लॅब्रॅडॉर : कॅनडाच्या पूर्व भागातील पठारी भूप्रदेश. भौगोलिक दृष्ट्या हडसन उपसागरापासून पूर्वेस अटलांटिक महासागरापर्यंत व उत्तरेस सामुद्रधुनीपासून दक्षिणेस ईस्टमन नदी व सेंट लॉरेन्स आखातापर्यंत याचा विस्तार असून क्षेत्रफळ १६,२०,००० चौ.किमी. आहे. राजकीय दृष्ट्या हा प्रदेश क्वीबेक व न्यू फाउंडलंड या प्रांतांमध्ये विभागला गेला आहे. याचा पूर्वेकडील किनारपट्टीचा सु. २,९२,२१८ चौ.किमी. प्रदेश न्यू फाउंडलंड प्रांतात असून तो लॅब्रॅडॉरचा किनारा या नावाने, तर पश्चिमेकडील क्वीबेक प्रांतातील भाग उंगावा द्वीपकल्प या नावाने ओळखला जातो. त्यामुळे सांप्रत लॅब्रॅडॉर हे नाव प्रामुख्याने न्यू फाउंडलंड प्रांतातील प्रदेशापुरते वापरले जाते.

लॅब्रॅडॉर प्रदेश म्हणजे कॅनडाच्या पूर्वेकडील ढालप्रदेश असून तो खडकाळ व प्राचीन कठीण प्रस्तरांनी बनलेला आहे. हा नद्यांनी व हिमप्रवाहांनी अपघर्षण झालेला पठारी भाग असून नद्यांची खोरी, लहानमोठी सरोवरे, गोलाकार लहान टेकड्या, प्रपात, अरुंद खाड्या, किनारी भागातील लहानलहान बेटे यांनी व्यापला आहे. चर्चिल (हॅमिल्टन) ही या प्रदेशातील प्रमुख नदी असून ती पश्चिम-पूर्व दिशेने वहाते. चर्चिल व नॅस्कोपी या नद्यांद्वारे प्रदेशाच्या पश्चिम भागातील सरोवरे पूर्वेस अटलांटिक महासागराशी जोडली गेली आहेत. मेलव्हिल हे या भागातील मोठे सरोवर असून त्याद्वारे चर्चिल नदी अटलांटिक महासागराशी जोडली गेली आहे. या नदीच्या उगमाकडील भागत बोडॉइन निदरी असून तेथील प्रसिद्ध चर्चिल धबधब्याचा वीजनिर्मितीसाठी उपयोग करून घेण्यात आला आहे.

येथील हिवाळे कडाक्याच्या थंडीचे असतात. सप्टेंबर ते जून या काळात अंतर्गत भाग हिमाच्छादित असतो. हिवाळ्यात तापमान -९° से. पेक्षाही कमी असते. लॅब्रॅडॉरचा उत्तर भाग थंड व शुष्क टंड्रा प्रदेशाचा असून दक्षिण भाग सूचिपर्णी वृक्षांच्या जंगलांनी व्यापलेला आहे. या प्रदेशाचे जुलैचे तापमान ७° ते १६° से. असते. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ७६ सेमी. असून हिमवृष्टी ३८१ सेंमी. होते. किनारी भागात वारंवार वादळे होतात. येथील हवामान शेतीस प्रतिकूल आहे. येथील जंगलांत फर, स्प्रूस, भूर्ज इ. वनस्पती असून वन्य प्राण्यांत अस्वल, बीव्हर, कोल्हे, ससे, सांबर, पाणमांजरे, लांडगे इ. आढळतात.

