ऱ्होडेशिया (झिंबाब्वे) : रिपब्लिक ऑफ झिंबाब्वे. आफ्रिका खंडाच्या दक्षिण-मध्य भागातील भूवेष्टित स्वतंत्र देश. १५ ३७’ ते २२ २५’ द. अक्षांश व २५ १७’ ते ३३ ४’ पू. रेखाशांदरम्यान विस्तारलेल्या या देशाची वायव्य-आग्नेय लांबी ८५२ किमी. व ईशान्य-नैर्ऋत्य रुंदी ७१० किमी. असून क्षेत्रफळ ३,९०,३०८ चौ. किमी. आहे. लोकसंख्या ८६,४०,००० (१९८७ अंदाज). उत्तरेस व पूर्वेस मोझँबीक, दक्षिणेस दक्षिण आफ्रिका प्रजासत्ताक, नैर्ऋत्येस बोट्स्वाना, वायव्येस व उत्तरेस झँबिया या देशांनी हा वेढलेला असून त्याला एकूण सु. २,९८८ किमी. लांबीची सरहद्द लाभली आहे. १९८० पासून देशाच्या ‘झिंबाब्वे’ या नावाला अधिकृतरीत्या आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली असून हरारे (पूर्वीची सॉल्झबरी) ही या देशाची राजधानी (लोक. ८,६४,००-१९८७) आहे.  

भूवर्णन : झिंबाब्वेची भूमी म्हणजे द. आफ्रिकेतील प्रसिद्ध ‘व्हेल्ड’ प्रदेशाचा विस्तारित भाग असून तिचा समावेश सस. पासून सु. ३०० मी.पेक्षा जास्त उंचीच्या पालथ्या बशीसारख्या गोलाकार पठारी भागात होतो. देशाचा सु. ७५% भाग ६०० ते १,५०० मी. उंचीचा आहे. भूरचनेच्या दृष्टीने देशाचे हायव्हेल्ड, मिडल्‌व्हेल्ड व लोव्हेल्ड असे तीन प्रमुख भाग केले जातात. यांपैकी पहिल्या भागात देशाच्या मध्यभागी नैर्ऋत्य-ईशान्य दिशेने पसरलेल्या सु. ६५० किमी. लांब व ८० ते १६० किमी. रुंदीच्या डोंगराळ प्रदेशाचा समावेश होतो. या प्रदेशाची उंची १,२०० ते १,६७५ मी. असून त्याने देशाचा सु. २५% भाग व्यापला आहे. यात दक्षिणेकडून  उत्तरेकडे अनुक्रमे मोटोपो टेकड्या, उम्‌व्हूक्के डोंगररांग व पूर्व सरहद्दीवरील चीमानीमानी व ईन्यांग्गा पर्वतरांगा यांचा अंतर्भाव होतो. यांशिवाय देशाच्या आग्नेय कोपऱ्यात कमी उंचीच्या माटेके टेकड्या आहेत. मुख्य रांगांपैकी पूर्व सरहद्दीवरील ईन्यांग्गा रांग सर्वांत उंच असून याच रांगेतील ईन्यांग्गानी हे देशातील सर्वांत उंच (२,५९३ मी.) शिखर आहे. या रांगेच्या दोन्ही बाजूंस-उत्तरेस झँबीझी व दक्षिणेस लिंपोपो नद्यांपर्यंत-पसरलेल्या सु. ६०० ते १,२०० मी. उंचीच्या प्रदेशाचा मिडल्‌व्हेल्डमध्ये समावेश होतो. याने देशाचा सु. ४०% भाग व्यापला आहे. यापेक्षा कमी उंचीचा, विशेषतः आग्नेयीकडील साबी, लूंडी, नूआनेत्सी इ. नद्यांच्या खोऱ्याचा, तसेच वायव्येकडील भाग लोव्हेल्ड म्हणून ओळखला जातो. देशातील सर्वांत कमी उंचीचा (२०१ मी.) भाग आग्नेय कोपऱ्यातील डुमेला शहराजवळ असून येथून लिंपोपो नदी मोझँबीकमध्ये प्रवेश करते. झिंबाब्वेमध्ये मोठा वाळवंटी प्रदेश नसला, तरी बोट्स्वानाच्या सरहद्दीजवळील बराचसा लांब पट्टा शुष्क आहे. 

येथील खडकांची निर्मिती कँब्रियनपूर्व काळात झालेली असून त्यांपैकी प्राचीन खडकांचा बहुतेक भाग म्हणजे बेसमेंट जटिल पट्टिताश्म समूह आहे. देशातील बऱ्याच भागात या प्रकारचा खडक आढळतो. याचा सु. ८०% भाग ग्रॅनाइट खडकांचा असून नैर्ऋत्येकडील माटोपो टेकड्या ग्रॅनाइट व पट्टिताश्म यांनी बनलेल्या आहेत. या टेकड्यांतील आधारखडकांची वारा व पाणी यांमुळे मोठ्या प्रमाणावर झीज झालेली असून त्यांचे उर्वरित भाग एकमेकांच्या आधाराने अद्यापही टिकून आहेत. यांव्यतिरिक्त देशातील काही टेकड्या ‘कापी’ प्रमाणे (कपासारख्या तीव्र उताराच्या टेकड्या) गोल आकाराच्या व वॉल ग्रॅनाइटापासून बनलेल्या आढळतात. बेसमेंट समूहामधील शिस्ट खडकांच्या पट्ट्यात सोने, चांदी व इतर खनिजांचे देशातील महत्त्वाचे साठे सापडतात. 

देशाचा बहुतेक पठारी भाग लहान-मोठ्या नद्यांनी व्यापलेला आहे. मध्यभागी नैर्ऋत्य-ईशान्य दिशेने पसरलेल्या डोंगररांगा हा देशातील प्रमुख जलविभाजक होय. झिंबाब्वेच्या वायव्य व उत्तर सीमेवरून वाहणारी झँबीझी व दक्षिण सीमेवरून वाहणारी लिंपोपो या येथील प्रमुख नद्या आहेत. यांशिवाय सान्याटी, उम्‌न्याटी, सेंग्वा, ग्वाई, डेका या नद्या मुख्य जलविभाजकात उगम पावून वायव्येस वाहत जाऊन झँबीझी नदीला मिळतात तर माझोए (ईशान्यवाही), साबी, लूंडी, नूआनेत्सी, बृब्ये, मात्शेउम्‌लोपे, नैर्ऋत्य सीमेवरून वाहणारी शाशी इ. नद्या आग्नेयवाही असून यांपैकी नूआनेत्सी, बृव्ये, मात्शेउम्‌लोपे, शाशी या लिंपोपो नदीच्या उपनद्या आहेत. उत्तर सीमेवरून वाहणारी एमकुम्‌व्हूरा, पश्चिम भागातील ग्वेलो, बेंबेझी, काना, शांग्गानी, तर पूर्व भागातील ओद्‌झी, देव्हूरे, तुर्ग्वे , तोक्वे इ. लहानलहान नद्यांनी देशाच्या बऱ्याचशा भागाचे जलवाहन केलेले आहे. देशात मोठी नैसर्गिक सरोवरे नाहीत. वायव्य सरहद्दीवरील करिबा धरणामुळे निर्माण झालेला जलाशय सर्वात मोठा असून फोर्ट व्हिक्टोरियाजवळील काइल हे देशातील सर्वांत लहान मानवनिर्मित सरोवर आहे. देशाच्या पश्चिम सरहद्दीवरील प्रसिद्ध व्हिक्टोरिया धबधबा व करिया जलाशय झँबिया व झिंबाब्वे यांच्यात विभागले गेले आहेत. 


