लबक : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी टेक्सस राज्यातील याच नावाच्या परगण्याचे मुख्यालय, व्यापारी व औद्योगिक केंद्र. लोकसंख्या-शहर १,७३,९७९ महानगर २, ११,६५१ (१९८०). हे ॲमेरिलोच्या दक्षिणेस १९६ किमी.वर असून दक्षिण मैदानी प्रदेशाचे ( साउथ प्लेन्स) व्यापार केंद्र समजले जाते. लबक हे सँता फे डेन्व्हर मार्गावर असून सस.पासून १,०६०मी. उंचीवर असल्यामुळे येथील हवामान अल्हाददायक आहे.

क्वेकर पंथीयांनी १८७० मध्ये हे गाव वसविले. पुढे ‘ओल्ड लबक’ व ‘माँटेरे’ या दोन गावांचे एकत्रीकरण करण्यात येऊन ‘लबक’ ची स्थापना झाली (१८९०). ‘टेक्सस स्वातंत्राच्या जाहीरनाम्या’वर स्वाक्षरी करणाऱ्या कर्नल टॉमस एस्. लबक यांचे नाव शहराला देण्यात आले. पुढे ते गाईगुरे, घोडे इत्यादींचे चराईचे व संवर्धनाचे केंद्र म्हणून विकसित झाले. या प्रदेशात आर्टेशियन भूजल मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्याने गहू, लांब धाग्याचा कापूस, सोयाबीन, भूईमूग, ऊस यांसारख्या मिश्रशेतीचा तसेच पशुपालनाचा येथे सम्यक् विकास झाल्याचे आढळते. सँता फे लोहमार्ग खुला झाल्यानंतर व १९९० मध्ये लबकला शहराची सनद प्राप्त झाल्यावर ते अमेरिकेतील एक आघाडीचे अंतर्गत कापूस बाजारपेठ तसेच सर्वांगी विकसित झालेले कृषि-औद्योगिक केंद्र म्हणून गणले जाऊ लागले.

खनिज तेल व तज्जन्य पदार्थ, खाणकाम यंत्रे, मृदूवाही यंत्रे, अभियांत्रिकीय वस्तू व उपकरणे, शेतीसाठी लागणारे जलसिंचन नळ व पंप, सरकी तेल उत्पादन, फिरती व पूर्वविरचित गृहे इत्यादींचे निर्मितिउद्योग शहरात आहेत. जवळच रीस वायुसेना विमानतळ असल्याने लबकला अधिकच महत्त्व लाभले आहे. त्यामुळे दक्षिणेकडील एक समृद्ध शहर म्हणून लबकला ख्याती प्राप्त झाली आहे.

शहरात टेक्सस टेक युनिव्हर्सिटी हे विद्यापीठ व लबक खिश्चन कॉलेज हे महाविद्यालय आहे. विद्यापीठ परिसरात उभारण्यात आलेल्या संग्रहालयाचे उदिष्ट प्रादेशिक, प्राकृतिक ( नैसर्गिक) आणि मानवी इतिहास ( मानवनिर्मित इतिहास) या सर्वांचे जतन व संवर्धन करणे, कलेच्या सर्व प्रकारांचे संकलन व प्रदर्शन करणे हे आहे. ‘रँचिंग हेरिटेज सेंटर’मध्ये पशुपालकांच्या विविध इमारतींच्या (रँच) प्रतिकृती तयार करून त्यांच्या प्रदर्शनाद्वारे पशुसंवर्धनशास्त्राचा (रँचिंग) इतिहास व विकास दाखविण्यात आला आहे. याशिवाय मॅकेंझी स्टेट पार्क हे उपवन तसेच बफालो लेक्स हे सरोवर ही दोन्ही पर्यटकांची आकर्षणे समजली जातात. प्रतिवर्षी शहरात भरणारी ‘पॅनहँडल साउथ प्लेन्स फेअर’ ही जत्रा वैशिष्ट्यपूर्ण ठरली आहे.

सबंध टेक्सस राज्याच्या इतिहासातील सर्वांत भीषण व हानिकारक ठरलेल्या, मे १९७० मधील झंझावातामुळे (टोर्नेडो) लबक शहराची प्रचंड हानी झाली व हजारो नागारिकांना बेघर व्हावे लागले. शहरात एक वाद्यवृंद, खगोलालय असून प्रेअरी कुत्र्यांच्या काही वसाहतीपैकी, ‘प्रेअरी डॉग टाउन’ नावची एक श्‍वानवसाहत पर्यटकांचे आकर्षण केंद्र बनली आहे.

डिसूझा आ.रे. गद्रे, वि. रा.