लव्हॉयझर (लाव्हाझ्ये), आंत्वान लॉरां : फ्रेंच रसायनसास्त्रज्ञ कुशल प्रयोगकर्ते व आधुनिक रसायनशास्त्राचे जनक. त्यांनी ज्वलनक्रियेच्या ऑक्सिजन सिद्धांताचा शोध लावला एक शतकापेक्षा अधिक काळ पगडा असलेल्या फ्लॉजिस्टॉनीय मताचे (सर्व पदार्थात फ्लॉजिस्टॉन हे एक ज्वालाग्राही घटकद्रव्य म्हणजे ज्वलन तत्त्व असले पाहिजे व पदार्थ जळताना ते बाहेर पडते या कल्पनेचे) उच्चाटन केले ऑक्सिडीकरण व श्वसनक्रिया यांमधील परिमाणात्मक साम्य दाखविले रासायनिक विक्रियांमधील द्रव्याच्या अक्षय्यतेचे तत्त्व सूत्रबद्ध केले मूलद्रव्ये व संयुगे यांतील फरक स्पष्ट केला रासायनिक संज्ञा देण्याची आधुनिक पद्धत शोधून काढली आणि रासायनिक संशोधनामध्ये परिमाणात्मक पद्धतीचा वापर करण्यास त्यांनी प्रथम सुरुवात केली.
लव्हॉयझर यांचा जन्म पॅरिस येथे व शिक्षण येथील माझरीन महाविद्यालयात झाले. त्यांनी भाषा, साहित्य व तत्तवज्ञान या विषयांचा अभ्यास केला. त्याच वेळी विज्ञानाची आवड निर्माण झाल्यामुळे त्यांनी गणित, ज्योतिषशास्त्र, रसायनसास्त्र व वनस्पतिविज्ञान या विषयांचा अभ्यास केला. त्यांनी १७६३ मध्ये कायद्याचे पदवी व १७६४ मध्ये सनद मिळविली.
लव्हॉयझर यांची १७६८ मध्ये फ्रेंच ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस या संस्थेत सहरसायनशास्त्रज्ञ म्हणून नेमणूक झाली. या संस्थेचे ते १७८५ मध्ये संचालक व १७९१ मध्ये कोषपाल झाले. त्याच वेळेस (१७६८-७५) ते सरकारला महसूल गोळा करून देणाऱ्या फेर्मे जनरल या कंपनीचे सभासद होते. १७७५ मध्ये त्यांची बंदुकीच्या दारूविषयीच्या प्रशासन विभागाचे संचालक म्हणून नेमणूक झाली. त्यांनी आर्सेनल येथे सुसज्ज प्रयोगशाळा उभारून संशोधनकार्य (१७७५-९२)केले.
लव्हॉयझर यांनी इ. स. १७७० मध्ये वारंवार ऊर्ध्वपातन केल्यामुळे पाण्याचे मृत्तिकेत रूपांतर होते या प्रचलित मताचे खंडन केले. गंधक व फॉस्परस जाळले असता त्यांचे वजन वाढले कारण त्यांच्यात हवा शोषली गेली तसेच लोणारी कोळशाबरोबर मुर्दाडशिंग तापविले असता कमी वजनाची शिशाची धातू तयार झाली कारण तिच्यामधून हवा बाहेर पडली, असे त्यांच्या १ नोव्हेबर १७७२ रोजीच्या टिपणांत नमूद केले होते. ही टिपणे ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस येथे जतन करून ठेवलेली आहेत.
इ. स. १७७४ मध्ये लव्हॉयझर व इंग्रज रसायनशास्त्रज्ञ जोसेफ प्रीस्टली (१७३३-१८०४) यांची पॅरिस येथे भेट झाली. त्या वेळेस प्रीस्टली यांनी पाऱ्याचे लाल भस्म तापविल्यानंतर ज्वलनक्रियेला अधिक मदत करणारी हवा तयार होते व ती श्वसनाकरिता सामान्य हेवपेक्षा पाच ते सहा पट चांगली असते, असे सांगितले. प्रीस्टली यांनी तिला ‘डिफ्लॉजिस्टिकेटेड हवा’ (ज्वलन तत्त्व-विरहित हवा ) असे नाव दिले. लव्हॉयझर यांनी काटोकोरपणे प्रयोग केल्यानंतर ज्वलनक्रियेमध्ये व धातूंच्या भस्मीकरणामध्ये सामान्य हवेच्या दिलेल्या घनफळामधील फक्त काही भागाचाच वापर झाला व ती प्रीस्टली यांची नवीन हवा असल्याचे अनुमान काढले.
