लँप्रोफायर : गडद करडे ते काळपट रंगाचे पूर्ण स्फटिकी अग्निज खडक. यामध्ये कृष्णाभ्रक, हॉर्नब्लेंड, ऑजाइट किंवा ऑलिव्हीन या लोह-मॅग्नेशियमयुक्त गडद रंगी खनिजांचे मोठे, सुस्पष्ट बाह्यरेखा असलेले स्फटिक सूक्ष्मकणी ते दाट अशा आधारकात जडविल्याप्रमाणे वेढलेले असतात. या वयनाला पृषयुक्त वयन म्हणतात व हे या खडकांचे वैशिष्ट्य आहे. ही खनिजे आधारकातही आढळतात. यांशिवाय कधी कधी पोटॅश फेल्स्पार, प्लॅजिओक्लेज वा फेल्स्पॅथॉइडे ही इतर खनिजे व ॲपेटाइट, मॅग्नेटाइट आणि स्फीन ही खनिजे यांत आढळतात. अशा प्रकारे कमी सिलिका व जादा लोह, मॅग्नेशियम व अल्कली धातू हे यांचे रासायनिक वैशिष्ट्य आहे.

प्रमुख लोह-मॅग्नेशियमी खनिजानुसार याचे अभ्रकी, हॉर्नब्लेंडी, ऑजाइटी वगैरे प्रकार पाडतात परंतु यांना काही खास वेगळी नावेही दिलेली आहेत. उदा., अभ्रकी प्रकारात ऑर्थोक्लेजयुक्त प्रकाराला मिनेट, तर प्लॅजिओक्लेजयुक्त प्रकाराला केरूसँटाइट म्हणतात. तसेच हॉर्नब्लेंडी प्रकारात ऑर्थोक्लेजयुक्त लँप्रोफायरला व्होगेसाइट व प्लॅजिओक्लेजयुक्त प्रकाराला स्पेसर्टाइट म्हणतात. लँप्रोफायरपैकी हे सर्वसामान्यपणे आढळणारे प्रकार असून कँप्टोनाइट व माँचिकाइट हे अल्कली प्रकार कमी प्रमाणात आणि ॲलनॉइट हा विरळा आढळणारा लँप्रोफायर आहे.

लँप्रोफायर बहुतकरून अरुंद (०.५ ते ५ मी.) भिंत्तीच्या (शिलारस भेगात घुसून व थिजून बनलेल्या चापट वडीसारख्या उभ्या राशींच्या) रूपात ग्रॅनाइट व डायोराइट खडकांच्या मोठ्या राशींलगत आढळतात. ते कधीकधी शिलापट्टांच्या (अशाच पण आडव्या राशींच्या) तर क्वचित लाव्हा प्रवाहाच्या रूपात आढळतात. स्कॉटलंड, आयर्लंड, बोहीमिया, ब्राझील, नॉर्वे, हार्झ पर्वत इ.ठिकाणी याच्या नमुनेदार राशी आहेत. सौराष्ट्रात माँचिकाइट आढळतात.

लँप्रोफायर हे शिलारसाचे स्फटिकीभवन होऊन किंवा शिलारस व परके स्फटिकी द्रव्य यांच्या मिश्रणापासून बनले असावेत. 

लँप्रोफायरांचे अपघटन (रासायनिक दृष्ट्या तुकडे होण्याची क्रिया) सहजपणे होते व त्यांच्यावर वातावरणक्रियेचा परिणाम जलदपणे होतो. यांमुळे त्यांच्यात बदल होऊन कार्बोनेट तसेच क्लोराइट, सर्पेंटाइन, लिमोनाइट इ. खनिजे बनतात.

लँप्रोफायरमधील मोठ्या स्फटिकांच्या पाटनपृष्ठांवरून [⟶ पाटन] प्रकाशाचे परावर्तन होऊन व कधीकधी कृष्णभ्रकाच्या चमकदार चकत्यांमुळे  खडक चकचकीत दिसतो म्हणून चकचकीत खडक या अर्थाच्या ग्रीक शब्दांवरून यांचे लँप्रोफायर हे नाव पडले आहे.

ठाकूर, अ. ना.