ला ग्वायरा : व्हेनेझुएलामधील एक प्रमुख सागरी बंदर व नगर लोकसंख्या २०,३४४ ( १९७१ ). देशाच्या उत्तर भागातील कॅरिबियन समुद्रकिनाऱ्यावरील फेडरल डिस्ट्रिक्टमध्ये, तीव्र उताराच्या पर्वत पायथ्याशी असलेल्या अरूंद किनारपट्टीवर ला ग्वायरा वसलेले असून ते या देशाच्या राजधानीपासून ( काराकास ) उत्तरेस १२ किमी. अंतरावर आहे. काराकासचे हे सागरी बंदर आहे. व्हेनेझुएलाची फार मोठी आयात-निर्यात या बंदरातून चालते. हे शहर लॅटिन अमेरिकेतील अत्युत्कृष्ट कृत्रिम बंदरांपैकी एक असून येथे सुकी गोदी व जहाज कारखाना आहे. हे देशातील कॉफी, तंबाखू यांच्या उत्पादनाचे प्रमुख निर्यात बंदर असून द्रुत हमरस्त्याने व लोहमार्गाने काराकासशी जोडलेले आहे. 

इ. स. १५७७ मध्ये ला ग्वायराची स्थापना करण्यात आली. स्पेनच्या व्यापारवादी धोरणामुळे त्याचा विकास संथगतीने झाला. १७४३ मध्ये इंग्‍लिश चाच्यांनी हे शहर लुटले होते. १८१२ मध्ये झालेल्या भूकंपात तसेच देशाच्या स्वातंत्र्य युद्धाच्या काळात नगराची खूप नासधूस झाली. तरीही चर्च, दगडी बुरूजयुक्त किल्ला यांसारख्या काही वास्तू अजूनही येथे पहावयास मिळतात. विस्तृत नागरी प्रदेशाचाच ला ग्वायरा हा एक भाग असून दक्षिणेस ८ किमी. वरील काराकासचा आंतरराष्ट्रीय विमानतळ असलेला माइकेटीया हा विभागही यात येतो. लाकूड कापणे, दारू गाळणे, साबण निर्मिती, कातडी कमावणे इ. उद्योगधंदे शहरात चालतात. विलोभनीय पर्वतीय रेल्वेसाठी प्रसिद्ध असलेल्या जगातील महत्त्वाच्या शहरांपैकी हे एक असून याच्या पूर्वेस समुद्रकिनारी चार किमी. अंतरावरील माकूटो उपनगर सागरक्रीडा व पर्यटनस्थळ म्हणून महत्त्वाचे आहे.  

चौधरी, वसंत