कल्याणकारी अर्थशास्त्र : मुख्यत: आर्थिक धोरणांच्या तत्त्वांशी संबंध असलेली अर्थशास्त्राची शाखा. निरनिराळ्या आर्थिक घटना व शासकीय धोरणे यांचे समाजाच्या कल्याणावर काय परिणाम होतात, याचा अभ्यास ही शाखा करते व म्हणून तिला आर्थिक धोरणांची तत्त्वप्रणाली असे समजतात. वेगवेगळ्या पर्यायी आर्थिक व्यवस्थांचा सामाजिक कल्याणाच्या दृष्टिकोणातून योग्य क्रम लावण्यासाठी जी तत्त्वे आवश्यक असतात, त्यांचा विचार अर्थशास्त्राच्या ह्या शाखेत केला जातो.

धोरणविषयक मार्गदर्शन करणे हे अर्थशास्त्राचे कार्य आहे की नाही, हा प्रश्न सनातन अर्थशास्त्रज्ञांना पडल्याचे दिसत नाही. अर्थशास्त्राचे ते कार्य आहे, हे त्यांनी जवळजवळ गृहीतच धरले होते. अर्थशास्त्र ही राज्यव्यवहाराचीच एक शाखा, असे ते मानीत व तिला राजकीय अर्थकारण अशी संज्ञा देत. कोणत्याही गोष्टीपासून मनुष्याला होणारे सुख अथवा दुःख यांचे मापन करता येणे शक्य आहे, असे मिलप्रभृती उपयुक्ततावादी विचारवंत मानत व मानवाच्या सुखात वाढ करणारे अथवा दुःख कमी करणारे धोरण, मग ते प्रसंगी हस्तक्षेपाचेही असले, तरी स्वीकारले पाहिजे असे प्रतिपादन करीत. उपयुक्तता मापनीय नाही आणि म्हणूनच ती धोरणविषयक मार्गदर्शन करू शकणार नाही, असा विचार विसाव्या शतकाच्या सुरुवातीस पुढे येऊ लागला परंतु मार्शलसारख्यांनी या विचाराला फारसे महत्त्व दिले नाही. उलट, एका शिलिंगापासून एका इंग्रजास जेवढे समाधान प्राप्त होते, तेवढेच दुसऱ्या कोणत्याही इंग्रजाला प्राप्त होते असे गृहीत धरण्यास मुळीच हरकत नाही, असे मार्शलने स्पष्टपणे म्हटले. ह्या विचारसरणीचा उत्कृष्ट आविष्कार पिगू ह्यांच्या १९२० मध्ये प्रसिद्ध झालेल्या द इकॉनॉमिक्स ऑफ वेल्फेअर (कल्याणाचे अर्थशास्त्र) ह्या ग्रंथात आढळतो. मात्र पिगू ह्यांनी कल्याणाच्या अर्थशास्त्राला एक मर्यादा घातली. पैसा ही फूटपट्टी धरून ज्याचे मापन पैशाच्या भाषेत करता येते, तेवढाच कल्याणाचा भाग अर्थशास्त्राने विचारात घ्यावा व तेवढ्यापुरतेच आपले मार्गदर्शन मर्यादित करावे. उत्पादनघटक वाढवावे न लागता राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होणे म्हणजे अर्थव्यवस्थेची कार्यक्षमता वाढणे आणि श्रीमंतांकडून गरीबांकडे संपत्तीचे हस्तांतर होणे म्हणजे आर्थिक विषमता कमी होणे, ह्या दोन आर्थिक कल्याणाच्या कसोट्या समजाव्यात व त्यांना उतरणार्‍या आर्थिक धोरणाचा आग्रह अर्थशास्त्राने धरणे अयोग्य नाही, असा पिगूंच्या प्रतिपादनाचा आशय होता. १९३२ मध्ये प्रसिद्ध झालेल्या रॉबिन्स ह्यांच्या ॲन एसे ऑन द नेचर ऍन्ड सिग्निफिकन्स ऑफ इकॉनॉमिक सायन्स  ह्या ग्रंथात त्यांनी निरनिराळ्या व्यक्तींना उपभोगापासून प्राप्त होणाऱ्या समाधानाची तुलना करणे हे मुळातच अशास्त्रीय आहे, असा युक्तिवाद जोरदारपणे पुढे मांडला. निरनिराळ्या व्यक्तींना होणार्‍या समाधानाची तुलना हाच कल्याणकारी अर्थशास्त्रातील धोरणविषयक मार्गदर्शनाचा पाया असल्यामुळे रॉबिन्स यांचा मुद्दा मान्य केल्यास कल्याणकारी अर्थशास्त्रास शास्त्रीय आधारच रहात नाही व धोरणविषयक उपदेश किंवा शिफारस करण्याचा अधिकारही अर्थशास्त्रज्ञास मिळत नाही. ह्याचा परिणाम असा झाला की, बऱ्याच अर्थशास्त्रज्ञांनी आर्थिक धोरणाविषयी मार्गदर्शन करण्याचे टाळले व आर्थिक घटनांचे केवळ निरीक्षण, वर्णन, वर्गीकरण व संकलन एवढीच आपली जबाबदारी असते, असे ते मानू लागले. काही काळानंतर ह्या विचारसरणीविरुद्ध एक प्रतिक्रिया उमटली. मंदीमुळे उत्पन्न झालेल्या समस्यांवर उपाय सुचविण्यास आपण असमर्थ आहोत, ह्या परिस्थितीची बोचक जाणीव झालेले अर्थशास्त्रज्ञ आपणास मार्गदर्शन करण्यास वाव मिळेल अशा संधीची वाट पहात होते. ही संधी त्यांना केन्स ह्यांच्या द जनरल थिअरी ऑफ एम्प्लॉयमेंट इंटरेस्ट अँड मनी (१९३६) ह्या पुस्तकाच्या प्रकाशनाने मिळाली. तेव्हापासून बरेच अर्थशास्त्रज्ञ धोरणविषयक सूचना करण्यास पुन्हा धजू लागले. पूर्ण रोजगार, पूर्ण रोजगार उत्पादन आणि पूर्ण रोजगारास पूरक असलेल्या धोरणांचा ते हिरिरीने पुरस्कार करू लागले. एका अर्थाने कल्याणकारी अर्थशास्त्राचा पुनर्जन्मच झाला. अर्थात रॉबिन्स ह्यांच्या मुद्याचे खंडन मात्र त्यांच्यापैकी कोणासच करता आले नव्हते. १९३८ मध्ये हॅरॉड ह्या अर्थशास्त्रज्ञाने एक गोष्ट मान्य केली. ती अशी की, निरनिराळ्या व्यक्तींच्या समाधानांची तुलना करता येणे अशक्य आहे हा मुद्दा काटेकोरपणे पाळावयाचा म्हटला, तर अर्थशास्त्रज्ञ कुचकामी व समाजाच्या दृष्टीने निरुपयोगी ठरतात. सनातनवादी व नवसनातनवादी अर्थशास्त्रज्ञांनी मानलेली निरनिराळ्या व्यक्तींच्या समाधानांच्या समानतेबद्दलची गृहीतके स्पष्टपणे विशद करून अर्थशास्त्रज्ञांनी धोरणविषयक मार्गदर्शन करीत जावे, असा हॅरॉड यांचा आग्रह होता.

