लढाऊ विमाने : (फाइटर प्लेन्स). वायुसेनेकडे असलेल्या आक्रमक विमानांचा प्रकार. वायुसेनेत असलेल्या लढाऊ विमानांचे कार्य मुख्यत्वेकरून तीन स्वरूपांचे असते. पहिले म्हणजे आपल्या प्रदेशांत घुसलेल्या शत्रूच्या आक्रमकी विमानांवर हल्ला चढवून त्यांचा हवाई लढाईमध्ये (डॉग-फाइट्) पाडाव करून नाश करणे किंवा त्यांना हल्ला सोडून परत जाणास भाग पाडणे. या तऱ्हेची विमाने अतिवेगवान व चपळ असतात. त्यांतील शस्त्रास्त्रेही शत्रूच्या विमानांना अचूक टिपून वरच्यावरच नेस्तानाबूत करण्याच्या उद्देशाने बनवलेली असतात. असा विमानांना ‘हवाई संरक्षक विमाने’ ही संज्ञा दिली जाते.
लढाऊ विमानांचे दुसरे काम म्हणजे युद्धभूमीनजीकच्या शत्रूप्रदेशात जाऊन त्याच्या विमानतळांवर किंवा जमिनीवरील विमानांवर हल्ला करून त्यांना निरुपयोगी करणे तसेच शत्रूच्या दारूगोळ्याच्या व तेलाच्या साठ्यांवर हल्ला चढवून त्यांचा नाश करणे, युद्धभूमीकडे येणारे लोहमार्ग, पूल इ. दळणवळण सुकर करणाऱ्या गोष्टीवर हल्ला चढवून आघाडीच्या सैन्याला रसद पुरविणे अवघड करून सोडणे आणि आपल्या प्रदेशावर हल्ला चढविण्याच्याच उद्देशाने एकत्रित केलेल्या शत्रूच्या सैन्यदलावर व रणगाडे, तोफखाने इत्यादींच्या तुकड्यांवर हल्ले चढवून त्यांची शक्ती खच्ची करणे. या तऱ्हेच्या विमानांना भू-हल्ला चढवणारी विमाने (ग्राउन्ड अटॅक् एअर्क्राफ्ट्) म्हणतात. ही विमाने संरक्षक विमानांएवढी चपळ नसतात, परंतु त्यांचा पल्ला अधिक दूरवरचा असतो. त्यांची शस्त्रसामग्रीही त्यांच्या लक्ष्यांचा नाश करील अशा तऱ्हेची, म्हणजे छोटेछोटे बाँब, रॉकेट व मोठ्या कॅलिबरच्या मशीनगन अशीच असते. त्यांच्यात अत्याधुनिक रडार सामग्री वसविलेली असल्याने युद्धाच्या धुमःश्चक्रीतूनही शत्रूच्या विवक्षित प्रदेशांत पोहोचणे किंवा स्वतःच्या विमानतळावर विनाप्रयास परतून येणे त्यांना सहज शक्य होते. याच तऱ्हेच्या विमानांत अतिशय प्रभावी कॅमेरे बसवून त्यांना गुपचूप शत्रुप्रदेशांत सुळकांडी मारून रणक्षेत्रातील शत्रूच्या सैन्यपथकांची हवाई छायाचित्रे काढून आणण्यास पाठविले जाते. या छायाचित्रांवरून शत्रूच्या एकंदर कुवतीची व इराद्यांची पूर्ण कल्पना येण्यास मदत मिळते. अशा तऱ्हेने आपली सैन्यरचना करून शत्रूचा हल्ला नाकाम करून टाकता येतो.
