लवण वनस्पति : (हॅलोफाइट्स ). नद्यांच्या मुखांजवळ, त्रिभुज प्रदेशांत, समुद्रकिनाऱ्यालगत, लवणयुक्त वाळवंटी प्रदेशांत तसेच लवणयुक्त दलदलींत आढळणाऱ्या वनस्पतींसाठी ही संज्ञा वापरली जाते. या वनस्पती लवणयुक्त जमिनीत वाढतात. अशा जमिनीत मीठ (सोडियम क्कोराइड), मॅग्नेशियम सल्फेट व मॅग्नेशियम क्कोराइड ही लवणे विशिष्ठ प्रमाणात विरघळलेल्या स्वरूपात असतात. लवणयुक्त पाण्याचे झरे, लवणयुक्त सरोवरे, लवण तृणसंघात ( स्टेप्स ) गवताळ प्रदेश या ठिकाणीही लवण वनस्पती आढळतात. खाऱ्या दलदलीत लवणाचे प्रमाण सु. १% असून ऑक्सिजन अत्यल्प प्रमाणात असतो. लवण वनस्पतींच्या मुळानी शोषिलेल्या लवणांचे प्रमाण वाढल्यामुळे होणारे प्रतिकूल परिणाम टाळण्यासाठी शोषणक्रिया मंदगतीने चालते. त्यामुळे बाष्पोच्छ्वासावरही (पानांच्या सर्वांत बाहेरच्या त्वचेतील सूक्ष्म छिद्रांतून बाष्परूपाने पाणी बाहेर पडण्याच्या क्रियेवरही) नियंत्रण होते. ऑक्सिजन अल्प प्रमाणात असल्याने मुळांच्या श्वसनक्रियेवर प्रतिकूल परिणाम होतो शोषणक्रियेत अडथळे येतात व बीजांच्या अंकुरणातही (रुजण्यातही) अडचणी येतात.
अनुकूलन लक्षणे : लवण वनस्पतींमध्ये तेथील विशिष्ठ परिस्थितीशी अनुकूलन (समरस होण्याची वृत्ती) दिसून येते. हे अनुकूलन पुढील लक्षणांमुळे शक्य होते : (१) मंदगतीने होणारा बाष्पोच्छ्वास, (२) आवश्यकतेप्रमाणे ⇨ मरूवनस्पतींप्रमाणे जलसंचय, ( ३) मांसल शरीर, (४) जाड, कातडीसारखा चिवट, चकचकीत पर्णसंभार,(५) लघुपर्णत्व, ( ६) खुरटेपणा व मळकट करडा रंग, ( ७) गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेने वाढणारी व ऑक्सिजन शोषून घेणारी श्वसनमुळे, ( ८) भरती-ओहोटीमुळे चिखलाचे थर सतत कमी जास्त होत असल्याने झाडांना अधिक आधार लागतो तो देणारी टेकूमुळे, (९) गुडघ्याप्रमाणे वाकलेली मुळे, (१०) अपत्यजनन : यांत फळ झाडावर असतानाच त्यातील बी रूजते व आदिमूळ बोहेर येते. असे अंशतः वाढलेले रोप चिखलात पडून तेथे त्याची पुढील वाढ होते, (११) रोपांच्या विशिष्ट आकृती व वजनामुळे ती पाण्यावर तरंगतात व जलप्रवाहाद्वारे त्यांचे दूरवर स्थलांतर होते, (१२) प्रकाशसंश्लेषक (प्रकाश उर्जेचा उपयोग करून पाणी व कार्बन डाय-ऑक्साइड यांपासून साधी कार्बोहायड्रेटे तयार करणाऱ्या) भागांतील कोशिकांत (पेशींत) चिकटसर द्रव्यांचा संचय, (१३) घट्ट व दाबून बसलेली प्रकाशसंश्लेषक ऊतके (कोशिकासमूह), (१४) जलसंचयी वाहककोशिका, (१५) अल्प काष्टनिर्मिती, (१६) लवण-स्त्रवणाऱ्या ग्रंथी, (१७) बाह्यत्वचेतील कोशिकांच्या पातळीच्या आत असलेली (निम्नमुख) पर्णछिद्रे, (१८) बाह्य कोशिकांच्या भित्तीवर असणारा मेणासारख्या पदार्थाचा जाडसर थर,( १९) कोशिकांत उच्च तर्षण दाब [⟶ तर्षण ].
