लक्ष्मीनरसिंहराव, पानुगंटि : (१८६५-१९४०). आधुनिक तेलुगू नाटककार, ललितनिबंधकार व विनोदकार. जन्म राजमहेंद्री येथे. बी.ए. पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी काही दिवस शिक्षकाचे काम केले. त्यांचे इंग्रजी, संस्कृत, तेलुगू या भाषांवरील प्रभुत्व पाहून अनेक जमीनदारांनी त्यांना दिवाणाची नोकरी दिली होती. १९०६ साली पिठापुरम्‌ च्या राजांनी त्यांना ‘आस्थानविद्वान’ म्हणून नेमले. त्यांनी विपुल लेखन केले. इंग्रजीतील ‘निबंध’ पद्धतीचा विशेष अभ्यास करून त्यांनी तेलुगू साहित्यात ‘निबंधयुग’ सुरू केले. त्यांनी इंग्रजी व तेलुगू नाटयवाङ्‌मयाचाविशेष अभ्यास केला होता. साहित्यात व्यावहारिक भाषा असावी या पक्षाचे ते कट्टर पुरस्कर्ते होते. त्यांच्या नाटकांत इंग्रजी आणि संस्कृत नाट्यपद्धतींचा सुंदर मिलाफ झालेला आहे. त्यांच्या नाटकांची संख्या तिसावर भरते. सारंगधर (१९०५), विप्रनारायण (१९०९), नर्मदापुरुकुत्सीयम्  (१९०९), कल्याणराघवमु (१९१५), राधाकृष्ण नाटकमु (१९२३) ही त्यांची पौराणिक नाटके आहेत. सामाजिक नाटकांत कोकिल (१९०९), वृद्धविवाहमु (१९१०), रातिस्तंभमु (१९३०), सरस्वती (१९४३) ही विशेष प्रसिद्ध आहेत. त्यांच्या कंठाभरणमु (१९१७) आणि राधाकृष्ण नाटकमु या पानुगंटी लक्ष्मीनरसिंहरावनाटकांचे शेकडो प्रयोग झाले आहेत. त्यांचे सरोजिनी (१९३०) हे तेलुगूमधले पहिले मनोविश्लेषणात्मक नाटक मानले जाते. बुद्धबोधसुधा (१९१०), चूडामणि (१९२१) व प्रचंडचाणक्यमु (१९३०) ही त्यांची ऐतिहासिक नाटके आहेत. त्यांच्या ऐतिहासिक नाटकांत भूतकाळाचे गौरवपूर्ण वर्णन आहे तर सामाजिक नाटकांत समाजातील दुष्ट चालीरीतींवर कठोर प्रहार केले आहेत. अनेक वेळा त्यांनी आपल्या नाटकांत हास्यव्यंगाचा फारच प्रभावी रीतीने उपयोग केला आहे. त्यांच्या सौम्य, साध्या व नर्म औपरोधिक विनोदाचे दर्शन त्यांच्या साक्षी ह्या निबंधसंग्रहात घडते. १९१६ ते १९२७ या दरम्यान लिहिलेले त्यांचे विनोदी ललितनिबंध सहा भागांत साक्षी नावाने प्रसिद्ध झाले आहेत. त्यांच्या या ललितलेखांच्या द्वारे तेलुगू साहित्यात ललितनिबंध या वाङ्‌मयप्रकाराची सुरुवात झाली. या निबंधसंग्रहात राष्ट्रीय अभिमान, संस्कृती, नागरिकत्व, स्त्रीजीवन, शिक्षणपद्धती इ. अनेक विषयांवर संवादरूप चर्चा आहेत. प्रचलित विषयांवर चर्चा करणारी पात्रे सामान्यतः तीनच आहेत : जंघाल शास्त्री, वाणीदास व बोरय्या सेट्टी. साक्षीतील निबंध वाचीत असताना वाचकांस इंग्रजीतील ॲडिसनकृत स्पेक्टेटरची आणि रॉजर डी. कॉवुर्ली या प्रसिद्ध व्यक्तीरेखेची सहजच आठवण येते. त्यांची गद्यशैली प्रवाही आणि जोमदार असून त्यातून त्यांच्या विद्वत्तेचा, मानवी स्वभावाच्या मार्मिक आकलनाचा व सार्वकालिक अशा वैशिष्ट्य पूर्ण व्यक्ति रेखा उभ्या करण्याच्या सामर्थ्याचा प्रत्यय येतो. तेलुगू साहित्यात नाटक, ललितनिबंध आणि विनोद या तिन्ही प्रकारांत त्यांनी मोलाची भर घातली.

लाळे, प्र. ग.