ऱ्होड आयलंड : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील ईशान्येकडील न्यु इंग्लंड या सहा राज्यांच्या विभागीय प्रदेशातील एक राज्य, तसेच देशातील मूळ तेरा वसाहतीपैंकी एक वसाहत. क्षेत्रफळ ३,१४४ चौ. किमी. पैकी ४२८ चौ. किमी. अंतर्गत जलाशयांखाली. लोकसंख्या ९,७५,००० (१९८६ अंदाज). दक्षिणोत्तर कमाल लांबी ७७ किमी. व पूर्व-पश्चिम कमाल रुंदी ६० किमी. अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तार अनुक्रमे ४१०, १८’ ते ४२० ०१’ उत्तर व ७१० ४८’ ते ७१’ ०७’ पश्चिम असा आहे. क्षेत्रफळाने हे देशातील सर्वात लहान राज्य असून लोकसंख्येची घनता मात्र जास्त आहे. याच्या उत्तरेस व पूर्वेस मॅसॅचूसेट्स, पश्चिमेस कनेक्टिकट ही राज्ये व दक्षिणेस अटलांटिक महासागर आहे. राज्याला ६४ किमी. लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. प्रॉव्हिडन्स (लोकसंख्या १,५६,८०४-१९८०) हे राज्यातील सर्वांत मोठे व राजधानीचे शहर आहे.
भूवर्णन : राज्याचे पूर्वेकडील कोस्टल लोलँड्स, पश्चिमेकडील ईस्टर्न न्यू इंग्लंड अपलँड असे दोन मुख्य नैसर्गिक विभाग पडतात. कोस्टल लोलँड्स हा ‘न्यू इंग्लंड सी बोर्ड लोलँड्स,’चाच भाग आहे. हा कमी उंचीचा वालुकामय प्रदेश असून त्यातील काही भाग नॅरागँसिट उपसागराखाली गेलेला आहे. या विभागाची सस. पासून सर्वाधिक उंची ६० मी. आहे. या विभागात ऱ्होड आयलंड (अक्विड्निक), कनॅनिकट व प्रूडन्स ह्या तीन मोठ्या व इतर अनेक लहान बेटांचा समावेश होतो. यांशिवाय किनाऱ्यापासून दक्षिणेस १६ किमी.वर ब्लॉक बेट आहे. येथील बेटावर व किनारी भागात कडे आढळतात तसेच किनारी भागात, विशेषतः जूडथ भूशिराच्या पूर्वेस पुळणी, खारकच्छे व खाऱ्या पाण्याची तळी आहेत.
पश्चिमेकडील नैसर्गिक विभागाने राज्याचे सु. ६६ टक्के क्षेत्र व्यापले आहे. हा भाग डोंगराळ व उंचसखल असून तो ‘न्यू इंग्लंड अपलँडस’चाच भाग आहे. ‘वेस्टर्न रॉकी अपलँड’ या नावाने राज्यातील हा विभाग ओळखला जातो. या विभागाची सर्वाधिक उंची (२४७ मी.) पश्चिम सरहद्दीवरील जेरिमॉथ टेकडीत आढळते. पूर्वेकडून पश्चिमेकडील या प्रदेशाची उंची वाढत गेलेली आहे. या उच्चभूमीच्या प्रदेशात अनेक लहानलहान सरोवरे, जलाशय, तळी असून किनाऱ्यावर पुळणी आहेत. राज्यात उंच पर्वतीय प्रदेश मात्र नाही.
ऱ्होड आयलंडमधील बहुतांश जमीन नापीक आहे. नॅरागँसिट उपसागर किनारी भागातील मिआमी दगडयुक्त लोम, तांबट ह्या येथील सुपीक मृदा असून त्यांनी राज्याचे वीस टक्के क्षेत्र व्यापले आहे. ईशान्य भागात वॉरिक वालुकामय लोम मृदा आढळते. ग्लॉसेस्टर दगडयुक्त लोम ह्या अम्लीय वालुकामय मृदेने राज्याचे जवळजवळ निम्मे क्षेत्र व्यापले असून ती कमी सुपीक आहे.
