आंतर-अश्मयुगीन सांगाडे, लांघणज.लांघणज : गुजरात राज्यातील एक पुरातत्त्वीय स्थळ. हे मेहसाणा जिल्ह्यात अहमदाबादच्या उत्तरेस सु. २५ किमी. वर आहे. लोकसंख्या ६,८२६ (१९७१). प्राचीन लंगरपूर या नावावरून लांघणज हे नाव रूढ झाले असावे.

भारतात आंतराश्मयुगीन संसकृतीचे अवशेष क्वचित आढळतात, म्हणून लांघणजला १९४१ ते १९६३ दरम्यान अनेक उत्खनने झाली. त्यांत गारगोटीची लहान हत्यारे, दगडाचे कपचे, धारदार छिलके, हाडे, मृद्‌भांडी, शंख, मानवी सांगाडे इ. अनेक अवशेष सापडले. येथे वस्ती करणाऱ्या लोकांनी जवळपासच्या गारगोट्यांपासून ही हत्यारे बनविली. ही संस्कृती प्राचीन अश्मयुग आणि नवाश्मयुग यांच्या दरम्यान केव्हातरी होऊन गेली असावी, असा तज्ञांचा कयास आहे. या संस्कृतीचे लोक तळ्याजवळ वस्ती करीत, पण खापरांचा वापर करीत नसत, असे लांघणजला आढळून आले पण जी थोडी खापरे सापडली ती बहुधा हातानेच बनविलेली असावीत. काही खापरांवर नक्षी कोरलेली आढळली. याशिवाय अगदी वरच्या थरात धातूची दोनच हत्यारे सापडली. उर्वरित सर्व हत्यारे गारगोटीच्या छिलक्यांची बनवलेली असून त्यांना त्रिकोणी, चंद्रकोरीप्रमाणे व टोकदार असे भौमितिक आकार दिलेले होते. मृतांचे एकूण तेरा सांगाडे आतापर्यंत येथे मिळाले आहेत. त्यांवरून असे दिसते की, हातपाय मुडपून मृताला उत्तर-दक्षिण पुरत असत. हे लोक लांब डोक्याचे, उंचेपुरे, सरळ नाकाचे आणि खालचा ओठ थोडासा पुढे असलेले होते. यांना गायबैल, नीलगाय, हरिण, गेंडा, मुंगूस, डुकरे वगैरे जनावरे माहीत होती. शिकार व मच्छीमारी हेच यांचे प्रमुख व्यवसाय असत. मांस खरडण्यासाठी ते दगडी हत्यारेच वापरीत. सापडलेल्या दगडी बसक्या पाट्यावरून ते शाकाहाराचाही काही प्रमाणात अवलंब करीत, असे दिसून आले. लांघणजला सापडलेल्या आंतराश्मयुगीन संस्कृतीच्या तारखा कार्बन १४ पद्धतीनुसार तज्ञांच्या मते इ. स. पू. २५८५ ते २१५० अशा आलेल्या आहेत.

संदर्भ : 1. Sankalia, H. D. Excavations at Langhnaj : 1944-1963, Poona,1965.

           2. Sankalia, H. D. Prehistory and Proto History in India and Pakistan, Bombay, 1962.

  देव, शां. भा.