काळा बाजार : ज्या व्यवहारात वस्तूंच्या खरेदी-विक्रीच्या किंमती कायद्याने नियंत्रित करूनही वरच्या पातळीवर राहतात, त्याला ‘काळा बाजार’ म्हणतात. काळा बाजार ही संज्ञा प्राचीनच आहे. चाणक्याच्या अर्थशास्त्रात त्याची दखल घेतलेली दिसते. रोमन साम्राज्याच्या इतिहासात काळ्या बाजाराचा उल्लेख आढळतो. आधुनिक काळात या संज्ञेचा सर्वसामान्य वापर जर्मनीत पहिल्या महायुद्धाच्या काळापासून होऊ लागला व त्याच वेळी कमाल किंमती व ⇨ रेशनिंग  या गोष्टी प्रथम अंमलात आणल्या गेल्या. दुसऱ्या महायुद्धात बहुतेक सर्व देशांत काळा बाजार कमीजास्त प्रमाणात चालू होता. इंग्लंड, अमेरिकेसारख्या देशांतही दारू, कापड, साखर, टायर, पेट्रोल वगैरे वस्तूंचा काळा बाजार चालू होता. सिगारेटी व पेट्रोल ह्यांसारख्या दुर्मिळ वस्तूंचा काळा बाजार करणाऱ्या अमेरिकन सैनिकांना अत्यंत कडक शिक्षा देण्यात आल्या. दुसऱ्या महायुद्धानंतरही बऱ्याच देशांत काळा बाजार चालूच राहिला असून त्यात चैनीच्या वस्तूंप्रमाणे अन्नधान्यासारख्या जीवनावश्यक गोष्टींचाही समावेश होतो. परकीय चलनाचाही काळा बाजार मोठ्या प्रमाणावर होत असतो. भारतात मोठ्या प्रमाणावर काळा बाजार चालू असल्याचे सर्रास बोलले जाते व सरकारी रीत्याही त्याची थोडीबहुत कबुली देण्यात येत असते.

कोणत्याही वस्तूची किंमत निर्धारित केल्यावर ⇨ किंमत नियंत्रणाचे यश त्या वस्तूचा एकंदर पुरवठा, पुरवठ्याची लवचिकता व त्या वस्तूची मागणी यांवर अवलंबून असते. भाव नियंत्रित केलेल्या व वाटपपद्धतीचा अवलंब केलेल्या वस्तूंच्या पुरवठ्यावरील सरकारी नियंत्रणाच्या ढिलेपणामुळे वा अपूर्णतेमुळे काळ्या बाजाराचा प्रादुर्भाव होतो. काळा बाजार हा प्रामुख्याने कायद्याविरुद्ध वागणाऱ्यास होणाऱ्या शिक्षेचे स्वरूप, उद्योगधंद्याची स्थिती, उत्पादनावरील नियंत्रणाची अंमलबजावणी, पैशाची सीमांत उपयोगिता व अनियंत्रित बाजारपेठेचा व्याप या गोष्टींवर अवलंबून असतो. ज्या ठिकाणी वरील गोष्टींबाबत योग्य ती काळजी घेण्यात आलेली असते, तेथे काळ्या बाजाराची तीव्रता कमी असते. काही वस्तूंच्या बाबतीत बेकायदेशीर देवघेवी सिद्ध करणे अवघड असल्याने त्या वस्तूंबाबतचा काळा बाजार अधिक चालतो. उदा., शेतमालाच्या बाबतीतील काळा बाजार हुडकून काढणे व सिद्ध करणे भा‌वनियंत्रण संस्थेला नेहमीच अवघड जाते.

काळ्या बाजारामुळे निकृष्ट दर्जाच्या वस्तू उत्पादन करण्याची प्रवृत्ती निर्माण होते. किती तरी ‌अधिक किंमत मोजूनही खात्रीचा व शुद्ध स्वरूपातील माल मिळेल, ह्याची खा‌त्री देता येत नाही. अन्नपदार्थ व औषधे ह्यांसारख्या वस्तूंच्या बाबतीतही असे होऊ लागते व ह्याने सबंध समाजजीवन धोक्यात येते. काळ्या बाजारामुळे सामाजिक मूल्यांचाच ऱ्हास होऊन एकूण समाजाचे नैतिक अध:पतन होत असते.

१९६२ सालापासून भारतामध्ये भारत संरक्षण कायद्यान्वये काळा बाजार करणाऱ्या व्यापाऱ्यांवर करडी नजर ठेवण्यात आली आहे. १९६५–६६ मध्ये कोट्यवधी रुपयांचा काळा पैसा उजेडात आला. तथापि अद्यापही काळ्या बाजाराचे नियंत्रण करण्याबाबत म्हणावे तसे यश आलेले दिसत नाही. उलट, करचुकवेगिरीचे प्रमाण वाढल्यामुळे काळ्या पैशाची अर्थव्यवस्थेवरील पकड अतोनात वाढली आहे.

संदर्भ : 1. Boulding, K. E. A Note on the Theory of the Black Market, Canadian Journal of Economics and Political Science, Vol. XIII, Toronto, 1947.

2. Charlesworth, H. K. The Economics of Repressed Inflution, London, 1956.

सुर्वे, गो. चिं.