राज्यात विशेष महत्त्वाचे खनिजसाठे नाहीत. वाळू, खडक, बारीक खडी यांचेच काय ते मोठे साठे आहेत. वायव्य व ईशान्य भागांत चुनखडी, तर नैर्ऋत्य भागात वेस्टर्ली शहराच्या आसमंतात ग्रॅनाइटचे साठे आहेत. राज्याचे हवामान आर्द्र खंडीय प्रकारचे असून तापमानातील विषमता सागरसान्निध्यामुळे कमी झालेली आहे. जानेवारीचे सरासरी तापमान मॅसॅचूसेट्स सरहद्दीवर -३० से. व किनारी प्रदेशात -१० से. असते. जुलैचे सरासरी तापमान बहुतांश भागात २१० से असते. राज्यातील कमाल तापमानाची (४०० से.) नोंद प्रॉव्हिडन्स येते २ ऑगस्ट १९७५ रोजी झाली, तर न्यूनतम तापमानाची (-३१० से.) नोंद किंग्स्टन येथे ११ जानेवारी १९४२ रोजी झाली. वार्षिक सरासरी पर्जन्यमान सु. १०० सेंमी. तर हिमवृष्टी ७९ सेंमी. आहे. वर्षभर सरासरी सापेक्ष आर्द्रता ७० टक्के असते. उन्हाळ्यात किनारी प्रदेशातील हवामान सामान्यपणे आल्हाददायक असते. कधीकधी हरिकेन व सागरी लाटा यांचा तडाखा राज्याच्या किनारी भागाला बसतो. १८१५, १९३८, १९४४ व १९५४ मधील हरिकेन वादळे जास्त विनाशकारी होती.
ओक, पाइन, जूनिपर, ॲश, हिकरी, एल्म, विलो, मॅपल, बर्च, पॉप्लर, सीडार ह्या येथील स्थानिक वनस्पती आहेत. पिवळी, पांढरी, निळी व जांभळ्या रंगांची डॉगवुड, लॉरेल, ऱ्होडोडेंड्रॉन ही फुलझाडे आढळतात. याशिवाय लिकी, गोल्डन रॉड, डेझी, ब्लॅकबेरी व ब्लूबेरी, हकलबेरी, पॉयझन आयव्ही आणि पॉयझन सुमाक ह्या वनस्पतीही आढळतात.
राज्याचे ६४% क्षेत्र अरण्यांखाली आहे. तीन प्रकारची अरण्ये असून त्यांपैकी ७३% क्षेत्र ओक, २५% ओक-पाइन, तर उरलेले २% क्षेत्र सीडार यांच्या अरण्यांनी व्यापलेले आहे.
राज्यात वन्य प्राणिजीवन मर्यादित आहे. ससा, वुडचक, खार, कोल्हा, चिचुंद्री, स्कंक, मिंक, रॅकून, ऊद मांजर व हरिण हे प्राणी आढळतात. पक्षिजीवन मात्र विपुल व वैविध्यपूर्ण आहे. ऑस्प्रे, सँडपायपर व श्वेत आर्क्टिक घुबड हे पक्षी येथे आढळतात. किनाऱ्याजवळील जलाशयांत क्लॅम, ऑयस्टर, शेवंडा, ब्लूफिश, तलवार मासा, सागरी बास, कॉड, मॅकेरल, हेरिंग, ब्लॅकफिश, पट्टेरा बास, तर अंतर्गत जलाशयांत बास, पर्च, ट्राउट आणि पिकॅरेल हे माशांचे विविध प्रकार आढळतात.