लढाऊ विमानांचे तिसरे काम म्हणजे शत्रुप्रदेशांत खूप दूरवर जाऊन त्याच्या उत्पादक कारखान्यांचा, महत्त्वाच्या शहरांचा किंवा बंदरांचा सपूर्ण नाश करून शत्रूचे लढण्याविषयीचे एकूण मनोबलच खच्ची करून त्याला शरणागती पतकरण्यास भाग पाडणे. यासाठी वापरली जाणारी विमाने प्रचंड आकारांची असतात व हजारो किलोमीटर दूर जाऊन प्रचंड वजनाचे मोठमोठाले बाँब ती लक्ष्यावर अचूक फेकू शकतात. अशा तऱ्हेच्या विमानांना बाँबफेकी विमाने म्हणून संबोधले जाते. या विमानांच्या संहारक शक्तीमुळे त्यांचे उत्पादन करणारी राष्ट्रे ती इतर देशांना विकत नाहीत. म्हणूनच ती केवळ अमेरिका, रशिया, ग्रेट ब्रिटन, चीन यांसारख्या बड्या राष्ट्रांच्या वायुसेनांतच आढळतात. शत्रूप्रदेशांत जाताना या विमानांबरोबर संरक्षक विमानेही पाठविली जातात. [⟶ बाँबफेकी विमाने].
विमान-बांधणीस येणाऱ्या प्रचंड खर्चाकडे लक्ष ठेवून अलीकडे बहुकार्यिक (मल्टि-रोल्) विमाने बनविण्याकडे अधिक लक्ष दिले जाते. अशी विमाने हवाई संरक्षक म्हणून किंवा भू-हल्ला चढविण्यासाठी वापरली जातात.
पहिल्या महायुद्धामध्ये (१९१४-१८) विमानांचे कार्य मर्यादित म्हणजे केवळ टेहळणी करणे एवढेच होते. पुढे हळूहळू हवाई शस्त्रसंहार व संदेशवहनाची साधने उपलब्ध झाली व विमाने आक्रमक पवित्रा घेऊ लागली. उदा., मशीनगन, तोफा वा बाँब यांचा लढाऊ विमाने उपयोग करू लागली.
भारतीय वायुसेनेच्या पहिल्या वायुपथकाची उभारणी १९३३ साली झाली. सुरुवातीला फक्त चार ‘वापिटी’ जातीची विमाने, सहा पायलट व २५ हवाई शिपाई अशा मर्यादित प्रमाणात या दलाचा शुभारंभ झाला. त्यांचा वापर वायव्य सरहद्दीवर पठाणी टोळ्यांना नेस्तनाबूत करणे व भूसेनेला साहाय्य देणे एवढ्यापुरताच मर्यादित होता.
दुसऱ्या महायुद्धात (१९३९-४५) वापिटी विमानांचा उपयोग करण्यात येऊन, त्यांचे एक स्वतंत्र स्क्वॉड्रन उभारण्यात आले. महायुद्धाअखेर ही संख्या दहा स्क्वॉड्रन इतकी झाली व त्यांत अत्याधुनिक ‘हॉकर हरिकेन’ व ‘स्पिटफायर’ अशा लढाऊ विमानांची भर पडली. १९४५ नंतर जेट व अण्वस्त्रधारी विमानांच्या युगात वायुसेनेत लढाऊ विमानांची अधिकच भर पडत गेली.
भारताच्या विभाजनानंतर (१९४७) पाकिस्तानी घुसखोऱ्यांनी काश्मीरवर हल्ले सुरू केले. अर्थातच त्यांना प्रतिबंध बसावा म्हणून भारतीय वायुसेनेने भूसेनेला काश्मीरमध्ये हवाई मार्गानेच (डकोटा ट्रॅन्स्पोर्ट) नेले. पुढे भारत-चीन संघर्ष (१९६२) व भारत-पाक संघर्ष (१९६५ व १९७१) झाले. तोपर्यंत वायुसेनेची एकूण संख्या पंचेचाळीस स्क्वॉड्रनइतकी वाढली. १९४७-७१ या काळात भारताने विविध प्रकारच्या लढाऊ विमानांची गरज परदेशांतून मिळतील ती विमाने खरेदी करून भागविली. त्यांत सुरुवातीला ‘स्पिटफायर’, ‘टेंपेस्ट’, ‘व्हँपायर’, ‘हंटर’ व ‘कॅनबेरा’ या ब्रिटिश बनावटीच्या व ‘ओरागान’ (भारतीय नाव ‘तुफानी’) व ‘मिस्टेअर’ या फ्रेंच शक्तिशाली लढाऊ विमानांचा प्रामुख्याने समावेश होता. यांव्यतिरिक्त डकोटा व पॅकेट परिवहन विमानांची पथकेही स्थापिली गेली. लढाऊ विमानांचे भारतातच उत्पादन व्हावे म्हणून भारताने बंगलोर येथे ‘हिंदुस्थान एअरक्राफ्ट् लिमिटेड’ (एच्एएल्) या कारखान्यात संशोधन व विकासकार्य जारीने सुरू केले.