इ.स. १७७७ मध्ये ॲकॅडेमीला दिलेल्या व १७७९ मध्ये वाचण्यात आलेल्या, परंतु १७८१ पर्यंत प्रकाशित न झालेल्या संस्मरणिकेत लव्हॉयझर यांनी डिफ्लॉजिस्टिकेटेड हवेला ‘अम्ल तयार करणारे’ या अर्थाच्या ग्रीक शब्दावरून ऑक्सिजन हे नाव दिले. शिल्लक राहिलेल्या हवेला त्यांनी अझोट ( नायट्रोजन) असे नाव दिले.
लव्हॉयझर यांनी ऑक्सिजनाचा कार्बनाबरोबर संयोग होऊन ‘स्थिर हवा ’ (कार्बन डाय-ऑक्साइड) तयार होते, असे दाखविले. त्यांनी १७८७ मध्ये या वायूला ‘कार्बॉनिक अम्ल वायू’ असे नाव दिले. [→कार्बन डाय-ऑक्साइड ].
इ. स. १७८३ मध्ये लव्हॉयझर यांनी Reflections on Phlogistonया संशोधन निबंधामध्ये ज्वलनक्रिया हा परिकल्पित फ्लॉजिस्टॉन मुक्त झाल्यामुळे होणारा परिणाम नसून जळणाऱ्या द्रव्याचे ऑक्सिजनाबरोबर झालेल्या संयोगाचा परिणाम असतो. असे स्पष्टीकरण दिले. अशा तऱ्हेने त्यांनी त्या वेळच्या शास्त्रज्ञांना मान्य असलेल्या फ्लॉजिस्टॉनीय सिद्धांताचे उच्चाटन केले.
लव्हॉयझर व प्येअर सीमाँ द लाप्लास (१७४९-१८२७) यांनी घंटाकार काचेच्या पात्रातील पाऱ्यावर हायड्रोजन व आक्सिजन यांचे पेटते झोत सोडून पाणी तयार केले. लव्हॉयझर यांनी पाण्याचे त्याच्या घटकांमध्ये विघटन करून हायड्रोजन मोठ्या प्रमाणात तयार केला. या प्रयोगांच्या परिमाणात्मक परिणामांवरून पाणी हे मूलद्रव्य नसून ते हायड्रोजन व आक्सिजन यांपासून बनलेले संयुग आहे, हे त्यांनी सिद्ध केले. पाण्याचे संघटन माहीत झाल्यावर त्यांनी परिमाणात्मक कार्बनी विश्लेषण पद्धतीचा संशोधनामध्ये वापर करण्यास सुरुवात केली. त्यानी अल्कोहॉल व इतर कार्बनी संयुगे ऑक्सिजनामध्ये जाळल्यानंतर तयार झालेल्या पाणी व कार्बन डाय-ऑक्साइड यांची मापने करून त्यांची संघटने ठरविली.
इ. स. १७८७ मध्ये लव्हॉयझर आणि त्यांचे सहकारी एल्. बी. गीताँ द मॉर्व्हो (१७३७-१८१६), क्लोद ल्वी बेर्तॉले ( १७४८- १८२२) व ए. एफ् द फूरक्रवा (१७५५-१८०९) यांनी Methode de nomenclature chimiqueया ग्रंथात त्या वेळच्या मूलद्रव्यांचे व संयुगांचे वर्गीकरण केले व त्यांना नवीन संज्ञा दिल्या. ॲरिस्टॉटल यांची पृथ्वी (मृत्तिका), हवा अग्नी व पाणी ही मूलद्रव्ये टाकून देऊन त्यांऐवजी ५५ पदार्थाची मूलद्रव्ये म्हणून तात्पुरती यादी करण्यात आली. या पदार्थाचे त्या वेळेस माहीत असलेल्या कोणत्याही विश्लेषण पद्धतीने पुन्हा अधिक साध्या पदार्थामध्ये विघटन करता येत नव्हते.
इ. स. १७८९ मध्ये लव्हॉयझर यांनी Traite elementaire de chimie (एलेमेंट्स ऑफ केमिस्ट्री) या ग्रंथात नवीन संज्ञांचा वापर केला. रसायनशास्त्रावरील हे पहिले आधुनिक पाठ्य-पुस्तक समजले जाते. या ग्रंथात ऑक्सिजन सिद्धांत हा मुख्य भाग आहे. या ग्रंथामुळे लव्हॉयझर यांच्या मताचा प्रसार होण्यास मोठी मदत झाली.
