लर्नर, ॲबा पी. : (१९०-१९८२). रूमानियात जन्मलेले, परंतु पुढे ब्रिटिश नागरिकत्व पतकरलेले आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अर्थशास्त्रज्ञ. ॲबा यांच्या जन्मानंतर थोड्याच कालावधीत लर्नर कुटुंबाने ग्रेट ब्रिटनकडे स्थलांतर केले व लर्नर हे लंडनमध्येच वाढले. वयाच्या सोळाव्या वर्षी कपडे शिवण्याचे, बुचे तयार करण्याचे, त्यानंतर हिब्रू भाषेच्या अध्यापनाचे त्यांनी काम केले. अध्यापनाचे काम थांबवून त्यांनी स्वतःचा छापखाना सुरू केला महामंदीच्या काळात तो बंद पडला. छापखान्याचे दिवाळे का निघाले, याचा शोध घेण्यासाठी त्यांनी ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’ मध्ये विद्यार्थी म्हणून नाव दाखल केले. उत्तम विद्यार्थी म्हणून तेथे ते चमकले. त्यांना तेथे अनेक पुरस्कार मिळाले. त्यांयोगे केंब्रिजला जाऊन केन्स यांच्याबरोबर अभ्यास करण्याची त्यांना संधी मिळाली. कोलंबिया, रूझवेल्ट, जॉन्स, हॉपकिन्स, मिशिगन, हिब्रू यांसारख्या ख्यातनाम विद्यापीठातून तसेच ‘न्यू स्कूल फॉर सोशल रिसर्च’ सारख्या संस्थेतून त्यांनी अध्यापनकार्य केले. अमेरिकेतील रँड कॉर्पोरेशन (१९४९), जिनीव्हा येथील यूरोपीय आर्थिक आयोग (१९५०-५१), इझ्त्राएलची बँक ऑफ इझ्त्राएल तसेच वित्तमंत्रालय इत्यादींचे अर्थसल्लागार (१९५५-५६) म्हणूनही त्यांनी काम केले. अमेरिकेतील ‘सेंटर फॉर ॲडव्हान्स्ड स्टडी इन बिहेव्हिओरल सायन्सिस’ या संस्थेत ते सन्माननीय सदस्य म्हणून काम करीत होते. ‘ अमेरिकन इकॉनॉमिक असोसिएशन’ या संस्थेचे १९६३ मध्ये ते उपाध्यक्ष, तर १९६६ मध्ये सन्माननीय सदस्य बनले. लंडन अर्थशास्त्र संस्थेची त्याना १९७० मध्ये सन्मान्य अधिछात्रवृती देण्यात आली. १९७१ मध्ये ते ‘अमेरिकन अकॅडेमी ऑफ आर्ट्स अँड सायन्सिस’ या संस्थेचे अधिछात्र होते. १९७३ मध्ये ते ‘युनिव्हर्सिटी सेंटर फॉर रॅशनल आल्टरनेटिव्ह्ज’ या केंद्राचे अध्यक्ष म्हणून काम पाहू लागले. १९७४ मध्ये त्याना अमेरिकेच्या ‘नॅशनल अकॅडेमी ऑफ सायन्सिस’ या संस्थेचे सदस्यत्व बहाल करण्यात आले. १०८० मध्ये ते ‘अटलांटिक इकॉनॉमिक सोसायटी ’ चे अध्यक्ष बनले. पुढे दोन बर्षानी त्यांचे निधन झाले.
आंतरराष्ट्रीय व्यापार, कल्याणाचे अर्थशास्त्र, समाजवादाचे अर्थशास्त्र, साकलिक अर्थशास्त्र, केन्सप्रणीत अर्थशास्त्रीय सिद्धांतांचे व्यावहारिक उपयोजन इ. क्षेत्रात लर्नर यांनी विशेष योगदान केले आहे. सरकारच्या राजकोषीय नीतीचे मूल्यमापन पारंपारिक सिद्धांतांच्या दृष्टिकोनातून न करता अर्थकारणावर त्या नीतीचा कसा परिणाम झाला त्यावरून करावे, असे त्यांनी ‘फंक्शनल फायनान्स’ या त्यांच्या गाजलेल्या संकल्पनेत मांडले. तुटीच्या अर्थकारणाचा सिद्धांत मांडण्याचे श्रेय लर्नर यांना देण्यात येते मागणीवक्राच्या वर्तुळ-खंडाच्या लवचिकतेचे त्यांनी मापन केले. वस्तूची किंमत सीमांत परिव्ययापेक्षा किती जास्त आहे, त्यावरून मक्तेदारीच्या प्रमाणाचे मोजमाप करता येते, असे त्यांनी सिद्ध केले.
लर्नर यांनी लिहिलेला सर्वोत्तम ग्रंथ म्हणजे द इकॉनॉमिक्स ऑफ कंट्रोल ( १९४४) हा होय. कल्याणकारी अर्थकारणासंबंधीचा, गणिताचा आधार न घेता लिहिलेला हा ग्रंथ विकेंद्रित समाजवादी अर्थव्यवस्थेत नियोजनकारांना व उद्योजकांना सम्यक् दिशा दाखवितो. इकॉनॉमिक्स ऑफ एम्प्लॉयमेंट (१९५२), एसेज इन इकॉनॉमिक ॲनलिसिस (१९५३) हे ग्रंथही विशेष प्रसिद्ध आहेत. फ्लेशन (१९७३) मॅप-ए-मार्केट अँटी इन्फ्लेशन प्लॅन ( सहलेखक डी. कोलँडर-१९८०) हे त्यांचे प्रसिद्ध ग्रंथ होत.
गद्रे, वि. रा.