भारताने इंग्लंडमधील ‘फॉलंड’ या ब्रिटिश कंपनीबरोबर सप्टेंबर १९५६ मध्ये एक करार करून त्याअन्वये लढाऊ विमानांचे तयार सांगाडे भारतात आणून, त्यांची बंगलोरमध्ये बांधणी सुरू केली. ‘नॅट’ हे पहिले भारतीय बनावटीचे लढाऊ विमान बांधण्यात आले. नॅट हे वजनाने हलके, आक्रमकी विमान असून त्याची खास वैशिष्ट्ये म्हणजे अतिद्रुत अशी आकाश-झेप, युक्तिचलनक्षमता व वेगवृद्धिक्षमता ही होत. भारत-पाक संघर्षात भारतीय वैमानिकांनी मोठ्या कुशलतेने नॅट विमानांचा वापर केला व नॅटपेक्षाही मूलभूत क्षमतेतच वरचढ अशा पाकिस्तानकडे असलेल्या अमेरिकी ‘सेवर’ विमानांशी समर्थपणे टक्कर देऊन, यश संपादन केले. सुधारलेल्या नॅट विमानाचे आता ‘अजित’ असे नाव ठेवण्यात आले असून त्याची संपूर्ण बनावट भारतीय आहे.
नॅट व व्हँपायर विमाने यांच्या निर्मितीबरोबरच संपूर्णतः भारतीय बांधणीचे दुसरे लढाऊ विमान मरूत- एच् एफ्-२४ हे होय. रामायणकाली मारुतीने वायुगतीने उड्डाण करून श्रीलंकेत पदार्पण केले, यावरून अतिवेगवान असलेल्या या एच् एफ्-२४ विमानाला ‘मरूत’ हे नामाभिधान देण्यात आले. मरुतचे पहिले उड्डाण १७ जून १९६१ रोजी झाले. मरुत हे पराध्वनिक असून त्याचा वेग मॅक १.०२ ( १,०८६ किमी.) आहे. त्याची आकाशझेप सु. १२,१९० मी. उंचीपर्यंत असून शस्त्रसंभार चार लाहान तोफा व १,००० पौंडांचे (४५० किग्रॅ.) चार बाँब असा आहे.