हवामान : सर्वसाधारणपणे झिंबाब्वेचे हवामान उपोष्ण कटिबंधीय स्वरूपाचे असून सस.पासूनची उंची व भूस्वरूप यांनुसार तापमानात व पर्जन्यमानात फरक पडलेला दिसून येतो. हायव्हेल्ड व इतर उच्च प्रदेश यांमध्ये लोव्हेल्डपेक्षा तापमान कमी व पर्जन्याचे प्रमाण जास्त असलेले दिसते. नोव्हेंबर ते मार्च या काळात हवा उबदार व पावसाळा असतो तर मे ते ऑगस्ट हा काळ थंड व कोरड्या हवामानाचा असतो. इतर तीन महिने संक्रमणकाळाचे जातात. हिवाळ्यात हायव्हेल्ड भागातील तापमान १२ते १३ से. तर उन्हाळ्यात २४ से. असते. लोव्हेल्ड भागात तसेच झँबीझी आणि लिंपोपो नद्यांच्या खोऱ्यांत ते ३२ ते ३८ से.पर्यंत जाते. पर्जन्याचे प्रमाण उन्हाळ्यात जास्त असून पूर्वेकडून पश्चिमेकडे ते कमीकमी होत जाते.  पूर्वेकडील डोंगराळ भागात वार्षिक सरासरी १०० सेंमी.पेक्षा जास्त पाऊस पडतो तर याच काळात हरारे येथे ८१ सेंमी. व पश्चिमेस बूलवायो येथे ६१ सेंमी. पडतो. दक्षिण व नैर्ऋत्य भागांत पावसाचे प्रमाण अत्यल्प आढळते. पाण्याचे हंगामी दुर्भिक्ष ही नित्याचीच बाब आहे. मार्चनंतर पर्जन्य व तापमान यांचे प्रमाण एकदम कमी होते. हिवाळ्यानंतरचा संक्रमणकाळ उबदार व कोरड्या हवामानाचा असतो. 

वनस्पती व प्राणी : देशाचा बहुतेक भाग सॅव्हाना (व्हेल्ड) प्रदेशात येत असला, तरी जास्त पावसाच्या व उंच डोंगराळ भागात उष्ण कटिबंधीय सदाहरित व कठीण लाकडाच्या वनस्पती (विशेषतः पश्चिम भागात) दिसून येतात. मोठ्या वृक्षांमध्ये साग, मॅहॉगनी, नॉबथॉर्न, अम्‌सास, गोरखचिंच इ. वनस्पती जास्त आढळतात. वायव्य भागात पानझडी वृक्ष, तर नैर्ऋत्य भागात काटेरी वनस्पती जास्त उगवतात. दक्षिण भाग आफ्रिकन आयर्नवुड (मोपानी) वनस्पतीनी व्यापला आहे. द. आफ्रिकेत आढळणारी बऱ्याच प्रकारची फुलझाडे व लहान झुडुपे येथे असून त्यांपैकी हिबिस्कस, स्पायडर लिली, लिओनोड्स, कॅशा, डॉम्बेआ इ. प्रमुख प्रकार आहेत.  

झिंबाब्वेतील प्राणिजीवन समृद्ध आहे. वन्यप्राण्यांत सिंह, चित्ता, चितळ, तरस, मुंगूस, हनी, बॅजर, बॅबून, चिंपँझी, गोरिला, बुशबेबी, हत्ती, पाणघोडा, जिराफ, झेब्रा, विविध प्रकारचे सर्प, मोठे सरडे इ. प्रमुख असून ईलँड, कुदू, इंपाला, हार्टबीस्ट, वॉटरबक इ. प्रकारच्या काही हरणांच्या वैशिष्ट्यपूर्ण जातीही आढळतात. जलाशयांतून वॉटर मॉनिटर, सुसरी मोठ्या प्रमाणात आहेत. यांशिवाय ५०० प्रकारचे पक्षी असून त्यांत अँट थ्रश, बार्बेट, वेडा राघू, बिशपबर्ड, बुलबुल, फेझंट, ग्राउझ इ. प्रमुख आहेत. झँबीझी नदीखोऱ्यातील जंगलात त्सेत्से माश्यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळतो. देशात अनेक राष्ट्रीय उद्याने असून त्यांपैकी वांगजी (वांगग्क) हे सर्वात मोठे आहे. यांशिवाय व्हिक्टोरिया फॉल्स, माटोपो, सेवाक्के, मुशांडाइक, काइल, चीमानीमानी, ईन्यांग्गा इ. राष्ट्रीय उद्याने आहेत.