विपुल जलसंपदेमुळे राज्याचा मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे. प्रॉव्हिडन्स, सकॉनिट व सीकाँक ह्या राज्यातील तीन मुख्य नद्या म्हणजे नॅरागँसिट उपसागराचे फाटेच आहेत. पटकिट, पेटक्वामस्क्ट, पॉटॉवॉमट व वुन्सॉकिट ह्या मुख्य नद्या राज्यातून वाहतात. उत्तर भागातून वाहणारी ब्लॅकस्टोन नदी प्रथम पटकिट व नंतर सीकाँक या नावांनी ओळखली जाते पुढे ती नॅरागँसिट उपसागरास मिळते. नैर्ऋत्य भागातून वाहणारी पटकिट नदी काही अंतर ऱ्होड आयलंड-कनेक्टिकट सरहद्दीवरून वाहते. यांशिवाय, चीपॅचिट, पॉनागन्सेट व वुड ह्या इतर महत्त्वाच्या नद्या आहेत. राज्याच्या अंतर्गत भागातून वाहणाऱ्या नद्या लहान, परंतु शीघ्रगामी आहेत. त्यांच्या पात्रांत अनेक ठिकाणी धबधबे निर्माण झालेले आढळतात. सरोवरे, जलाशय व तळ्यांची संख्याही राज्यात बरीच आहे. सिचुवेट हा राज्यातील सर्वांत मोठा जलाशय आहे. वॉचऑग व बर्डन ही येथील महत्त्वाची तळी आहेत. नॅरागँसिट उपसागर किनाऱ्यावरील बंदरांचा राज्याच्या सुरुवातीच्या काळातील व्यापारी विकासात फार मोठा हातभार लागला आहे. आजही व्यापारी जहाजवाहतूक, नौसेना उपकरणे व प्रशिक्षणकेंद्र यांची स्थापना, मनोरंजन, मासेमारी या दृष्टींनी या उपसागराला फार महत्त्व आहे. राज्यातील नद्या वीजउत्पादनदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या ठरल्या असून येथील कापडगिरण्या व इतर कारखाने ह्यांना सुरुवातीपासूनच त्यांचा मोठ्या प्रमाणात फायदा झाला आहे.
इतिहास व राज्यव्यवस्था : येथे यूरोपियन वसाहती येण्यापूर्वी ऱ्होड आयलंडमध्ये अमेरिकन इंडियन रहात होते. त्यात अल्गाँक्वियन इंडियन कुळातील नॅरागँसिट, निपमक, पीक्वॉट, बाम्पानोॲग ह्या इंडियन जमातींचा समावेश होता. ह्यांपैकी नॅरागँसिट जमात विशेष महत्त्वाची होती. हे शांत स्वभावाचे असून शिकार, मासेमारी व शेती करीत होते. मिगेल दे कॉर्टेरीअल हा पोर्तुगीज मार्गनिर्देशक १५०२ मध्ये ऱ्होड आयलंडच्या किनाऱ्यावर आला. फ्रान्ससाठी काम करणाऱ्या जोव्हान्नी व्हेर्रात्सानो या इटालियन मार्गनिर्देशकाने १५२४ मध्ये नॅरागँसिट उपसागराचे समन्वेषण केले. काही इतिहासतज्ञांंच्या मते भूमध्य समुद्रातील रोड्झ बेटाशी याचे साम्य आढळल्याने व्हेर्रात्सानो याने या प्रदेशाला ऱ्होड आयलंड हे नाव दिले असावे. इतर इतिहासतज्ञांच्या मते डच मार्गनिर्देशक ॲड्रियन ब्लॉक याने या प्रदेशाला ऱ्होड आयलंड हे नाव दिले. येथील किनाऱ्यावरील तांबड्या खडकांमुळे ब्लॉकने १६१४ मध्ये नॅरागँसिट, उपसागरातील रुइट इलँट (तांबडे बेट-रेड आयलंड) असे याला नाव दिले.