तंत्रज्ञानाच्या अभूतपूर्व वाढीबरोबरच नवनवीन शक्तिशाली लढाऊ विमानांची निर्मिती अटळ अशीच होती. तथापि ब्रिटिश व फ्रेंच लढाऊ विमानांची वयःसीमा झाली असल्याने पाश्चिमात्य राष्ट्रांकडून नवनवीत लढाऊ विमाने मिळण्याची भारताला आशा-अपेक्षा नव्हतीच. अशा परिस्थितीत १९६३ साली भारत-रशिया करार होऊन रशियाने मिग-२१ जातीची अत्याधुनिक लढाऊ विमाने भारताला देण्याचे तसेच या विमानांचे भारतातच यापुढे उत्पादन व्हावे माहणून भारतीय वैज्ञानिकांना आवश्यक ते प्रशिक्षण देण्याचेही मान्य केले. हिंदुस्थान एअरक्राफ्ट कारखाना (बंगलोर) याद्वारे या विमानांची निर्मिती भारतात तीन ठिकाणी होते. विमानांचा सांगाडा ओझर (महाराष्ट्र), शक्ति-संयंत्र (पॉवर प्लान्ट) कोरापुट (ओरिसा) आणि उड्डाण यंत्रसामग्री (एव्हिओनिक्स) बालानगर (हैदराबाद – आंध्र प्रदेश) येथे बनवितात. मिग-२१ मध्ये १९६३ नंतर बऱ्याच सुधारणा करण्यात आल्या. रशियन परवान्याखाली आता मिग-२३ या अधिक आधुनिक विमानांचे उत्पादन भारतात सुरू झाले. याशिवाय रशियाने भारतास मिग-२७ व मिग-२९ ही विमाने पूरवून भारतीय वायुसेनेचे दक्षिण आशियातील वर्चस्व अबाधित राखण्यास मदत केली आहे.
नॅट विमानांबरोबरच सुधारीत मिगचा वापर १९६५ व १९७१ च्या भारत-पाक संघर्षात करण्यात आला. या युद्धांत मिगच्या पाच स्क्वॉड्रनांनी भारताच्या पश्चिम आघाडीवर हवाई वर्चस्व टिकवून ठेवले, तर पाच स्क्वॉड्रनांनी बांगला देश आघाडीवर अभूतपूर्व कार्यवाही केली. बांगला देश सरकारची महत्वाची बैठक रात्री डाक्का शहरामध्ये राजभवनात चालू असल्याची माहिती गुप्तचरविभागाकडून मिळताच, अवघ्या पंधरा मिनीटांत दोन मिग स्क्वॉड्रनांनी केवळ पर्यटन नकाशाच्या साहाय्याने राजभवनावर रॉकेटचा हल्ला चढवून, बैठक उधळून लावली (१४ डिसेंबर १९७१). परिणामतः बांगला देश सरकारला बिनशर्त शरणागती पतकरावी लागली. जगात इतक्या धाडसी सूच्यग्र (पिन पॉइंट) हल्ल्याचे हे पहिलेच उदाहरण असावे.
भारताने १९६८ मध्ये रशियाबरोबर ‘सुखोई-७ एस.यू.’ या अत्याधुनिक, जमिनीवर मारगिरी करणाऱ्या लढाऊ विमानांकरिता करार करून त्यांची सहा स्क्वॉड्रन खरेदी केली. परंतु ही विमाने आता निवृत्त झाली असून, त्यांच्याहूनही अधिक सामर्थ्यशाली अशी मिग-२७, जॅग्वार व मिराज-२,००० या विमानांनी त्यांची जागा घेतली आहे.
भारतीय वायुसेनेने १९६५ व १९७१ च्या भारत-पाक युद्धात अजित, मरूत, कॅनबेरा, मिग, सुखोई इ. लढाऊ विमानांचा यथोचित उपयोग करून भारतीय उपखंडात तसेच जगातील अमेरिका, रशिया, चीन या महाशक्ती सेनांमध्ये स्वतःचे आगळेच स्थान प्रस्थापित केले. विद्यमान भारतीय वायुसेनेमध्ये आता ६० स्क्वॉड्रनांवर विमाने असून या यंत्रणेत अधिकारी व हवाई शिपाई मिळून सु. १,१०,००० असे संख्याबळ आहे. भारतीय वायुसेना बलतुलनेत आता जगातील चौथा क्रमांकाची मानली जाते.