इतिहास व राज्यव्यवस्था : झिंबाब्वेचा इतिहास प्राचीन असून येथे काही अश्मयुगीन पुरावे आढळले आहेत. येथील उत्खननांत इ. स. ३०० मधील काही लोहधातूच्या वस्तूही सापडल्या आहेत. ⇨झिंबाब्वे येथे १८९१, १९५८ पर्यंत झालेल्या उत्खननांत देवळांचे अवशेष तसेच मृत्पात्रे, लोखंडी हत्यारे, तांब्या-सोन्याचे दागिने इ. वस्तू सापडल्या असून तज्ञांच्या मते त्या इ. स. सु. सहाव्या शतकातील असाव्यात. कालाहारी वाळवंटी प्रदेशात राहणे रे सॅन (बुशमन) लोक हे झिंबाब्वेतील मूळच्या रहिवाशांचे वंशज असावेत, असे मानले जाते. येथील मूळचे रहिवासी लहानलहान गटांत रहात होते व ते शेती, गुरुपालन, शिकार यांवर आपली उपजीविका करीत असत. या प्रदेशात लोहधातुकाम करणाऱ्या काही गटांनी हळूहळू सॅन लोकांच्या जमिनी बळकाविण्यास सुरुवात केली. तसेच उत्तरेकडून पाचव्या ते दहाव्या शतकांदरम्यान आलेल्या बांतू भाषिक शोन लोकांनी सॅन लोकांची कत्तल केली व काहींना तेथून हुसकावून लावले. लोहारकाम करणारे गट मात्र शोन लोकांच्यामध्ये मिसळून गेले. शोन लोकांनी हळूहळू किनारी प्रदेशाशी सोने व हस्तिदंताचा व्यापार वाढविला व या प्रदेशात आपला जम बसविला. पंधराव्या शतकाच्या मध्यास त्यांनी या प्रदेशात एक साम्राज्य उभारून झिंबाब्वे येथे त्याची राजधानी स्थापन केली. शोन भाषेत ‘झिबाब्वे’ या शब्दाचा अर्थ ‘राजाचे ठिकाण’, तर बांतू भाषेत ‘दगडांची घरे’ असा होतो. हे साम्राज्य ‘एम्‌वेनेमुतापा’ या नावाने ओळखले जात होते. या शतकाच्या अखेरीस याचे दोन भाग होऊन दक्षिणेकडचा भाग ‘उरोझ्वी साम्राज्य’ या नावाने ओळखला जाऊ लागला. पुढील दोन शतकांत त्याची खूपच भरभराट झाली. एकोणिसाव्या शतकात ब्रिटिशांचे आगमन होऊन गुलामांचा व्यापार वाढला व या संधीचा फायदा घेऊन दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या एडंबीली (मॅटबीली) लोकांनी एकेकाळचे हे बलवान उरोझ्वी साम्राज्य १८३० च्या सुमारास उद्‌ध्वस्त केले. याच सुमारास स्कॉटिश मिशनरी व समन्वेषक डेव्हिड लिव्हिंग्स्टनने गुलामांचा व्यापारविरोधी अहवाल प्रसिद्ध केला व या भागात मिशनरी कार्याला जोर चढला. रॉबर्ट मॉफट (लिव्हिंग्स्टनचा सासरा) याने १८५९ मध्ये ‘इन्याती मिशन’च्या रूपाने येथे पहिली कायमस्वरूपी यूरोपीय वसाहत स्थापन केली. पुढे १८८० ते १८९० या काळात अनेक यूरोपीय वसाहती झाल्या.  


सेसिल व्होड्‌सने स्थापन केलेल्या (१८८९) ‘ब्रिटिश साउथ आफ्रिका कंपनी’ने या प्रदेशातील व्यापारात खूप वाढ केली. १८९० च्या सुमारास या प्रदेशातील यूरोपियनांच्या अधिक हस्तक्षेपाविरुद्ध एंडबीली व शोन लोकांनी सशस्त्र उठाव केला. १८९१ च्या सुमारास न्यासालँड ब्रिटिशांचे संरक्षित राज्य बनले व उरलेला प्रदेश व्होड्‌सच्या कंपनीच्या ताब्यात राहिला. १८९५ मध्ये ब्रिटिश साउथ आफ्रिका कंपनीने मॅशोनालँड व मॅटबीलीलँड या दोहोंना मिळून ‘ऱ्होडेशिया’ हे नाव देण्याचे ठरविले होते परंतु पुढे झँबीझी नदीच्या उत्तरेकडील प्रदेशापासून हा भाग वेगळ ओळखू येण्यासाठी त्याला द. ऱ्होडेशिया असे नाव देण्यात आले. १८९७ च्या सुमारास या प्रदेशात थोडी शांतता प्रस्थापित झाली व पुढे १९२३ पर्यंत ब्रिटिश साउथ आफ्रिका कंपनीने या प्रदेशाचा कारभार सांभाळला. १९२२ च्या जनमतपृच्छेमध्ये ३४,००० यूरोपीयांनी युनियन ऑफ साउथ आफ्रिकेशी संलग्न राहण्यापेक्षा हा भाग स्वयंशासित ‘ब्रिटिश वसाहत’ म्हणून घोषित करण्याविषयी मागणी केली व १२ सप्टेंबर १९२३ रोजी द. ऱ्होडेशियाचा कारभार कंपनीकडून ब्रिटिश सरकारकडे आला. १ ऑक्टोबर १९२३ रोजी येथील सरकार स्थापन होऊन त्याचा कारभार गव्हर्नरच्या ताब्यात देण्यात आला व हा प्रदेश ‘ब्रिटिश वसाहत’ म्हणून जाहीर झाला. येथील आफ्रिकी लोकांबाबतचे व इतर काही अधिकार वगळता नवनिर्मित सरकारला संपूर्ण स्वयंशासनाचे अधिकार मिळाले. १९५३ मध्ये द. ऱ्होडेशिया, उ. ऱ्होडेशिया व न्यासालँड यांचे मिळून ‘सेंट्रल आफ्रिकन फेडरेशन’ या नावाने एक संघराज्य स्थापन करण्यात आले. १९५३ ते १९५८ दरम्यान या प्रदेशात बाहेरून आलेल्या यूरोपियनांची संख्याही खूप वाढली. जानेवारी १९६० मध्ये येथे नॅशनल डेमॉक्रॅटिक पक्षाची स्थापना होऊन एन्‌कोमो हे त्याचे अध्यक्ष बनले. डिसेंबर १९६१ मध्ये या पक्षाच्या कार्यावर सरकारने बंदी घातल्याने एन्‌कोमो यांनी ‘झिबाब्वे आफ्रिकन पीपल्स युनियन’ (झापू) या संघटनेची स्थापना केली परंतु तीही बेकायदेशीर ठरविल्याने त्यातून काहींनी फुटून दुसरा ‘झिंबाब्वे आफ्रिकन नॅशनल युनियन’ (झानू) हा नवा पक्ष निर्माण केला. सुरुवातीला सिथोले व नंतर रॉबर्ट मुगाबे हे त्याचे नेते बनले. राज्याची नवी घटना १९६२ पासून अंमलात आली. तीत ग्रेट ब्रिटनचे कायदेशीर अधिकार कमी होऊन आफ्रिकनांसाठी काही मताधिकार देण्यात आले होते. डिसेंबर १९६३ मध्ये संघराज्य बरखास्त झाले व उ. ऱ्होडेशिया आणि न्यासालँड अनुक्रमे ⇨झँबिया व ⇨मालावी प्रजासत्ताक या नावांनी स्वतंत्र होऊन द. ऱ्होडेशिया अनधिकृतरीत्या ‘ऱ्होडेशिया’ या नावाने ओळखला जाऊ लागला व ऱ्होडेशियन फ्रंट पक्षाचे ईआन स्मिथ हे पंतप्रधान झाले (१९६४). 

