चार्ल्स लँबलँब, चार्ल्स : (१० फेब्रुवारी १७७५-२७ डिसेंबर १८३४). इंग्रज निबंधकार आणि साहित्यसमीक्षक. जन्म लंडन शहरी. ‘ख्राइस्ट्स स्कूल’ ह्या लंडनमधील शाळेत त्याने काही शिक्षण घेतले. तेथे असतानाच विख्यात इंग्रज कवी सॅम्युएल टेलर कोलरिज ह्याच्याशी त्याची गाढ मैत्री झाली व ती आयुष्यभर टिकली. वयाच्या चौदाव्या वर्षी त्याने शाळा सोडली. १७९१ मध्ये त्याने नोकरी करावयास सुरुवात केली. १७९२ पासून तो ईस्ट इंडिया कंपनीच्या कार्यालयात नोकरीस होता. तेथूनच १८२५ मध्ये तो निवृत्त झाला. त्याचे कौटुंबिक आयुष्य सुखाचे नव्हते. १७९६ साली, वेडाच्या भरात, मेरी ह्या त्याच्या बहिणीने आईचा खून केला. ह्या प्रसंगाला लँबने अत्यंत धीराने तोंड दिले आणि बहिणीची काळजी आयुष्यभर घेण्याचा निर्णय त्याने घेतला. तो अविवाहित राहिला. अधूनमधून येणारे वेडाचे झटके सोडले, तर एरव्ही मेरीचे वागणे चांगले असे. भावाची गृहव्यवस्था ती नेटकेपणाने ठेवी त्याच्याकडे येणाऱ्यांचे आतिथ्य करी आणि भावाच्या लेखनाला उत्तेजनही देई. लँबच्या टेल्स फ्रॉम शेक्सपिअरसारख्या लेखनात मेरीचाही सहभाग आहे. 

लँबने आरंभी कविता लिहिल्या जॉन वूडव्हिल (१८०२) ही शोकात्मिकाही रचिली. तथापि त्याचे हे लेखन फारसे महत्त्वाचे नाही. त्याच्या कवितांपैकी ‘द ओल्ड फेमिल्यर फेसीस’ आणि ‘ऑन ॲन इन्फंट डाइंग ॲज सून ॲज वॉज वॉर्ज’ ह्या दोन विशेष प्रसिद्ध आहेत. लँबची किर्ती मुख्यतः अधिष्ठित आहे, ती त्याने लंडन मॅगझीनसाठी ‘एलिआ’ ह्या टोपण नावाने लिहिलेल्या निबंधांवर. एसेज ऑफ एलिआ (१८२०-२३) आणि लास्ट एसेज ऑफ एलिआ (१८३३) हे त्याचे निबंधसंग्रह. पूर्णतः वाङ्मयीन म्हणता येतील अशा प्रकारचे हे निंबंध असून त्यांतून लँबचे विलोभनीय व्यक्तीमत्त्व प्रभावीपणे प्रत्ययास येते. लँबचे ग्रंथप्रेम, लंडनमधल्या रस्त्यांतून भ्रमंती करण्याची त्याची आवड, चाकोरीबाहेरील व्यक्तींमध्ये त्याला असलेला रस, मित्रांबरोबर गप्पांत रंगून जाण्याची त्याची आवड, त्याची भावनाशीलता हे सर्व त्याच्या निबंधांतून आपणापुढे प्रकट होते. लँबच्या आयुष्यात दुःखे असली, तरी त्याचे जीवनावर प्रेम होते. हे प्रेम, तसेच अनुभवांची विविधता आणि त्यांचे वेगवेगळे पोत तो आपल्या निबंधांतून त्याच्या वाचकांपर्यंत सहजपणे पोचवतो. सर्व निबंधांची शैली आत्मपर, संभाषणात्मक अशी आहे. गतकालविषयी वाटणारी अस्वस्थ हुरहूर हे त्याच्या निबंधांचे आणखी एक लक्षणीय वैशिष्ट्य. 

लँबच्या अन्य लेखनात टेल्स फ्रॉम शेक्सपिअर (१८०७, मेरी लँबच्या सहाकार्याने), द अड्व्हेंचर्स ऑफ यूलिसीझ (१८०८), मिसेस लायसेस्टर्स स्कूल (१८०९, मेरी लँबच्या सहकार्याने) आणि ए टेल ऑफ रोझॅमंड ग्रे अँड ओल्ड ब्लाइंड मार्गारेट (१७९८) ह्यांचा समावेश होतो. टेल्स फ्रॉम शेक्सपिअर हे शेक्सपिअरच्या नाट्यकृतींचा मुलांना परिचय करून देण्यासाठी लिहिलेले पुस्तक. अड्व्हेंचर्स ऑफ यूलिसीझमध्येही होमरच्या ओडिसीची ओळख करून देण्याचा असाच प्रयत्न आहे. मिसेस लायसेस्टर्स स्कूलमध्ये दहा कथा असून हर्टफर्डशर येथील एका शाळेतील मुले ह्या शाळेच्या आठवणी म्हणून गोष्टी सांगत आहेत, अशा प्रकारे त्या लिहिलेल्या आहेत. चार्ल्स आणि मेरी ह्यांचा काही आत्मचरित्रात्मक भागही ह्या कथांत आहे. ए टेल ऑफ रोझॅमंड ग्रे… हा एक गद्य रोमान्स. 

चार्ल्स लँबने एलिझाबेथकालीन नाटककारांच्या नाट्यकृतींतील काही निवडक प्रसंगांचे स्पेसिमिन्स ऑफ इंग्लिश ड्रमॅटिक पोएट्स हू लिव्ह्ड अबाउट द टाइम ऑफ शेक्सपिअर (१८०८) ह्या नावाने केले.  

ईस्ट इंडिया कंपनीच्या कार्यालयातून निवृत्त झाल्यानंतर त्याच्या बहिणीची प्रकृती अधिकच बिघडल्यामुळे लँब लंडन सोडून एडमंटन येथे तिच्यासह जाऊन राहिला. तेथेच त्याचे निधन झाले.  

संदर्भ : 1. Anthony, Katherine, The Lambs : A Study of Pre-Victoriun England, Toronto, 1948 reprint, 1973.

           2. Barnett, George L. Charles Lamb, London, 1977.

           3. Barnett, George L. Charles Lamb : The Evolution of Elia, Bloomington, 1964 reprint 1972

           4. Frank, Robert, Don’t Call Me Gentle Charles : Discourses on Charles Lamb’s Essays of Elia, Corvailis (Ore.), 1976.

           5. Randel, Fred V. The World, Of Elia: Charles Lamb’s Essayistic Romanticism, Port Washington (N.Y.), 1975.

कुलकर्णी, अ. र.