लवण वनस्पती ज्या भौतिक परिस्थितीत जगतात तिच्यात विविधता असल्याने प्रत्येक लवण वनस्पतीत वरील सर्व लक्षणे असतील असे नाही. आवृतबीजी (बंदिस्त किंजपुटात विकसित व पक्क होणारे बीज असलेल्या) वनस्पतींखेरीज नीलहरित, बदामी, तपकिरी व ताम्र शैवाले [⟶ शैवले ], कवके (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित वनस्पती), सूक्ष्मजीव व काही नेच्यांतही या प्रकारच्या वनस्पती आहेत. आवृतबीजी वनस्पती अँकँथेसी, व्हर्बिनेसी, ऱ्हायझोफोरेसी व चिनोपोडिएसी या चार कुलांत लवण वनस्पती प्रामुख्याने आढळतात. इतर कुलांत त्या तुरळकपणे आढळतात. हायड्रोकॅरिटेसी व पोटॅमोजेटोनेसी या दोन कुलांतील काही जातींचा उल्लेख ‘ समुद्रतृण ’ असा केला जातो. या वनस्पतींची अनेक लक्षणे सामान्यपणे इतर जलवनस्पतींप्रमाणे असतात व त्यांचाही अंतर्भाव लवण वनस्पतींत केला जातो. ग्रॅमिनी कुलातील स्पार्टिना टाऊनसेंडीसारख्या जाती या प्रकारात मोडतात. माचुरा, सॅलिकॉर्निया, कांदळ, काजळा, कांकरा, तिवर, चिप्पी, निवगूर, गुलगा, चौरी इ. लहानमोठी क्षुपे ( झुडपे ) व वृक्ष या कच्छ वनस्पतींत (उष्ण कटिबंधातील समुद्रालगतच्या खाऱ्या दलदलित वाढणाऱ्या वनस्पतींत) समाविष्ट आहेत. गंगा व सिंधू या नद्यांच्या त्रिभुज प्रदेशांत, ओरिसा, मद्रास, कोचिन, त्रावणकोर, मुंबई, गोवा व रत्नागिरी येथील समुद्रकिनाऱ्यालगत काही ठिकाणी ही वनश्री आढळते. या ठिकाणी मोठ्या लाटा व वारा यांपासून झाडांना संरक्षण मिळते. नारळ, उंडी, मर्यादवेल, निर्गुडी, खडशेरणी, पारोसा पिंपळ, शिवण व पीलू हे वृक्ष समुद्रकिनारी आढळतात पण ते लवण वनस्पतींत मोडत नाहीत. हे वृक्ष इतरत्रही वाढतात.
लवण वनस्पतींची वने : नद्यांच्या मुखालगतच्या त्रिभुज प्रदेशातील तसेच समुद्रकिनाऱ्यालगतच्या लवण वनस्पतींच्या वनांचा विकास व रचना प्रामुख्याने पुढील घटकांवर अवलंबून असतात : (१) जमिनीचा प्रकार व तिच्यातील लवणांचे प्रमाण, (२) भरतीमुळे जमीन पाण्याखाली राहण्याचा काळ, (३) भरतीच्या दोन वेळांमधील अंतर, (४) भरतीचा जोर, (५) भरती-ओहोटीमुळे होणारी जमिनीची धूप, (६) गाळ साठण्याची क्रिया, (७) वारा व वादळ यांपासून सुरक्षितता, ( ८) मानवाने केलेली योजनाविरहित जंगलतोड. या घटकांमधील परस्परसंबंध, क्रिया व परिणाम जटिल असतात. त्यामुळे अगदी लहान भागातील जंगलांमध्ये असणाऱ्या लवण वनस्पतींच्या जातींत देखील जातींची विभागणी, वितरण, अनुक्रम यांबाबतीत कमालीची विभिन्नता दिसते. मलेशियाचा किनारा व मलेशियाभोवती असणारी बेटे यांवरील वने अतिशय घनदाट, जटिल व विविध जातींनी युक्त आहेत. ही विविधता तांबड्या समुद्राच्या व जपानच्या दिशेने घटत जाते. पश्चिम विभागातील वनांमधील वनस्पतींपेक्षा पूर्व विभागातील वनस्पती अधिक उंच असतात व त्यांच्यात विविधताही अधिक असते. ज्या ठिकाणी वृक्षांची उंची ४० मी. असते तेथे फळ झाडावर असतानाच ज्यांचे बी रुजते अशा मोजक्या जाती वाढतात. या वृक्षांच्या सावलीत दुसऱ्या वनस्पती वाढू शकत नाहीत तसेच तेथे परोपजीवी (दुसऱ्या सजीवांवर उपजीविका करणाऱ्या) वनस्पती किंवा दुसऱ्या वृक्षांच्या फांद्यांच्या आधाराने वाढणाऱ्या ⇨ अपिवनस्पतीही वाढत नाहीत.
पूर्वेकडील लवण वनस्पतींच्या वनांतील प्राणिजीवन समृद्ध आहे. या वनांत कायम वास्तव्य असणारे व इतरत्र न आढळणारे प्राणी मर्यादित असले, तरी तेथे नियमितपणे सतत वा विशिष्ट ऋतूत अनेक प्रकारचे प्राणी येतात. जमिनीच्या पृष्ठभागावर चकचकीत रंगाचे युका (विशिष्ट प्रकारचे खेकडे), निवट्या, निरनिराळ्या प्रकारच्या गोगलगाई, कृमी, सापांच्या काही जाती, घोरपडी, सागरी गरुड, पाणकावळे, हिरवी कबुतरे, कुररी, मोरांगी घारी, खेकडे खाणारी लांब शेपटीची माकडे असे विविध प्रकारचे प्राणी या वनांत आढळतात. या वनांत जळवांचा उपद्रव नाही पण डास विपुल प्रमाणात असतात.