मे १९६५ मधील निवडणुकांत ऱ्होडेशियन फ्रंट पक्षाने विधानमंडळातील यूरोपियनांच्या सर्वच्या सर्व ५० जागा जिंकल्या. पुढे ब्रिटिशांशी झालेल्या सर्व वाटाघाटी फिसकटल्याने ५ नोव्हेंबर १९६५ रोजी ऱ्होडेशियाच्या ईआन स्मिथ या पंतप्रधानांनी राज्यात आणीबाणी जाहीर केली. ११ नोव्हेंबर १९६५ रोजी स्मिथ सरकारने एकतर्फी स्वातंत्र्य जाहीर केले. ब्रिटिश सरकारने हे बेकायदेशीर ठरवून ऱ्होडेशियाशी असलेले व्यापारी व आर्थिक संबंध तोडले परंतु त्याचा काहीही परिणाम झाला नाही. अखेर नोव्हेंबर १९६९ मधील जनमतपृच्छेचा आधार घेऊन २ मार्च १९७० रोजी ऱ्होडेशिया प्रजासत्ताक राज्य म्हणून जाहीर झाले. १९६९ च्या घटनेप्रमाणे ऱ्होडेशियाची विधानसभा द्विसदनी करण्यात आली. घटनेनुसार सीनेटमध्ये २३ व हाउस ऑफ ॲसेंब्लीचे ६६ सभासद  (५० यूरोपीय व १६ आफ्रिकी) ठरविण्यात आले. १९७०, १९७४ आणि १९७७ च्या निवडणुकांत ऱ्होडेशियन फ्रंट पक्षाने हाउस ऑफ ॲसेंब्लीमधील यूरोपियनांच्या सर्व जागा जिंकल्या परंतु झापू व झानू या पक्षांनी स्मिथच्या कारभाराविरुद्ध सशस्त्र उठाव केला आणि ऱ्होडेशियन संरक्षक दलावर अनेक हल्ले केले. आफ्रिकन गनिमी कावा संघटनाही यात सामील झाली. याच काळात एन्‌कोमो आणि मुगाबे यांनी संयुक्तपणे यात ‘पॅट्रिओटिक फ्रंट’ची स्थापना केली होती. अखेरीस सरकराला स्वरक्षणासाठी आर्म्ड साउथ आफ्रिकन पोलीस दलाची मदत घ्यावी लागली. १९७८ मध्ये पंतप्रधान स्मिथ व नॅशनॅलिस्ट पक्षाचे कृष्णवर्णीय नेते यांनी कृष्णवर्णियांना मताधिकार, सार्वत्रिक प्रौढ मतदान पद्धती व बहुमतवादी पक्षाचे सरकार तसेच श्वेतवर्णियांच्या रक्षणाची जबाबदारी इ. अटी असलेली घटना मान्य केली. एप्रिल १९७९ मध्ये दोन टप्प्यांमध्ये निवडणुका होऊन युनायटेड आफ्रिकन नॅशनल कौन्सिल पक्षाला बहुमत मिळून बिशप आबेल मुझोरेवा हे देशाचे पहिले कृष्णवर्णीय पंतप्रधान झाले. त्यांनी जूनमध्ये देशावे ‘झिंबाब्वे ऱ्होडेशिया’ असे नामांतर केले परंतु पॅट्रिऑटिक फ्रंटच्या लोकांनी सरकारला सातत्याने विरोध केला व आपला लढा चालू ठेवला. १९७९ च्या अखेरीस ब्रिटनने सर्व पक्ष एकत्र आणून युद्धविरामाचा करार केला व देशाच्या नव्या घटनेचा मसुदा तयार झाला. ११ डिसेंबर रोजी काही काळापुरता हा देश ‘ब्रिटिश वसाहत’ म्हणून जाहीर झाला व ब्रिटिश निवडणूक आयुक्तांच्या नेतृत्वाखाली फेब्रुवारी १९८० मध्ये निवडणुका होऊन रॉबर्ट मुगाबे हे पंतप्रधान झाले. १८ एप्रिल १९८० पासून देशाचे ‘रिपब्लिक ऑफ झिंबाब्वे’ (झिंबाब्वे प्रजासत्ताक) असे नामांतर होऊन १४ मे १९८० रोजी झानू व पॅट्रिऑटिक फ्रंट यांचे संयुक्त सरकार होऊन स्वतंत्र झिबाब्वेची संसद अस्तित्वात आली व देशाची सर्व सत्ता श्वेतवर्णियांच्या हातून कृष्णवर्णियांकडे गेली. साहजिकच बाहेरून येणाऱ्या श्वेतवर्णियांची संख्या खूपच घटली. २९ ऑगस्ट १९८० पासून हा देश संयुक्त राष्ट्रांचा सभासद झाला. देशातील पक्षा-पक्षांमधील तणाव व संघर्ष मात्र कायमच राहिले. एकपक्षीय राज्याच्या कल्पनेवरून रॉबर्ट मुगाबे व एन्‌कोमो यांचे संबंध बिघडले. त्यामुळे जानेवारी १९८१ मध्ये मंत्रिमंडळाच्या फेररचनेत एनकोमो यांना कनिष्ठ स्थान देण्यात आले. १९८२ मध्ये त्यांना व पॅट्रिऑटिक फ्रंटच्या अन्य दोन प्रतिनिधींना मंत्रिमंडळातून काढून टाकण्यात आले. त्यानंतर काही कारणांवरून संसदेतील आर्. एफ्. पक्षाच्या (रिपब्लिकन फ्रंट) सभासदांनी एकामागून एक   पक्षाचे राजीनामे दिले. परिणामतः श्वेतवर्णियासाठी असलेल्या राखीव २० जागांपैकी फक्त ७ जागा रिपब्लिकन पक्षाच्या ताब्यात राहिल्या. रिपब्लिकन पक्षाचे नाव बदलून काँझर्व्हेटिव्ह अलायन्स ऑफ झिंबाब्वे (सीएझेड) असे करण्यात येऊन सर्व वांशिक गटांना याचे सभासदत्व देण्यात येईल, असे जाहीर करण्यात आले. देशातील बंडाळ्या वाढल्या, स्मिथच्या कारकीर्दीत अयशस्वी ठरलेली आणीबाणी पुन्हा जाहीर झाली. १९८३ च्या सुरुवातीस मॅटबीलीलँड भागात शेकडोंच्या क्रूर कत्तली झाल्या. मार्च १९८३ मध्ये एन्‌कोमोने देशातून पलायन केले व ऑगस्टमध्ये तो पुन्हा परतला. १९८४ अखेरपर्यंत घटनेत दुरुस्त्या, मॅटबीलीलँड भागात सैनिकी कारवाया, संचारबंदी इ. घटना चालूच राहिल्या. झानू व झापू या दोन प्रमुख पक्षांमध्ये संघर्ष निर्माण झाला आणि त्यामध्ये दोन्ही पक्षांच्या अनेक कार्यकर्त्यांचा बळी गेला. जून व जुलै १९८५ मधील सार्वत्रिक निवडणुकीमध्ये झानू-पॅट्रिऑटिक फ्रंट पक्ष पुन्हा सत्तेवर आला. झापूने मॅटबीलीलँडवर आपले वर्चस्व कायम राखले. पुढच्याच महिन्यात विरोधी पक्षातील अनेक पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी झानू-पॅट्रिऑटिक फ्रंटमध्ये प्रवेश केला. या काळात असंतुष्ट गट देशात यादवी माजवीतच होते.


