लँप्री : हे ईल माशासारखे दिसणारे प्राणी पेट्रोमायझॉटिडी या कुलातील आहेत. हे व त्यांच्यासारखेच हॅगफिश हे आदिम पृष्ठवंशी (पाठीचा कणा असलेले) प्राणी यांचा समावेश सायक्लोस्टोमॅटा (गोलमुखी) या वर्गात होतो. या प्राण्यांचे वैशिष्ट्य म्हणजे यांचे तोंड गोल असते व त्यांना जबडे नसतात.
लँप्री हा खरा मासा नाही. याच्या पाठीच्या कण्यात हाडांचे मणके नसतात. याचे कातडे गुळगुळीत, श्लेष्मल (बुळबुळीत) द्रव्याने आच्छादिलेले व खवलेरहित असते.
लँप्रीच्या डोक्यावर फक्त एकच नाकपुडी असते. डोक्याच्या मागे शरीराच्या दोन्ही बाजूंस सात गोल आकाराची क्लोमछिद्रे असतात. याचे तोंड गोल वाटीसारखे असते व त्यात तीक्ष्ण दात असतात. तोंड चूषकाचे कार्य करते. मोठ्या माशाला तोंडाने चिकटून लँप्री त्याच्या शरीराला चूषकाच्या सहाय्याने भोक पाडतो व स्वतःचे पोट भरेपर्यंत मोठ्या माशाचे रक्त शोषण करतो व मग मोठ्या माशापासून सुटतो. यानंतर बरेच दिवस याला अन्नाची गरज लागत नाही. जळूसारखाच काहीसा हा प्रकार आहे. पेट्रोमायझॉन मॅरिनस ही लँप्रीची जाती वर वर्णन केल्याप्रमाणे परोपजीवी आहे, लँप्रीच्या इतर काही जाती परोपजीवी नाहीत. या जातींच्या तोंडातील दातही इतके तीक्ष्ण नाहीत. यांचे आंत्रही (आतडेही) लहान असते. स्वतंत्र जीवन जगणाऱ्या जातीत दात व आंत्र ऱ्हास पावलेले असतात.
लँप्रीच्या शरीराचा रंग राखाडी ते निळसर असतो. याचे शरीर १५ सेंमी. ते १ मी. लांब असते. याच्या जातींपैकी सु. ५० जाती समशीतोष्ण प्रदेशातील पाण्यात राहतात. यांपैकी बऱ्याच जाती सागरी पाण्यात राहतात. थोड्या जाती गोड्या पाण्याच्या तळ्यांत व नद्यांत आढळतात. उत्तर अमेरिकेत लँप्रीच्या १९ जाती आहेत. यूरेशिया, दक्षिण अमेरिका, न्यूझीलंड व ऑस्ट्रेलिया येथेही काही जाती आढळतात. थोडे फरक सोडून सर्व लँप्रींत सर्वसाधारण जीवनचक्र सारखेच असते.
सर्व लँप्री गोड्या पाण्यात अंडी घालतात. सागरात राहणारे लँप्री नदीमुखातून प्रवाहात शिरतात. ते प्रवाहाच्या तळाशी दगड रेतीचे घरटी करतात व माद्या त्यांत अंडी घालतात. अंडी घालण्याचे काम संपले की, ते मृत्यू पावतात. या अंड्यातून बाहेर पडलेले डिंभ (भ्रूणानंतरची स्वतंत्रपणे अन्न मिळवून जगणारी आणि प्रौढांशी साम्य नसणारी सामान्यतः क्रियाशील पूर्व अवस्था) गांडूळासारखे असून त्यांना दात व डोळे नसतात. अशा अवस्थेत ते काही वर्षे जगतात. या डिंभांना आमोसीटीस म्हणतात. मग एका उन्हाळ्यात त्यांचे⇨रूपांतरण होते व पुढे ते उघड्या समुद्रात जातात. या प्राण्यांचा आमोसीटीस डिंभ हा अपृष्ठवंशी (पाठीचा कणा नसणाऱ्या) व पृष्ठवंशी प्राण्यास जोडणारा एक महत्त्वाचा दुवा समजला जातो. काही लँप्री परोपजीवी जिणे जगत असल्यामुळे त्यांच्या शरीररचनेत काही बदल झालेले आहेत.
मध्ययुगात लँप्रींचा खाद्य पदार्थ म्हणून उपयोग केला जात असे. काही लँप्री माणसाचे भयंकर नुकसान करणारे ठरले आहेत. ग्रेट लेक या जलाशयात समुद्रातील पे. मॅरिनस हा लँप्री कालव्यातून शिरला व कालांतराने तेथे त्यांची संख्या वाढली. हा परोपजीवी लँप्री त्या तळ्यातील ट्राऊट माशाला चिकटून त्यांचे रक्त पिऊन त्यांचा नाश करून लागला. ट्राऊट नामशेष होण्याची पाळी आली, तेव्हा शास्त्रज्ञांनी निरनिराळे उपाय योजून या लँप्रीची त्या तळ्यातून हकालपट्टी केली.
पहा : सायक्लोस्टोम.
चिन्मुळगुंद, वासंती रा.
“