कल्याणकारी अर्थशास्त्राला शास्त्रीय आधार मिळणे शक्य आहे काय, याबाबतच्या पुनर्विचारातूनच नवे कल्याणकारी अर्थशास्त्र उदयास आले. त्याची भूमिका अशी आहे की, कोठल्याही आर्थिक धोरणाचे किंवा व्यवस्थेचे दोन परिणाम होतात : एक अर्थव्यवस्थेच्या कार्यक्षमतेवर व दुसरा त्यामुळे होणाऱ्या कल्याणाच्या विभाजनावर. त्यांपैकी केवळ कार्यक्षमतेवरील परिणामाची कसोटी लावून अर्थशास्त्रज्ञांनी धोरणविषयक मार्गदर्शन करण्यास काहीच प्रत्यवाय नाही. हिक्स ह्यांनी या प्रतिपादनास दुजोरा दिला. कॅल्डॉर ह्यांचाही निराळ्या कारणांसाठी ह्या विचारसरणीस आधार मिळाला. कॅल्डॉर ह्यांचे म्हणणे असे की, कार्यक्षमतेवरील परिणाम हीच कल्याणाची कसोटी अर्थशास्त्रज्ञानेमानावी. विभाजनावरील परिणामांची योग्य ती दखल घेण्यास राजकारणी मंडळी समर्थ असल्याने त्यांचा विचार अर्थशास्त्रज्ञाने करण्याची गरज नाही. कॅल्डॉर ह्यांच्या भूमिकेस लिटल ह्या अर्थशास्त्रज्ञांचा विरोध आहे. त्यांचे म्हणणे असे आहे की, अर्थशास्त्रासारख्या सामाजिक शास्त्रात जीवनमूल्यांचा विचार टाळता येत नाही म्हणून कोणत्याही अर्थशास्त्रज्ञाने आर्थिक धोरणाचे विवेचन करताना आपण कोणती जीवनमूल्ये मानतो, हे स्पष्ट केले पाहिजे. गृहीत जीवनमूल्यांवरच कल्याणकारी अर्थशास्त्र अधिष्ठित केले पाहिजे, अशी लिटल यांची भूमिका आहे.