झानू-झापू यांमध्ये १९८५ अखेर करार होऊन राष्ट्रीय एकतेच्या दृष्टीने दोन्ही पक्षांचे विलीनीकरण करण्याचे ठरले. १९८६ मध्ये या बाबतीत अनेक आशादायी पावले पडली, पण एप्रिल १९८७ मध्ये विलीनीकरणाच्या प्रक्रियेला दोन्ही पक्षांतील अंतर्गत विरोधामुळे खीळ बसली. दरम्यान मॅटबीलीलँडमधील बंडाळी व दडपशाही वाढतच होती. विलीनीकरण अयशस्वी झाले, त्यावेळी याचा उद्रेक वाढला. सरकारने झापूवर बंदी घातली व काही महिन्यांतच ती उठवली. डिसेंबर १९८७ मध्ये विलीनीकरणाला पुन्हा गती मिळाली व मार्क्सिस्टलेनिनिस्ट तत्त्वप्रणालीवर आधारित एक-पक्षीय (झानू-पी एफ्) राज्य करण्याचे ठरले. पक्षाचे मुगाबे अध्यक्ष व दोन उपाध्यक्षांपैकी एन्‌कोमो हा उपाध्यक्ष अशी व्यवस्था झाली. मॅटबीलीलँडमधील परिस्थिती सुधारू लागली.  

देशात १९८० च्या संविधानानुसार द्विसदनी संसद असून हाउस ऑफ ॲसेंब्ली (कनिष्ठ सभागृह) व सीनेट (वरिष्ठ सभागृह) अशी दोन गृहे आहेत. कनिष्ठ सभागृहाचे १०० सभासद असतात व ते प्रौढ (१८ वर्षांपुढे) व गुप्त मतदान पद्धतीने निवडले जातात. यांपैकी ८० जागा सर्वसामान्य मतदार संघांतून, तर २० जागा स्वतंत्र अशा श्वेतवर्णियांच्या मतदार संघातून निवडल्या जातात. सीनेटमध्ये एकूण ४० जागा असतात. त्यांपैकी १४ प्रतिनिधी कनिष्ठ सभागृहातील सर्वसामान्य मतदार संघांतून व १० श्वेतवर्णियांच्या राखीव जागांमधून १० प्रतिनिधी देशातील परंपरागत जमात प्रमुखांमधून, तर ६ प्रतिनिधी राष्ट्राध्यक्षाने पंतप्रधानांच्या सल्ल्याने निवडावयाचे असतात. सप्टेंबर १९८७ पासून मात्र दोन्ही सभागृहांतील श्वेतवर्णियांच्या राखीव जागा रद्द करण्यात आल्या आहेत. काही कारणांनी संसद बरखास्त न झाल्यास दोन्ही सभागृहांतील सभासदांची मुदत ५ वर्षांची असते. राष्ट्राध्यक्षाची निवड संसदेकडून ६ वर्षासाठी केली जाते. कार्यकारी सत्ता राष्ट्राध्यक्षाच्या ताब्यात असून तो पंतप्रधानाची व त्याच्या सल्ल्याने इतर मंत्र्यांची निवड करतो. पंतप्रधान व राष्ट्राध्यक्ष या दोन्ही पदांसाठी वेळप्रसंगी एकाच सक्षम व्यक्तीची निवड करण्याची तरतूद घटनेत आहे. १९८७ पासून कार्यकारी राष्ट्राध्यक्ष या पदाची निर्मिती करण्यात आली असून ३० डिसेंबर १९८७ पासून रॉबर्ट मुगाबे यांनी या पदाची सूत्रे हाती घेतली आहेत. मार्च १९९० मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांत रॉबर्ट मुगाबे हे पुन्हा निवडून आले. त्यांना एकूण मतांपैकी ८३ टक्क्यापेक्षा जास्त मते मिळाली. मार्च १९८८ मध्ये कनिष्ठ सभागृहातील पक्ष बलाबल पुढीलप्रमाणे होते. झानू-पीएफ् ७८ सभासद, झापू १४, झानू १ व स्वतंत्र पक्ष ६. 

न्याय व संरक्षण : देशातील न्यायव्यवस्था मुख्यत्वे रोमन-डच पद्धतीची असून १० जून १८९१ मध्ये ‘केप ऑफ गुड होप’ येथे स्वीकारण्यात आलेल्या पद्धतीवर आधारित आहे. तिच्यावर दक्षिण आफ्रिकन न्यायपद्धतीचा प्रभाग दिसून येतो. सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय व इतर न्यायालये अशी देशातील न्यायदानाची व्यवस्था असून घटनेचा अर्थ लावणे, घटनेतील मूलभूत हक्कांबाबत न्याय देण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला आहे. एक प्रमुख न्यायदंडाधिकारी व कमीत कमी २ (१९८५ मध्ये ३ होते) साहाय्यक न्यायदंडाधिकारी सर्वोच्च न्यायालयाचे काम पाहतात. उच्च न्यायालयात एक प्रमुख न्यायदंडाधिकारी व इतर १२ साहाय्यक न्यायदंडाधिकारी असतात. मुख्य न्यायाधीशाची नेमणूक पंतप्रधानांच्या सल्ल्याने राष्ट्राध्यक्ष करतो. पंतप्रधानाच्या अनुपस्थितीत न्यायसेवा आयोगाने न्यायाधीशाची शिफारस केल्यास त्याच्या नियुक्तीपूर्वी प्रथम संसदेला सूचना द्यावी लागते. इतर न्यायाधीशांच्या नेमणुकांबाबतही आयोग राष्ट्राध्यक्षाला सल्ला देतो. या दोन प्रमुख न्यायालयांव्यतिरिक्त देशात प्रादेशिक व दंडाधिकारी न्यायालये आहेत.

