आढावा घेऊन केंद्र शासनाला काही मौलिक शिफारशी सादर केल्या. त्यांतील काही शिफारशी केंद्राने स्वीकारल्या आहेत (१९८९). भारतीय वैमानिकी संस्थेवरही ते सदस्य होते.
एअर चीफ मार्शल लक्ष्मण माधव कात्रे यांच्या अकाली निधनानंतर (१ जुलै १९८५) ला फाँतेन यांची हवाई दल प्रमुखपदी नेमणूक झाली (३ जुलै १९८५). ला फाँतेन यांनी वायुसेनेत केलेल्या मोलाच्या योगदानाबद्दल भारत सरकारने त्यांना वायुसेना पदक (१९७१), विशिष्ट सेवा पदक (१९७३) व परम विशिष्ट सेवा पदक (१९८४) बहाल करून गौरविले. ३१ जुलै १९८८ मध्ये ते सेवानिवृत्त झाले. छायाचित्रण व गोल्फ हे त्यांचे आवडीचे छंद होत.
बाळ नि. वि.
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..