आधुनिक लढाऊ विमानांत अमेरिकेची एफ्-१५ ईगल, एफ्-१११, फ्रान्सची मिराज-२००० व रशियाची मिग-२९ व ३१ या लढाऊ विमानांचा उल्लेख करावा लागेल. रशियाच्या मिग-३१ या लढाऊ विमानाचे कमाल वजन ४१,०५० किलो असून, त्याचा ताशी वेग सु. २,५५० किमी. आहे. हे विमान खडखडीत जमिनीवरही उतरू शकते. ही सर्व विमाने हवाई संरक्षण किंवा शत्रुप्रदेशांतील ठिकाणावर हल्ला चढवणे अशा दुहेरी कामगिरीसाठी वापरता येतात. त्यांच्यांत अत्याधुनिक अशी रडार यंत्रणा बसविलेली आहे व ज्या कामगिरीसाठी विमान वापरावयाचे असेल तीनुसार निरनिराळी शस्त्रास्त्रे बसविण्याची सोय उपलब्ध आहे. उदा., एफ्-१११ या विमानात जमिनीपासून एका विवक्षित उंचीवरून (ग्राउंड हगिंग) विमान आपोआप उडत राहील याची काळजी घेणारा रडार बसविला असल्याने ध्वनिच्या २.२ पट वेगाने उडत असताही हे विमान जमिनीपासून केवळ ३० ते ४५ मी. उंचीवरून नेता येते. त्यायोगे शत्रूच्या संरक्षक रडार पटलाखालून ही विमाने निसटून जाऊ शकतात. याच तऱ्हेचा रडार मिराज-२००० या विमानांतही आहे. शिवाय या सर्व विमानांत अतिशय खालून उडत असलेली व दृष्टीच्या टप्प्यापलीकडील विमानेही रडारच्या साहाय्याने हुडकून काढून त्यांच्यावर अचूक क्षेपणास्त्रे फेकून त्यांना टिपता येते. अमेरिका व रशिया या राष्ट्रांजवळ बी-५२, स्टेल्थ किंवा ट्यूपोलेव्ह-२२, २६ इ. बाँबफेकी विमानेही शेकडोंच्या संख्येने आहेत. ती ८,००० ते १०,००० किमी. दूरवर जाऊन अनेक हजार किग्रॅ. वजनाचे साधे बाँब (कन्व्हेन्शनल) किंवा अणुबाँब फेकू शकतात. अशा विमानांतून, त्यांचा पल्ला वाढविण्यासाठी, वरच्यावर इंधन भरून घेण्याची किंवा लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे सोडण्याचीही सोय आहे. स्टेल्थ या विमानाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची सर्व रचना अशा पदार्थांपासून केली आहे, की रडारस्कोपवर हे विमान प्रतिबिंबित होऊच शकत नाही. त्यामुळे त्याच्या हल्ल्यापुढे शत्रू हतबल होतो. यासंबंधीची विस्तृत माहिती मात्र अमेरिकेने अद्याप प्रसिद्ध केलेली नाही.
याव्यतिरिक्त या दोनही बड्या राष्ट्रांजवळ, एकाच वेळी अंतराळांतून ५ ते १० अण्वस्त्रे टाकणारी महाकाय आंतरखंडीय प्रक्षेपणास्त्रे शेकडोंच्या संख्येने आहेत. त्यांच्या माऱ्यापुढे ही दोन राष्ट्रे केवळ एकमेकांचाच नव्हे, संपूर्ण मानवजातीचाही सर्वनाश करण्याचे सामर्थ्य बाळगून आहेत. त्यामुळे जागतिक संकुल युद्धाची (टोटल वॉर) शक्यता जवळजवळ असंभवनीय आहे. तरीही परिमित युद्धे (लिमिटेड वॉर) यापुढेही चालूच राहतील आणि अशा युद्धांतील जयापजय सर्वस्वी संबंधित वायुसेनांच्या मर्दुमकीवरच अवलंबून राहतील. दक्षिण अशियातील एक बलाढ्य राष्ट्र म्हणून पुढे येत असलेल्या भारताला ही गोष्ट दृष्टीआड करून चालणार नाही आणि दिवसेंदिवस भारतीय वायुसेनेची स्वसंरक्षक व प्रहार-शक्ती अधिकाधिक बळकट करावी लागेल.
बाळ, नि. वि. पुरोहीत, पुं. ल.
“