देशाच्या सरहद्दीवरील गनिमांच्या बंडाळ्यांमुळे झिंबाब्वे सरकारला १९७६ मध्ये सैनिकी सेवेची मर्यादा वाढविणे भाग पडले व त्याबरोबरच सैन्यदलातही वाढ करावी लागली. १ मे १९७६ मध्ये १८ महिन्यांचे सैनिकी प्रशिक्षण घेतलेल्या १७ ते २५ वर्षे वयोगटातील पुरुषांना अनिश्चित काळापर्यंत सैनिकी सेवेत सामावून घेण्यात आले. अशा प्रकारचे सैनिकी प्रशिक्षण गोरे व आशियाई यांना सक्तीचे, तर कृष्णवर्णियांना ऐच्छिक ठेवण्यात आले होते. सांप्रत झिंबाब्वेमध्ये सैनिकीसेवा ऐच्छिक आहे. पूर्वीचे ऱ्होडेशियन सिक्युरिटी फोर्स व गनिमी सैनिक यांचे मिळून देशात एक सैन्यदल उभारण्यात आले असून १९८७ मध्ये त्यात एकूण ४७,००० सैनिक होते. त्यांपैकी ४६,००० पायदळात व १,००० हवाई दलात होते. १९८८ मध्ये सैनिकीसम संघटनेत २५,००० पोलीस होते. सैनिकी प्रशिक्षण ग्रेट ब्रिटन व कोरिया या राष्ट्रांकडून घेण्यात आले आहे.   


आर्थिक स्थिती : देशाचा आर्थिक विकास घडविण्याच्या दृष्टीने काही बाबतींत झिंबाब्वेतील राजकीय घडामोडी फायदेशीर ठरल्या. १९६०-७० या दशकात झिंबाब्वेचे बाह्य जगाशी आर्थिक-व्यापारी संबंध तुटल्याने शेतमाल व अन्य गरजेच्या वस्तू यांची आयात-निर्यात थांबली. त्यामुळे स्थानिक लोकांनी उपभोग्य वस्तूंच्या निर्मितीवर भर दिला व शेती उत्पादनांतही बदल करण्यात आला. नगदी पिकांऐवजी अन्नधान्यांची पिके घेण्यास सुरुवात झाली. त्याबरोबरच शेतीला पूरक अशा उद्योगधद्यांचीही वाढ झाली. त्यामुळे शेतमाल, उद्योगधंदे व खनिज उत्पादने यांच्या बाबतीत हा आफ्रिकेतील एक समृद्ध देश म्हणून ओळखला जाऊ लागला. 

देशातील एकूण क्षेत्रापैकी सु. १५% क्षेत्र डोंगररांगा व कुरणे यांनी व्यापलेले आहे. येथील शेती प्रामुख्याने पावसावर अवलंबून असून पूर्वीपासून उष्ण प्रदेशातील व कमी प्रतीची शेतजमीन बांतू लोकांच्या ताब्यात असून ते पारंपरिक पद्धतीने शेती करीत होते तर बहुतेक मोठ्या, चांगल्या प्रतीच्या शेतजमिनी श्वेतवर्णियांच्या ताब्यात होत्या व ते सुधारित पद्धतीने शेती करीत असत. स्वातंत्र्यानंतर सरकारने काही श्वेतवर्णियांच्या जमिनी खरेदी केल्या अथवा मोकळ्या चांगल्या जमिनी कृष्णवर्णियांना दिल्या. सांप्रत देशाला एकूण मिळणाऱ्या परकीय चलनापैकी जवळजवळ निम्मे उत्पन्न शेतमालापासून मिळते. १९८६ मध्ये शेती उद्योगात देशातील सु. ७०% लोक गुंतलेले होते. स्वच्छ सूर्यप्रकाश व बारीक रेती-वाळूयुक्त जमीन यांमुळे या प्रदेशात तंबाखूचे पीक मोठ्या प्रमाणात येते. देशाला परकीय चलन मिळवून देणारे (निर्यात उत्पन्नापैकी ४०%) हे प्रमुख नगदी पीक आहे. अन्नधान्य पिकांपैकी मका हे महत्त्वाचे पीक असून त्याखालोखाल गहू, ज्वारी, भुईमूग, कापूस, साखर बीट, सोयाबीन, टॅपिओका, बटाटे, केळी, संत्री, लिंबू जातीची फळे, भाजीपाला इ. उत्पादने घेतली जातात. काही प्रमाणात चहा व कॉफीची लागवड केली जाते. त्सेत्से माश्यांचा प्रदेश वगळता देशात सर्वत्र कुक्कुटपालन व गुरे पाळण्याचा व्यवसाय चालतो. हा व्यवसाय मुख्यत्वे कृष्णवर्णीय करतात. १९८३-८४ च्या दुष्काळात झिंबाब्वेचे शेती उत्पादन खूपच कमी झाले होते. देशात १९८६ मध्ये पुढीलप्रमाणे कृषिउत्पादन झाले (आकडे हजार टनांत) : तंबाखू ११८ मका २,५४६ गहू २४८ ज्वारी १३१ सातू २९ बाजरी १४१ ऊस ३,८०० सोयाबीन १०८ कापूस २०३ फळे १२९ चहा १६ कॉफी (हिरवी) १२ साखर ४३०. याच वर्षी देशात पशुधन पुढीलप्रमाणे  होते (आकडे लाखांत) : गुरे ४८ डुकरे १.७ मेंढ्या ५.५ शेळ्या १५.५ घोडे ०.२२ व गाढवे ०.९९ होती. ग्रामीण भागांत नद्या तसेच मोठमोठ्या धरणांच्या जलाशयांमधून मासेमारी केली जाते. यांत ट्राउट व बीम माशांचे प्रमाण जास्त असते. करिबा धरणाच्या जलाशयात माशांच्या वाढीसाठी वेगवेगळे प्रयोग केले जातात. देशात १९८५ मध्ये एकूण १७,४०० मे. टन मासे पकडण्यात आले. 

देशातील जंगलांतून १९८५ मध्ये पृष्ठावरणे व रेल्वे स्लीपरसाठी ३,६९,००० घ. मी. लगद्यासाठी १,३६,००० घ. मी. उद्योगधंद्यासाठी ८,७१,००० घ. मी. इंधनासाठी ५७,३३,००० घ. मी. लाकडाचे उत्पादन झाले. खनिजसंपत्तीच्या दृष्टीने झिंबाब्वे समृद्ध असून सु. ४० प्रकारची खनिजे येथे सापडतात. सुमारे ९०% खनिजे निर्यात केली जातात. लिथियम, ॲस्बेस्टस, क्रोमियम यांच्या उत्पादनांत हा देश जगात अग्रेसर आहे. यांशिवाय कोळसा, निकेल, सोने, जस्त, तांबे, कोबाल्ट, शिसे इ. खनिजांच्या खाणीही येथे आहेत. कोळशाचे प्रमुख साठे वायव्य भागात, तर लोहखनिजाचे साठे देशाच्या मध्यवर्ती भागात आढळतात. १९८६ मध्ये देशात पुढीलप्रमाणे खनिज उत्पादन झाले (आकडे हजार टन) : ॲस्बेस्टस १६३.६ सोने ४७८ (हजार ट्राय ऊझ Troy oz ) क्रोमचे खनिज ५५३.१ कोळसा ४,०४७ तांबे २०.६ निकेल ९.७ लोहखनिज १,११५ चांदी ८४० (हजार ट्राय ऊझ). सोने, ॲस्बेस्टस व निकेल ही प्रमुख निर्यात-खनिजे आहेत. देशातील एकूण कामकऱ्यांपैकी सु. ५% लोक या उद्योगात गुंतलेले होते (१९८६). १९८२ मध्ये सरकारने खाण उद्योगावर नियंत्रण ठेवण्यासाठी झिंबाब्वे खनिज विपणन निगमाची, तर संशोधनासाठी १९८४ मध्ये झिंबाब्वे खाण विकास निगमाची स्थापना केली आहे. 