क्रमविकास : (उत्क्रांती). आवृतबीजी लवण वनस्पतींची निर्मिती व त्यांचा क्रमविकास यांसंबंधी काही तर्क करणे शक्य आहे. आवृतबीजी वनस्पतींच्या क्रमविकासाच्या प्रारंभीच्या काळातच लवण वनस्पती क्रमविकासाच्या मुख्य प्रवाहातून बाजूला झाल्या असाव्यात. त्यांचे नवीन पर्यावरण खास प्रकारचे वैशिष्ट्यपूर्ण व चुलनेने स्थिर होते. या पर्यावरणात त्यांना इतर वनस्पतींशी स्पर्धा करावी लागली नसावी व त्यामुळे विशिष्ट भृप्रदेशांत त्यांचा जोमाने विकास प्रसार झाला असावा.
उपयुक्तता : स्पायरुलायना प्लॅटेन्सिस ही एक नीलहरित शैवल वनस्पती आहे. आफ्रिकेतील चॅड सरोवराच्या परिसरातील कार्नेबू जमातीचे लोक या वनस्पतीचा अन्न म्हणून उपयोग करतात. तिच्यात प्रथिनांचे प्रमाण ४५-६८% असते. मानवी शरीरपोषणास आवश्यक असणारी बहुतेक ॲमिनो अम्ले तीत आवश्यक तेवढ्या प्रमाणात असतात. हे शैवल प्रयोगशाळेत सहजी वाढविता येते. स्पार्टिना टाऊनसेंडी या गवताचा प्राण्यांचे खाद्य म्हणून उपयोग होतो. कित्येक लवण वनस्पतींपासून कागद व रेयॉन तयार करण्यासाठी आवश्यक असणारे सेल्युलोज उपलब्ध होते. सुंदरवनात आढळणाऱ्या एक्स्कोकॅरिया अगलोचापासून वर्तमानपत्रांसाठी उपयुक्त कागद तयार केला जातो. हेरिटिएरा मायनरपासून चांगल्या प्रतीचे रेयॉन तयार करण्यासंबंधी संशोधन चालू आहे. सॅलिकॉर्निया यूरोपिया या वनस्पतीच्या बिया खाद्य तेलासाठी मोठ्या प्रमाणावर उपयोगी पडू शकतील, असे दिसून आले आहे. ऱ्हायझोफोरा, ब्रुगैरा व झायलोकार्पस यांच्या अनेक जातींपासून टॅनिन मिळते. काही लवण वनस्पतींपासून उपयुक्त इमारती लाकूड तसेच इंधन प्राप्त होते. मॅट्रिकारिया कॅमोमिलाच्या फुलांपासून सुगंधी व औषधी म्हणून उपयुक्त असलेल्या खऱ्या कॅमोमिल द्रव्यासारखे नकली कॅमोमिल काढता येते. मॅ. कॅमोमिलाची मुळे जमिनीतील सोडियम भरपूर प्रमाणात शोषून घेत असल्यामुळे लवणयुक्त जमिनी लागवडीसाठी आणण्यास तिचा उपयोग होऊ शकेल. भविष्यकाळात लवण वनस्पतींमधील त्यांना लवणसह्यता प्राप्त करून देणारे जीन (आनुवंशिकघटक), बटाटा, तंबाखू यांसारख्या पिकांमध्ये घातल्यास या पिकांची लवणसह्यता वाढविता येईल. यासाठी पारंपरिक संकर पद्धती किंवा आधुनिक जननिक अभियांत्रिकी तंत्राचा [→रेणवीय जीवविज्ञान ] वापर होऊ शकेल.
खारवट जमिनीची समस्या सोडविण्यासाठी लवण वनस्पतींचा उपयोग कितपत होऊ शकेल याबद्दलचे चित्र अद्याप तितकेसे स्पष्ट नाही. वनस्पतींची लवणसह्यता, उत्पादकता, उत्पादनाची प्रत, प्रजननावरील परिणाम इ. बाबींवर अधिक प्रकाश पडल्यावरच या समस्येवर तोडगा निघण्याची शक्यता आहे.
पहा : दलदल परिस्थितिविज्ञान.
संदर्भ : 1. Chapman, V. J. Coastal Vegetation, Oxford, 1976.
2. Hotchkiss, N. Marsh Wealth, New York, 1964.
3. Mitra, J. N. An Introduction to Systematic Botany and Ecology, Calcutta, 1964.
परांडेकर, शं. आ. भागवत, श. द.
“