या प्रदेशात ९५० ते १,०५० यांदरम्यान व्हायकिंग लोक प्रथम आले असावेत. आरंभीच्या काळातील समन्वेषकांनी ग्रीनलंडला लॅब्रॅडॉर भूमी (लँड ऑफ लॅब्रॅडॉर) असे संबोधिले होते. नंतर नकाशाकारांनी त्यात बदल करून उत्तर अमेरिकेच्या मुख्य भूमीचा ईशान्य भाग म्हणून लॅब्रॅडॉरचा निर्देश केला. जॉन कॅबट (१४५०-९९) हा इंग्लंडतर्फे येथे जलपर्यटनास आला होता (१४९८), असे म्हटले जाते. त्याच्याबरोबर पोर्तुगालच्या अझोर्स बेटामधील एक शेतकरीही आला होता. शेतकऱ्याला पोर्तुगीज भाषेत ‘लाब्राडॉर’ (लँडओनर) म्हणतात. त्यावरून ‘लॅब्रॅडॉर’ हे नाव पडले असल्याची शक्यता आहे. गश्पार कोर्तरीआल (१४५०-१५०१) हा पोर्तुगीज दर्यावर्दी १५०० मध्ये लॅब्रॅडॉरला आला होता. जॉन कॅबट व झाक कार्त्ये (१४९१-१५५७) या अनुक्रमे इटालियन व फ्रेंच समन्वेषकांनी याच्या किनाऱ्याजवळून जलपर्यटन केले. अनेक यूरोपीय समन्वेषकांनी लॅब्रॅडॉरला भेटी दिल्या. १७०० पर्यंत एस्किमो, नॅस्कोपी आणि मूळच्या अल्गाँक्कियन गटांतील माँतन्ये इंडियन हेच फक्त लॅब्रॅडॉरमध्ये रहात हाते. येथील गोरे वसाहतवाले फरचा व्यापार व सीलची शिकार करणारे होते. फ्रेंच व इंडियन युद्धकाळात (१७५९) ग्रेट ब्रिटनने फ्रान्सकडून लॅब्रॅडॉर काबीज करण्यापूर्वी गोऱ्या वसाहतवाल्यांनी किनाऱ्यावर व्यापाराची केंद्रे उघडली होती. पॅरिसच्या तहानुसार (१७६३) हा प्रदेश ग्रेट ब्रिटनला देण्यात येऊन त्यावर न्यू फाउंडलंडच्या गव्हर्नराचा अंमल प्रस्थापित करण्यात आला. १७७४ मध्ये त्याचे कॅनडाकडे हस्तांतर झाले व परत १८०९ मध्ये तो फाउंडलंडला मिळाला. क्वीबेकबरोबरची या प्रदेशाची सीमा मात्र वादातीत होती. १८०० मध्ये इंग्रज वसाहतवाल्यांनी येथे कायमस्वरूपी घरे बांधली. १८४० मध्ये हडसन बे कंपनीच्या समन्वेषकांनी लॅब्रॅडॉरच्या अंतर्गत भागात धाडसाने प्रवेश केला. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस सर विल्फ्रेड टी. ग्रेनफेल (१८६५-१९४०) या इंग्रज डॉक्टर मिशनऱ्याने १८९२ पासून येथे इस्पितळे, शाळा, औद्योगिक केंद्रे, सहकारी केंद्रे, चर्च इ. अनेक जनोपयोगी संस्था उभारल्या. दुसऱ्या महायुद्धांचया काळात, पूर्व किनाऱ्यावरून येणाऱ्या नाझी स्वाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी अमेरिकेच्या सैन्याने ग्रेट ब्रिटनच्या मदतीने येथे लष्करी छावण्या उभारल्या होत्या.

या प्रदेशाच्या साधनसंपत्तीवरून न्यू फाउंडलंड व क्वीबेक यांमध्ये लॅब्रॅडॉरची मालकी व सरहद्द यांबाबत वाद झाले व सरहद्दींत बदलही घडून आले. १९२७ मध्ये ब्रिटिश प्रिव्ही कौन्सिलने न्यू फाउंडलंड व क्वीबेक यांच्यामधील लॅब्रॅडॉरच्या सरहद्दी निश्चित केल्या व लॅब्रॅडॉर हा कॅनडाचा एक प्रमुख भाग बनला (१९४९). 

