लँडॉर, वॉल्टर सॅव्हिज : (३० जानेवारी १७७५-१७ सप्टेंबर १८६४). इंग्रज कवी आणि गद्यलेखक. जन्म वॉरिक येथे. त्याचे वडील डॉक्टर होते. त्याचे शिक्षण रम्बी आणि ट्रिनिटी कॉलेज, ऑक्सफर्ड येथे झाले. त्याचा स्वभाव तापट, वादळी होता. ‘रम्बी स्कूल’मधून त्याला काढून टाकण्यात आले होते (१७९१) व पुढे ट्रिनिटी कॉलेजातून त्याला बाहेर घालविण्यात आले (१७९४). त्यानंतर आपल्या वडिलांशी भांडून तो घराबाहेर पडला. १८११ साली त्याने विवाह केला परंतु पत्नीशी न पटल्याने तिच्यापासून तो विभक्त झाला (१८३५). त्याच्या आयुष्याची अखेरची वर्षे इटलीतील फ्लॉरेन्स ह्या शहरी गेली. ब्राउनिंगने त्याला तेथे खूप साहाय्य केले. फ्लॉरेन्स येथेच तो निधन पावला.
त्याचा पहिला काव्यसंग्रह-द पोएम्स ऑफ वॉल्टर सॅव्हिज लँडॉर-१७९५ मध्ये प्रसिद्ध झाला. त्यानंतर गेबिर (१७९८) हे प्राचीन ईजिप्तच्या पार्श्वभूमीवर त्याने लिहिलेले दीर्घ कथाकाव्य तसेच पोएम्स फ्रॉम द ॲरबिक अँड पर्शियन (१८००), पोएट्री, बाय द ऑथर ऑफ गेबिर (१८०२) ह्यांसारखे त्याचे काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले.
लँडॉरने केलेल्या गद्यलेखनात इमॅजिनरी कॉनव्हर्सेशन्स (५ खंड, १८२४-२९), द सायटेशन अँड इग्झॅमिनेशन ऑफ विल्यम शेक्सपिअर (१८३४), पेरिक्लीझ अँण्ड ॲसपेझिया (१८३६), द पेंटॅमेरॉन (१८३७) अशा गद्यग्रंथांचा समावेश होतो.
लँडॉरचे गेबिर हे कथाकाव्य मिल्टॉनिक निर्यमक वृत्तात आहे. हे काव्य आज कंटाळवाणे वाटत असले, तरी लँडॉरच्या काळात ते गाजले आणि रॉबर्ट साउदीसारख्या तत्कालीन कवीने त्याचे अनुकरणही केले. त्याने लिहिलेल्या भावकविता अधिक चांगल्या आहेत. बायरन आणि शैली ह्या स्वच्छंदतावादी कवींप्रमाणेच त्यालाही इटलीबद्दल प्रेम होते.
इमॅजिनरी कॉनर्व्हेशन्स ह्या त्याच्या विशेष उल्लेखनीय गद्यग्रंथात प्राचीन काळापासून विविध कालखंडांत होऊन गेलेल्या व्यक्तींची काल्पनिक संभाषणे त्याने प्रभावीपणे रंगविली आहेत. राजकीय, सामाजिक व वाङ्मयीन प्रश्नांची चर्चा ह्या संभाषणांतून करण्यात आली आहे. ह्या संभाषणांत नाट आहे उपरोधही आहे.
लँडॉर हा त्याच्या काळापासून काही बाबतीत एकाकी, बेटासारखा राहिला. तथापि त्याच्या काळातील स्वच्छंदतावादी कवितेचे संस्कार आणि रंग त्याने आपल्या पृथगात्म कलाजाणिवेतून आपल्या साहित्यात व्यक्तविले.
संदर्भ : 1. Colvin, Sdiney, Landor, London, 1881.
2. Elwin Michael, Savage Landor, London, 1958.
3. Forster, John, Walter Savage Landor, London, 1869.
4. Sidgwick, J. B. Ed. The Shorter Poems of Walter Savage Landor, Cambrige,1946.
5. Welby, T. E. Wheeler, S.Ed. The Works of Walter Savage Landor, 16Vols., London, 1927-36.
कळमकर, य. शं.