देशातील उद्योगधंद्याच्या प्रगतीत दुसऱ्या महायुद्धानंतर काही काळ चढ-उतार होत होता. परंतु युद्धकाळात वाढविण्यात आलेला कर नंतर कमी केल्याने उद्योगधंद्यांना प्रोत्साहन मिळाले. शिवाय १९६५ नंतर आंतरराष्ट्रीय व्यापारसंबंध तुटल्याने उपभोग्य वस्तूंच्या स्थानिक उत्पादनास गती आली. विशेषतः कापड, धातुकाम आणि अभियांत्रिकी, बांधकाम साहित्य, कागद, अन्नप्रक्रिया, तंबाखू, कपडे, रसायने, आसवन्या, फर्निचर, शेती अवजारे, साखर उत्पादन इ. उद्योगांमध्ये खूच प्रगती झाली आहे.  


जून १९८७ पासून झिंबाब्वे वीज निर्मितीच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनला आहे. एकूण वीज उत्पादनाच्या ८४% जलविद्युत असून ती बहुतेक करिबा जलाशयावर निर्माण केली जाते. हांगे येथील औष्णिक वीज प्रकल्प १९८५ मध्ये कार्यान्वित झाला असून या केंद्राची वीजनिर्मिती क्षमता ९२० मेवॉ. आहे. करिबा धरणावरील वीज केंद्र १९५५ मध्ये कार्यान्वित झाले असून १९८६ मध्ये देशाची एकूण वीजनिर्मिती क्षमता ४६,७०० लक्ष किवॉ. होती. इंधन म्हणून खनिज तेलाचा वापर फक्त १५ ते २० टक्के केला जातो. देशात सौरशक्तीचाही प्रसार मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. 

झिंबाब्वे डॉलर हे देशाचे अधिकृत चलन असून १०० सेंटचा १ झिं. डॉलर होतो. ३१ डिसेंबर १९८७ रोजी देशातील विनिमय दर पुढीलप्रमाणे होता. १ स्टर्लिंग पौंड = ३.१२४१ झिं. डॉलर व १ अमे. डॉलर = १.६६३१ झिं. डॉलर. देशात २, ५, १० झिं डॉलरच्या नोटा, तर १, ५, १०, २०, ५० सेंट तसेच १ डॉलरची नाणी प्रचलित आहेत.

वाहतूक व संदेशवहन : देशात लोहमार्ग, रस्ते व विमानसेवा यांच्या सुविधा उपलब्ध असून जानेवारी १९८० पासून हा देश झँबिया व मोझँबीक यांच्याशी रस्ते व लोहमार्ग यांनी जोडण्यात आला आहे. १९८६ मध्ये दक्षिण आफ्रिकेतील वाहतुकीसाठी पर्यायी योजना म्हणून ‘बेईरा कॉरिडॉर ग्रुप’ची स्थापना करण्यात आली. १९८७ साली देशात सु. २,७४५ किमी. लांबीचे लोहमार्ग ८५,७८४ किमी. लांबीचे रस्ते (पैकी १६,१४० किमी. दुय्यम दर्जाचे) होते. ग्वेरु (ग्वेलो) ते हरारेपर्यंतच्या ४४५ किमी. मार्गांचे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. (१९८३). रेल्वे वाहतुकीच्या नियंत्रणासाठी १९८२ मध्ये ‘नॅशनल रेल्वेज ऑफ झिंबाब्वे’ या सरकारी निगमाची स्थापना करण्यात आली आहे. देशातील व परदेशांतील मोठी शहरे हवाई मार्गांनी जोडण्यात आली असून हरारे येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. जलमार्गाने वाहतूक करण्यासाठी झिंबाब्वेला मोझँबीकमधील मापूतो व बेईरा ह्या बंदरापर्यंत माल वाहून न्यावा लागतो. 

देशात १९८७ साली. सु. १० लक्ष रेडिओ संच व १,१२,००० दूरचित्रवाणी संच होते. रेडिओवरून इंग्रजी, शोन, एंडबीली, कालोगा, व्हेंड, टाँगा, चेवा इ.भाषातून विविध कार्यक्रम सादर केले जातात. हरारे येथे प्रमुख दूरचित्रवाणी केंद्र व बूलवायो येथे उपकेंद्र आहे. दोन वाहिन्यावरून आठवड्यातून १९० तास दूरचित्रवाणीचे कार्यक्रम सादर केले जातात. १९८६ साली देशात २,५१,३४४ दूरध्वनी होते.

लोक व समाजजीवन : देशातील एकूण लोकसंख्येपैकी ९६ टक्क्यांपेक्षा अधिक लोक कृष्णवर्णीय आहेत. येथील कृष्णवर्णियांचे प्रामुख्याने एंडबीली (मॅटबीली) व शोन (मॅशोना) असे दोन गट असून ते एंडबीली व शोन या बांतू भाषेच्या पोटभाषा बोलतात. यांपैकी शोनाची संख्या ८०%, तर एंडबीली १६% असून  त्यांचे वास्तव्य देशाच्या नैर्ऋत्य भागातील बूलवायो शहराच्या परिसरात आढळते. या प्रदेशात शोन सु. १००० मध्ये आले असून त्यांच्या वसाहती मुख्यत्वे देशाच्या उत्तर व पूर्व भागांत दिसून येतात. देशातील श्वेतवर्णियांची संख्या मात्र खूपच कमी झाली असून ते प्रामुख्याने हायव्हेल्ड प्रदेशात राहतात. त्यांच्यामध्ये ब्रिटिश व डच ह्यांचे प्रमाण जास्त आहे. ते मुख्यत्वे इंग्रजी भाषा बोलतात. त्यांच्याशिवाय देशात मिश्रवंशीय व आशियाई (भारतीय, चिनी, जपानी) अल्पसंख्य असून ते व्यापार-व्यवसायांत गुंतलेले आहे. 