लव्हॉयझर यांनी वरील Traiteया ग्रंथात रासायनिक विक्रियांमधील द्रव्याच्या अक्षय्यता तत्त्वाचे स्पष्टीकरण असे दिले : कोणतेही द्रव्य शून्यातून निर्माण होऊ शकत नाही अथवा त्याचा नाशही होऊ शकत नाही,फक्त त्याच्या नाशही होऊ शकत नाही, फक्त त्याच्या रूपातच परिवर्तन घडते. कोणत्याही रासायनिक विक्रियेत भाग घेणाऱ्या पदार्थांचे आणि विक्रियेद्वारे तयार होणाऱ्या पदार्थांचे एकूण द्रव्यमान सारखेच असते.
लव्हॉयझर व लाप्लास यांनी ज्वलनक्रिया वा श्वसनक्रिया चालू असते वेळी बाहेर पडणाऱ्या उष्णतेचे परिणाम मोजण्याकरिता हिम उष्णतामापक हे उपकरण तयार केले. या उपकरणात ठेवलेल्या जिवंत गिनीपिग या प्राण्याने बाहेर सोडलेला कार्बन डाय-ऑक्साइड व उष्णता यांचे त्यांनी मापन केले. नंतर हिम उष्णतामापक उपकरणामध्ये पुरेसा कार्बन जाळून गिनीपिगने श्वासावाटे जेवढा कार्बन डाय-ऑक्साइड बाहेर सोडला तेवढा तो तयार झाल्यानंतर निर्माण होणाऱ्या उष्णतेचे परिमाण त्यांनी मोजले. यावरून त्यांनी अनुमान काढले की, श्वसन ही हळूहळू होणारी ज्वलन प्रक्रियाच असते. फुप्फुसांमध्ये सतत हळूहळू होणाऱ्या या (काल्पनिक) ज्वलनामुळेच जिवंत प्राण्यांना शरीराचे तापमान सभोवतालच्या वातावरणापेक्षा अधिक राखता येते, असे त्यांनी प्राणिशरीराच्या तापमानाच्या आविष्काराचे स्पष्टीकरण दिले.
लव्हॉयझर व त्यांचे सहकारी आर्मां सेग्विन यांनी १७८९-९० या काळात श्वसनक्रियेसंबंधी प्रयोग केले. त्यांनी शरीरातील चयाचपचयासंबंधी सर्व प्रक्रियांचा अभ्यास करता येईल असा प्रयोगांचा संच तयार केला. त्यांचे हे कार्य पुढील पिढीला शरीरक्रियात्मक प्रक्रियांसंबंधी संशोधन करण्यास उपयोगी पडले.
इ.स. १७८५ मध्ये लव्हॉयझर शासनाच्या कृषी समितीचे सचिव होते. १७८७ मध्ये ते प्रांतिक सभेवर निवडून आले. फान्समध्ये सगळीकडे वजने व मापे यांमध्ये सुसूत्रता आणण्याकरिता शासनाने नेमलेल्या समितीचे ते १७९० मध्ये सचिव व कोषकाल होते. त्यांच्या पुढाकारामुळे १७९१ मध्ये मेट्रिक पद्धती तयार करण्यात आली व ही मापनपद्धती फ्रान्समध्ये प्रथम करण्यात आली.
लव्हॉयझर यांना १७६६ मध्ये ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचे सुवर्ण पदक मिळाले. १७८९ मध्ये लव्हॉयझर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आधुनिक रसायनशास्त्राला वाहिलेले Annale de chimieया नियतकालकाची स्थापना केली.
फ्रान्समध्ये १७९३ मध्ये दहशतीची कारकीर्द सुरू झाल्यानंतर २४ नोव्हेबर १७९३ रोजी फेर्मे जनरल या कंपनीमधील लव्हॉयझर व २७ माजी सभासदांना अटक करण्यात आली. ८ मे १७९४ रोजी क्रांतिकारक चैकशी मंडळाने त्या सर्वाना लोकांची आणि फ्रान्सच्या खजिन्याची लूट केल्याबद्दल दोषी ठरवून देहदंडाची शिक्षा जाहीर केली. त्याच दिवशी लव्हॉयझर यांचा काँकर्ड येथे गिलोटीन यंत्राच्या साहाय्याने शिरच्छेद करण्यात आला.
मिठारी, भू. चिं. सूर्यवंशी, वि. ल.
“