ललित कला अकादमी : भारतीय संस्कृती व कलापरंपरा यांचे जतन व संवर्धन व्हावे, याकरिता केंद्र शासनाने शासकीय प्रशासनाच्या बंधनापासून मुक्त अशी, स्वायत्त व राष्ट्रीय स्तरावर ललित कला अकादमी ही संस्था ऑगस्ट १९४५ मध्ये स्थापन केली. चित्रकला, शिल्पकला, वास्तुकला, व अन्य कनिष्ठ-उपयोजित कला यांचा अभ्यास, संशोधन, प्रसार, तसेच कलाशिक्षण देणाऱ्या संस्थांना उत्तेजन व आर्थिक मदत इ. कार्ये या अकादमीतर्फे केली जातात. यांखेरीज राष्ट्रीय स्तरावर वार्षिक प्रदर्शने भरविणे, आंतरराष्ट्रीय प्रदर्शने आयोजित करणे, कलाविषयक साहित्य प्रकाशित करणे इ. अनेक कामे ही संस्था करते.
अकादमीचा कार्यभार पाहण्याकरिता दर पाच वर्षातून एकदा सर्वसाधारण परिषदेची (जनरल कौन्सिल) नियुक्ती केली जाते. संबध देशातील कलाकार-मतदारांच्या तर्फे सभासदांच्या निवडणुका होतात. त्याची एक निश्चित संख्या असून, त्याशिवाय खास निमंत्रित केलेले काही प्रथितयश कलांवत तसेच राज्यांनी पाठवलेले आपले प्रतिनिधी राष्ट्रीय संग्रहालय, ‘नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट’, केंद्र शासनाचा सांकृतिक विभाग इत्यादींनी पाठवलेले प्रतिनिधी यांचा सर्वसाधारण परिषदेत समावेश असतो. अकादमीच्या अध्यक्षाची निवड राष्ट्रपतींच्याकडून होते व त्याची मुदत पाच वर्षाची असते. कार्यभाराप्रमाणे सर्वसाधारण परिषद वेगवेगळ्या उपसमित्या नियुक्त करते. नियमानुसार परिषद व उपसमित्या यांच्या सभा बोलावण्यात येतात.या संस्थेचे कार्यालय रवींद्र भवन, कलासंग्रह व इतर कचेऱ्या यांचा समावेश आहे.
कला अकादमीच्या सुसज्ज ग्रंथालयात पाश्चात्त्य कला व भारतीय कला यांच्यासंबंधी सर्व साहित्य उपलब्ध आहे. शिवाय ललितकला कंटेम्पररी ( इंग्रजी ) व ललितकला-समकालीन ( हिंदी ), तसेच ललितकला ही नियतकालिके नियमितपणे प्रकाशित होतात. प्रतिवर्षी कलासंवत् या पुस्तिकेतून संपूर्ण वर्षभरामधील कलाक्षेत्रातील महत्त्वाच्या घटना व कार्ये यांचा आढावा घेतला जातो. याशिवाय कलाविषयक इतर साहित्य, समकालीन चित्रकार-शिल्पकार यांच्या चरित्रपर व कला-कारकीर्दविषयक छोट्या पुस्तिका, छापिल चित्रसंग्रह व महत्त्वाच्या चित्रकारांच्या छापिल प्रतिकृती प्रसिद्ध केल्या जातात. आजवर भारतीय चित्रे व लघुचित्रे यांचे अनेक संग्रह व सचित्र पोस्टकार्डे अकादमीने प्रसिद्ध केली आहेत.
दरवर्षी जानेवारीच्या सुमारास संस्थेतर्फे राष्ट्रीय कला प्रदर्शन भरविले जाते. सर्व भारतातून येणाऱ्या हजारो कलाकृतींतून गुणसंपन्न कलाकृतींची काटेकोरपणे निवड केली जाते. त्यांतील दहा उत्कृष्ट कलाकृतींना प्रत्येकी दहा हजार रुपयांची परितोषिके दिली जातात. अकादमीच्या स्थापनेच्या वेळी प्रत्येक पारितोषिकाची रक्कम केवळ एक हजार होती. याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे दर तीन वर्षानी या संस्थेतर्फे ‘त्रिएनाले’ हे त्रैवार्षिक आंतरराष्ट्रीय कलाप्रदर्शन भरविले जाते. जगातील अनेक देश या प्रदर्शनासाठी निवडक कलाकृती पाठवतात.उत्कृष्ट कलाकृतींची निवड करण्यासाठी आंतरराष्ट्रीय परीक्षक समिती नेमली जाते व उत्कृष्ट कलाकृतींना प्रत्येकी पन्नास हजार रुपये रकमेची काही पारितेषिके दिली जातात. प्रतेक देशाचा स्वतंत्र विभाग या प्रदर्शनात मांडला जातो. त्याचबरोबर भारताच्या दालनात निवडक भारतीय कलाकारांच्या शिल्पकृती व चित्रे प्रदर्शित केली जातात. या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाला जोडूनच ‘कला-मेळा’ हे सर्व कलाकारांना मुक्त प्रवेश असलेले प्रदर्शन भरविले जाते.
याशिवाय संस्थेची स्वतःची कार्यशाळा दिल्ली येथे कालकादेवी रोड, गढी येथे असून यात आठ स्वतंत्र चित्रशाळा व चार सार्वजनिक कार्यशाळा आहेत. यांपैकी स्वतंत्र चित्रशाळा प्रथितयश कलाकारांसाठी असून सामूहिक कार्यशाळा मृत्पात्री, शिल्पकला व मुद्रानिर्मिती या कलाक्षेत्रांत काम करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी व कलावंतांसाठी खुल्या आहेत. संस्थेतर्फे चित्रकला, शिल्प व मुद्रानिर्मिती या विषयांत काम करण्यासाठी दरमहा एक हजार रुपयांच्या पाच संशोधन-शिष्यवृत्त्या कलाक्षेत्रातील पदवीधर विद्यार्थ्यांना दरवर्षी दिल्या जातात. या कार्यशाळा दिल्ली विकास प्राधिकरणाने १९७४ मध्ये बांधून दिल्या. दिल्लीच्या ‘ गढी ’ कार्यशाळेचा प्रयोग फलदायी वाटल्यामुळे अकादमीने विभागीय केंद्रांची योजना आखली. या योजनेअंतर्गत मद्रास, लखनौ, कलकत्ता येथे अनुक्रमे १९७८, १९८३ व १९८४ मध्ये कार्यशाळा बांधण्यात आल्या. १९८७ मध्ये भुवनेश्वर येथे ‘राष्ट्रीय कला केंद्र’ या नावाने अशाच कार्यशाळा कार्यन्वित करण्यात आल्या. संबंधित राज्यांच्या सहकार्यानेच या केंद्राची उभारणी झाली आहे. केंद्र उभे करण्याकरिता लागणारी जमीन राज्याकडून विन्यामूल्य देण्यात येते व इमारत, यंत्रसामग्री इत्यादींकरिता लागणाऱ्या खर्चाचा निम्मा वाटा संबंधित राज्याने उचलला आहे. केंद्राची देखभाल, व्यवस्थापन व संयोजन अकादमीकडून पाहिले जाते.
भागवत, नलिनी