व्हेब्लेन, थॉर्स्टाइन  बंड : (३० जुलै १८५७–३ ऑगस्ट १९२९). अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ व समाजवेत्ता. त्याचा जन्म वाल्डर्स (विस्कॉन्सिन, अमेरिका) येथे झाला. कार्लटन महाविद्यालयात आणि जॉन हापकिन व कार्नेल विद्यापीठांत त्याचे शिक्षण झाले. १८९२ ते १९२७ या काळात शिकागो, स्टॅन्‌फोर्ड, मिसूरी या विद्यापीठांत व न्यूयॉर्कच्या नवसमाज संशोधनसंस्थेत व्हेब्लेनने अध्यापनकार्य केले. द जर्नल ऑफ पोलिटिकल इकॉनॉमी हे नियतकालिक सुरू करण्यात (१८९२) व्हेब्लेनचा मोठा वाटा होता व १९०५ पर्यंत तो त्या नियतकालिकाचा व्यवस्थापकीय संपादक होता. १९१८-१९ मध्ये ⇨ जॉन ड्यूई व हेलेनमॅरॉट यांच्याबरोबर व्हेब्लेनने द डायल या वृत्तपत्रात ‘युद्धोत्तर पुनर्रचना’ या विभागात संपादक म्हणूनही काम केले. व्हेब्लेन हा भांडवलशाही समाजाचा कठोर टीकाकार होता. मात्र मार्क्सवादाबद्दल त्याला कधीच आकर्षण नव्हते. मार्क्सवादात भांडवलदार आणि श्रमजीवी वर्ग यांच्यासंबंधीच्या सामाजिक व मानसशास्त्रीय विश्लेषणाचा अभाव असून त्याची मते केवळ अमूर्त स्वरूपाची आहेत, असे व्हेब्लेनचे म्हणणे होते. डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धान्त ज्या काळात अतिशय मान्यता पावला होता, त्याच काळात व्हेब्लेनने तत्त्वज्ञान व सामाजिक विज्ञाने यांचे अध्ययन केले होते. या उत्क्रांतिवादाचा प्रभाव अर्थशास्त्रामध्ये निर्माण करण्याचे निर्णायक कार्य व्हेब्लेनने केले. बेंथॅमचे मानसशास्त्र व तत्कालीन नवसनातन अर्थशास्त्राची मर्यादित व्याप्ती यांच्यावर व्हेब्लेनने कडाडून हल्ला चढविला. अर्थशास्त्रीय विचार व धोरण यांच्यात आधुनिकता आणण्याच्या कामी व्हेब्लेन हा अतिशय प्रभावी उत्प्रेरक ठरला. आधुनिक अर्थशास्त्रीय विचारांच्या इतिहासात संस्थावादी विचारसरणीचा (इन्स्टिट्यूशनॅलिझम) उद्‌गाता म्हणून व्हेब्लेन प्रसिद्ध आहे. वस्तूची मागणी करताना लोक भपकेबाज उपभोगावर भर देतात व भारी किमतीला भरपूर वस्तू खरेदी करून मागणीच्या सिद्धान्ताला अपवाद ठरतात, असाही विचार त्याने मांडला. द थिअरी ऑफ द लीझर क्लास (१८९९) या पहिल्या पुस्तकाने व्हेब्लेनला तत्काळ कीर्ती मिळवून दिली. या पुस्तकात उद्योगी व लुटारू यांच्यामध्ये चालू असलेला शाश्वत संघर्ष म्हणजेच संस्कृती व संघर्षाचे स्वरूप सतत बदलत असते, असे प्रतिपादन केले आहे. व्हेब्लेन हा मुख्यत्वेकरून तत्त्वज्ञ असल्याने त्याला व्यावसायिक अर्थशास्त्रज्ञांविषयी फारसे आकर्षण नव्हते. व्हेब्लेनची प्रगाढ विद्वत्ता आणि मूलग्राही कल्पना यांच्यामुळे तत्कालीन समाजशास्त्रीय विचारावरही त्याचा फार मोठा प्रभाव पडला. व्हेब्लेनचे आणखीही काही महत्त्वाचे ग्रंथ असे : (१) द थिअरी ऑफ बिझनेस एंटरप्राइझ (१९०४) (२) द इनस्टिंक्ट ऑफ वर्कमनशिप अँड द स्टेट ऑफ इंडस्ट्रिअल रिव्होल्यूशन (१९१५), (३) इंपीरियल जर्मनी अँड द इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन (४) ॲन इनक्वायरी इन टू द नेचर ऑफ पीस अँड द टर्मस् ऑफ इट्‌स परपेच्युएशन (१९१७)  (५) द प्लेस ऑफ सायन्स इन मॉडर्न सिव्हिलायझेशन अँड अदर एसेज (१९१९) (६) द इंजिनिअर्स अँड द प्राइस सिस्टिम (१९२१)  (७) ॲब्सेंटी ओनरशिप अँड बिझनेस एंटरप्राइझ इन रिसेंट टाइम्स (१९२३). व्हेब्लेनचे ग्रंथ म्हणजे आधुनिक आर्थिक पद्धतीचा विकास आणि तिचे कार्य विविध बाजूंनी स्पष्ट करणारे विश्लेषणात्मक ग्रंथ मानले जातात. त्याच्या लिखाणातून तत्कालीन अमेरिकन समाजावर अचूक व मूलग्राही टीका केल्याचे आढळून येते. व्हेब्लेनचा समाजशास्त्रीय व्यासंग व मानवतावादी दृष्टिकोण वैशिष्ट्यपूर्ण आहे. व्हेब्लेनचे उत्क्रांतिवादी लिखाण ‘औद्योगिक तंत्रविद्या’ व ‘व्यवसाय’ (बिझनेस) या दोन आर्थिक समस्यांवर प्रकाश टाकणारे आहे. व्हेब्लेनचा प्रभाव इतर शास्त्रांवरही पडला. त्याच्या ग्रंथांमुळे वनस्पतिशास्त्रज्ञ जॅक्वेस लोएब व पदार्थविज्ञानशास्त्रज्ञ ॲल्बर्ट आइन्स्टाइन हे अतिशय प्रभावित झाले होते.  मेन्लो पार्क (कॅलिफोर्निया) येथे त्याचे निधन झाले.

संदर्भ : 1. Dorfman, J. Thorstein Veblen and His America, New York, 1934.

2. Riseman, D. Thorstein Veblen : A Critical Interpretation, New York, 1953.

गद्रे, वि. रा.