कल्याणकारी अर्थशास्त्राच्या विचारसरणीस आणखीही एक वळण बर्गसन ह्यांनी दिले. त्यांनी ‘सामाजिक कल्याण’ ही कल्पना मांडली. प्रत्येक व्यक्तीला आपले कल्याण जसे समजते तसेच आपले कल्याण कोणत्या समाजस्थितीत साधते, हेही समजू शकते. समाजाच्या कल्याणाबाबत मतस्वातंत्र्य असणारी व्यक्ती ज्याप्रमाणे स्वतःपुरती कल्याणविषयक प्राधान्यश्रेणी ठरविते, तशी समाजाची कल्याणविषयक प्राधान्यश्रेणी ठरविता येईल व त्यावरून समाजाचे उच्चतम कल्याण कोणत्या धोरणामुळे होऊ शकेल, याचा अदमास गृहीत जीवनमूल्यांचा आधार न घेता करता येईल. सामाजिक प्राधान्यश्रेणी गृहीत धरून जास्तीत जास्त सामाजिक कल्याणाची परिस्थिती कोणत्या मार्गाने अस्तित्वात येईल, याबाबतचे मार्गदर्शन अर्थशास्त्रज्ञ करू शकतील. वरील सर्व विवेचनाचा सारांश असा निघतो की, नवे कल्याणकारी अर्थशास्त्र किंवा सामाजिक कल्याणकल्पना ह्यांच्यामुळे अर्थशास्त्रज्ञांवरील शृंगापत्ती टळली आहे, असे नाही. एवढेच फारतर निश्चितपणे म्हणता येते की, काही बाबतींत व काही समाजासंबंधीच अर्थशास्त्रज्ञांस धोरणविषयक मार्गदर्शन केवळ कार्यक्षमतेची कसोटी लावून करता येते. इतर बाबतींत मार्गदर्शन करताना त्याने कार्यक्षमता व विभाजन ह्या दोहोंवरील परिणाम ध्यानात घेऊनच शिफारशी केल्या पाहिजेत व त्या करताना आपण मानलेली गृहीतके स्पष्ट केली पाहिजेत.

कल्याणकारी अर्थशास्त्रातील सिद्धांत मांडताना बहुतेक ठिकाणी वास्तविक अर्थशास्त्रातील प्रतिपादनपद्धतीचाच उपयोग केलेला आढळतो. उदा., समाजातील आवडीनिवडी स्थिर मानल्या आहेत, माहितीच्या आधारे अनिश्चितता सहज दूर करता येते असे समजण्यात आले आहे आणि अर्थव्यवस्थेत सुचविलेल्या कल्याणकारी फेरबदलांमुळे होणाऱ्या दीर्घकालीन अनिष्ट परिणामांकडे दुर्लक्ष केले आहे. या गृहीतकांतूनच कल्याणकारी अर्थशास्त्राच्या तत्त्वप्रणालीतील दोष उद्भवतात. एक तर समाजातील आवडीनिवडी स्थिर नसून बदलत जातात, हे सत्य दृष्टीआड केल्यामुळे आवडीनिवडी बदलल्याने उद्भवणाऱ्या परिस्थितीत कल्याणकारी अर्थशास्त्राचा फारसा उपयोग होत नाही. दुसरा दोष हा की, आधुनिक काळी वस्तूंमध्ये आढळणारी विभिन्नता व गुंतागुंत लक्षात घेता, त्यांची उपभोक्त्यांना माहिती करून देण्याचा खर्च व खटाटोप वाढत जातो आणि अनिश्चिततेतही भरच पडते. शिवाय तिसरा दोष हा संभवतो की, कल्याणकारी अर्थशास्त्रातील कसोट्यांच्या आधारे सुचविलेले फेरबदल तात्कालिक दृष्ट्या फायदेशीर वाटले, तरी त्यांतील काहींपासून दीर्घ काळात अनिष्ट परिणाम संभवतात. म्हणून कल्याणकारी अर्थशास्त्राने सुचविलेले धोरण सामाजिक सुखात भर टाकेलच, असे धरून चालता येत नाही. असे असले, तरी सुसंपन्न समाजातील दोष उघडकीस आणून कल्याणकारी अर्थशास्त्र अर्थव्यवस्थेतील अन्यायावर प्रकाश पाडू शकते, यांत शंका नाही. यामुळेच अर्थशास्त्राची ही शाखा धोरणविषयक मार्गदर्शन करण्यास उपयुक्त आहे, असे म्हणावे लागते. मात्र धोरण सुचविणार्‍याने आपली जीवनमूल्ये, आपण गृहीत धरलेल्या गोष्टी आणि कल्याणकारी अर्थशास्त्राच्या मर्यादा स्पष्ट करणे अत्यावश्यक ठरते.

पहा : अर्थनीति आर्थिक विचार : इतिहास आणि विकास उपयोगिता पारेअतो, व्हिलफ्रेदो पिगू, आर्थर सेसिल मार्शल, ॲल्फ्रेड व्हालरा, लेआँ सरकारी खर्च.

संदर्भ : 1. American Econimic Association and the Royal Economic Society, Surveys of Economic  Theory, vol. I, London, 1965.

    2. Arrow, K. J. Social Choice and Individual Values, New York, 1951.

    3. Hasan, S. F. Introduction to Welfare Economics, Bombay, 1963.

   4. Hicks, J. R. Value and Capital, Oxford, 1939.

   5. Kundu, K. B. Welfare Economics, Calcutta, 1964.

   6. Little, I. M. D. A Critique of Welfare Economics, London. 1960.

   7. Pigou, A. C. Economics of Welfare, London, 1920.

   8. Scitovsky, T. Papers on Welfare and Growth, London, 1964.

धोंगडे, ए. रा.