देशात अँग्लिकन व रोमन कॅथलिक पंथीयांची संख्या जास्त असून (५८%) प्रेसबिटेरियन, मेथडिस्ट, मुस्लिम हिंदू, ज्यू, बहाई हे अल्पसंख्येत आहेत. श्वेतवर्णीय, त्यांच्या संपर्कात वावरणारे शहरी बांतू व ग्रामीण भागांत पारंपरिक पद्धतीने राहणारे बांतू, असे येथील लोकांचे राहणीमानावरून तीन गट पडतात. ग्रामीण भागांतील बांतू लोकांच्या वसाहती म्हणजे ६ ते ५० झोपड्यांचे (काइआस) गट असतात. मध्यभागी गोठा व त्याभोवती गोलाकार अथवा चौकोनी आकारात, मातीविटा व गवताचा गिलावा करून या झोपड्या बांधलेल्या असतात. छप्पर गवताने शाकारलेले व शंक्वाकार असते. त्यांच्यात बहुपत्नीत्व प्रथा रूढ असून प्रत्येक पत्नीसाठी वेगळी झोपडी उभारली जाते. बांतूंत पूर्वजपूजा प्रचलित आहे. शेती, गुरे पाळणे अथवा जवळच्या शहरात नौकरी यांवर यांचा चरितार्थ चालतो. शेती स्त्रिया कसतात. यूरोपियनांच्या संपर्कातील बांतू युरोपियनांच्या शेतांत अथवा खाणींमध्ये मजुरी करतात व शहरांबाहेर घरे बांधून राहतात. श्वेतवर्णियांचे जीवन ऐषारामी असून बहुतेक बांतू त्यांच्याकडे नोकर-चाकर म्हणून राबतात.

शिक्षण : स्वातंत्र्यापूर्वी देशात आफ्रिकनांसाठी वेगळ्या शाळा व शिक्षण-पद्धती होत्या. सांप्रत देशातील शिक्षण-पद्धती सर्व स्तरांवर वर्णभेदविरहित असून प्राथमिक शिक्षण मोफत आहे. प्राथमिक शाळांमध्ये कृषी विषय सक्तीचा करण्यात आला आहे. स्वातंत्र्यानंतर शिक्षणाचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला असून १९८५ मध्ये देशात प्राथमिक शिक्षण गटातील सु. ९०% मुले शिकत होती. १९८६ मध्ये प्राथमिक शाळांत २२,६०,३६७ माध्यमिक शाळांत ५,४५,८४१ विद्यार्थी शिकत होते. त्याच वर्षी देशात १० शिक्षक प्रशिक्षण महाविद्यालयांत व ४ विशेष प्रशिक्षण केंद्रांत १२,०२९ प्रशिक्षणार्थी होते तर कृषी  महाविद्यालयांत ८७५ व तांत्रिक महाविद्यालयांत ११,२६१ विद्यार्थी शिकत होते. हरारे येथे १९५५ मध्ये झिंबाब्वे विद्यापीठाची स्थापना झाली असून त्यात १९८६ मध्ये ५,८६६ विद्यार्थी उच्च शिक्षण घेत होते. येथे एक वैद्यक महाविद्यालयही आहे. 

देशात सर्व नागरिकांना महिन्याला १५० झिं. डॉलरपर्यंतच्या आरोग्यसेवा मोफत आहेत. १९८५ मध्ये देशात १६२ रुग्णालये १,०६२ ग्रामीण स्थिर चिकित्सालये व ३२ फिरती चिकित्सालये होती. मे १९८८ मध्ये सामाजिक सुरक्षेसाठी वेगवेगळ्या कल्याणकारी योजना कार्यान्वित झाल्या आहेत. 

इंग्रजी ही देशाची अधिकृत भाषा असली, तरी बहुतेक लोक बांतू भाषेशी मिळत्या-जुळत्या असलेल्या स्थानिक भाषा बोलतात. एन्‌गोनी ही एंडबीली लोकांची, तर चिझेझुरू, चिकारांगा, चिरोझ्वी या शोनांच्या बोली आहेत. यूरोपीयांत इंग्रजीचा वापर जास्त असून अलीकडे काही आफ्रिकनही तिचा वापर करू लागले आहेत. १९८२ मध्ये देशात दोन दैनिक प्रसिद्ध होत होती.

महत्त्वाची स्थळे : व्हिक्टोरिया धबधबा, करिबा धरण, ह्वांगे राखीव जंगल व राष्ट्रीय उद्यान, झिंबाब्वे (ग्रेट झिंबाब्वे) येथील प्राचीन अवशेष, माटोपो टेकडीवरील (बूलवायो शहराजवळ) वर्ल्ड्‌स व्ह्यू पॉइंट व तेथील सेसिल ऱ्होड्‌सची कबर ही देशातील महत्त्वाची पर्यटन स्थळे असून १९८६ साली एकूण ३,४५,४६० पर्यटकांनी देशाला भेट दिली. हरारे ही देशाची राजधानी व एक औद्योगिक शहर म्हणून प्रसिद्ध आहे. तंबाखू वाळविणे (क्युअरिंग), अन्नपदार्थ प्रक्रिया, फर्निचर, बांधकामाचे साहित्य, खते तयार करणे इ. उद्योगधंद्यांत हे शहर अग्रेसर आहे. ⇨बूलवायो (लोकसंख्या ४,१३,८००-१९८२) हे शहर पश्चिम भागातील व्यापारकेंद्र, लोहमार्ग प्रस्थानक व महामार्गावरील प्रमुख शहर म्हणून प्रसिद्ध आहे. शहरात धातुकाम, टायरनिर्मिती, शेतीअवजारे तयार करणे इ. उद्योगधंदे चालतात. याच्या वायव्येस जवळच प्राचीन खामी अवशेष आहेत. मुतारे (उम्‌‌ताली ६९,६००) हे देशाच्या पूर्व भागातील छोटेस शहर डोंगरांनी वेढलेले असून खाणउद्योगाचे केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे. याच्या परिसरात चांदी, शिसे, तांबे, लोह व विशेषतः सोने याचे साठे सापडले आहेत. येथील जमीन तंबाखू उत्पादनास योग्य आहे. इन्यांग्गानी हे देशातील सर्वोच्च शिखर याच्या उत्तरेस असून मुतारे शहराच्या याच भागात बांतूंच्या प्राचीन वसाहतींचे अवशेष आढळतात. ⇨झिंबाब्वे (ग्रेट झिंबाब्वे) हे ऐतिहासिक शहर देशाच्या आग्नेय भागात असून बांतू अवशेषांसाठी प्रसिद्ध आहे. येथील व्हिक्टोरिया किल्ला, प्राचीन भिंत व शंक्वाकार मनोरे असलेली मंदिरे ही पर्यटकांची आकर्षणे आहेत.  

चौंडे, मा. ल.


ऱ्होडेशिया (झिंबाब्वे)

लोखंड व पोलाद कारखाना, वांगजी.राजधानी हरारे : देशातील प्रमुख व्यापार केंद्रदेशातील महत्त्वाचा मोटार उद्योग, एक दृश्य.तंबाखूची यांत्रिक शेती, हरारे.