या प्रदेशाची अर्थव्यवस्था मुख्यत्वे लोहखनिजावर आधारलेली आहे. येथील लोहखनिजाचा शोध १८९५ मध्ये लागला. याशिवाय या भागात ॲस्बेस्टस, तांबे, फ्लुओरस्पार, जस्त, जिप्सम यांचीही खनिजे मोठ्या प्रमाणात आहेत. शिसे, सोने व चांदी यांचे साठेही थोड्याफार प्रमाणात आढळतात. या प्रदेशात क्वीबेकमधील शेफरव्हिल आणि न्यू फाउंडलंड प्रांतातील लॅब्रॅडॉर सिटी व वॉबुश ही शहरे १९५० मध्ये खाणकामामुळे उदयास आली. खाणकामास मेनीहेक आणि चर्चिल धबधब्यांपासूनविद्युत्पुरवठा होतो. हा प्रदेश भू, जल व वायुमार्गांनी देशातील इतर भागांशी जोडलेला आहे.

चर्चिल फॉल्स येथे वीजनिर्मितीच्या प्रकल्पाचे बांधकाम १९६७ मध्ये सुरू होऊन त्यातून १९७१ मध्ये वीजउत्पादन सुरू झाले (क्षमता ५२,२५,००० किवॉ). कॅरोल सरोवराभोवतालच्या खाणकामाचा नियोजित विकास करण्यासाठी लॅब्रॅडॉर सिटी (लोकसंख्या ८,६६४ -१९८६) या शहराचा विस्तार नजिकच्या वॉबुश (लोकसंख्या २,६३७-१९८६) खेड्यापर्यंत करण्यात आला आहे.

लॅब्रॅडॉर किनारा ते ईशान्येकडील ग्रीनलंड यांदरम्यान लॅब्रॅडॉर समुद्र असून हा डेव्हिस सामुद्रधुनीने उत्तरेस बॅफिन उपसागराशी व पश्चिमेस हडसन सामुद्रधुनीने हडसन उपसागराशी जोडलेला अहे. लॅब्रॅडॉरचा किनारा जून ते नोव्हेंबर या काळात हिममुक्त असतो. लॅब्रॅडॉर थंड समुद्रप्रवाह आर्क्टिक महासागरात उगम पावून डेव्हिसच्या सामुद्रधुनीतून लॅब्रॅडॉर प्रदेशाच्या पूर्व किनाऱ्याजवळून उत्तरेकडून दक्षिणेस वाहतो. यालाच आर्क्टिक समुद्रप्रवाह असेही म्हणतात. न्यू फाउंडलंड बेटाजवळ तो गल्फ या उष्ण प्रवाहाला मिळतो. त्यामुळे तेथे दाट धुके निर्माण होते. लॅब्रॅडॉर किनाऱ्याला लॅब्रॅडॉर प्रवाह थंड व कमी क्षारतेचा, तर ग्रीनलंडच्या पश्चिम किनाऱ्याला तो जास्त क्षारतेचा (पश्चिम ग्रीनलंड प्रवाह) आहे. ग्रीनलंड प्रवाहाचा आणि हडसन उपसागराकडून बॅफिन बेटाकडे येणाऱ्या प्रवाहाचा एकत्रितपणे लॅब्रॅडॉर प्रवाह असा उल्लेख करतात. जलालेखन शास्त्रानुसार त्यांच्यात साम्य आहे. लॅब्रॅडॉर प्रवाहाबरोबर अनेक हिमनग वहात येत असल्यामुळे बोटींच्या मार्गात काहीवेळा अडथळे निर्माण होतात. या प्रवाहाचे तापमान ०° से. पेक्षा कमी असून सागरजल क्षारता हजारी ३० ते ३४ भाग आहे. किनाऱ्यालगत काही ठिकाणी प्रवाहाची खोली ६०० मी. पर्यंत आढळते. थंड प्रवाहामुळे किनाऱ्यावरील बंदरे सहा महिने गोठलेली असतात.

पहा : कॅनडा न्यू फाउंडलंड.

सावंत, प्र. रा.