रॉजर विल्यम्स याने १६३६ मध्ये प्रॉव्हिडन्स येथे राज्यातील पहिली गौरवर्णियांची वसाहत स्थापन केली. मॅसॅचूसेट्समध्ये असताना लोकांना धार्मिक आणि राजकीय स्वातंत्र्य अधिक मिळावे, अशी मागणी विल्यम्सने केली. येथील पुढाऱ्यांना वसाहतीच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही मागणी धास्तीची वाटल्याने विल्यम्सला मॅसॅचूसेट्समधून बाहेर घालविण्यात आले. विल्यम्सने स्थापलेल्या या वसाहतीत धार्मिक व राजकीय स्वातंत्र्याचे धोरण अवलंबिले. विल्यम कॉडिंटन, जॉन क्लार्क, ॲन हचिनसन आणि इतरांनी धार्मिक स्वातंत्र्याच्या कारणावरून १६३८ मध्ये मॅसॅचूसेट्स सोडले. त्यांनी अक्विड्निक बेटावर (सध्याचे ऱ्होड आयलंड) पोकॅसेट वसाहतीची स्थापना केली. धार्मिक आणि राजकीय स्वातंत्र्यातील भिन्नतेवरून त्यांच्यातही फूट पडली. हचिन्सन व त्यांचे अनुयायी पोकॅसेट येथे थांबले व त्याला त्यांनी पोर्टस्मथ असे नवे नाव दिले. कॉडिंटन, क्लार्क व त्यांच्या अनुयायांनी दक्षिणेस न्यू पोर्टची स्थापना केली (१६३९). १६४३ मध्ये सॅम्युएल गॉर्टन, जॉन ग्रीन व इतरांनी ऱ्होड आयलंडमधील वॉरिक ही चौथी वसाहत स्थापन केली. शेजारच्या वसाहतींपासून संरक्षण करण्यासाठी ऱ्होड आयलंडमधील चारी वसाहतींनी एकत्रित येण्याचा प्रस्ताव विल्यम्सने मांडला. त्याला १६४४ मध्ये इंग्लिश पार्लमेंटरी कमिशनकडून सनद मिळाली. त्या सनदीनुसार १६४७ मध्ये चारी वसाहती एकत्रित आल्या. इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स याने १६६३ मध्ये ऱ्होड आयलंडला ‘चार्टर ऑफ ऱ्होड आयलंड अँड प्रॉव्हिडन्स प्लँटेशन्स’ ही दुसरी सनद दिली. १८४३ पर्यंत ऱ्होड आयलंडमध्ये तोच कायदा राहिला.
रॉजर विल्यम्सने इंडियनांना काही अधिकार देऊन त्यांच्याशी सलोख्याचे संबंध ठेवले. परंतु इंडियनांना तरुण नेतृत्व मिळाल्यावर शेजारच्या मॅसॅचूसेट्स बे व प्लिमथ कॉलनी यांमध्ये तंटे सुरू झाले. कारण इंग्लिश वसाहतींच्या विस्ताराची धास्ती इंडियनांना होती. वाम्पानोॲग इंडियनांचा नेता किंग फिलिप (मेटॅकॉमेट) याने १६७५ मध्ये न्यू इंग्लंडच्या वसाहतकऱ्यांना ठार मारण्यास सुरुवात केली. त्याच वर्षी मॅसॅचूसेट्स, प्लिमथ व कनेक्टिकट यांच्या सैन्यांनी ऱ्होड आयलंडमधील किंग्स्टनजवळ झालेल्या ‘ग्रेट स्वँप फाइट’ (किंग फिलिपचे युद्ध) मध्ये इंडियनांचा पाडाव केला. त्यानंतर इंडियनांनी ऱ्होड आयलंडमधील नगरे जाळली व वसाहतकऱ्यांचे खून केले. १६७६ मध्ये दक्षिण न्यू इंग्लंडमधील युद्ध थांबले, मात्र मेन व न्यू हँपशर यांमध्ये १६७८ पर्यंत युद्ध चालूच राहिले.
ऱ्होड आयलंडला १७०० चा पूर्वार्ध भरभराटीचा ठरला. किनाऱ्यावरील तसेच नॅरागँसिट उपसागरातील सुपीक बेटांवर शेती व पशुपालन व्यवसाय यांचा विकास करण्यात आला. त्यासाठी गुलामांचाही वापर करण्यात आला. न्यूपोर्टच्या व्यापाऱ्यांनी कृषी व दुग्धोत्पादने अमेरिकेतील इतर इंग्लिश वसाहतींना व वेस्ट इंडीज बेटांना निर्यात करण्यास सुरुवात केली. त्यांनी आफ्रिकन गुलामांच्या व्यापारात तसेच रम व्यापारातही बरीच गुंतवणूक केली. त्यामुळे मळेवाले व व्यापारी यांना खूप नफा मिळाला. असा नफा होत असूनही ऱ्होड आयलंडने गुलामांच्या व्यापारास बंदी केली. अशी बंदी घालणारी ऱ्होड आयलंड ही पहिलीच वसाहत होय.
ऱ्होड आयलंड व अमेरिकेतील इतर वसाहती यांवर ग्रेट ब्रिटनने १७६० मध्ये कर व व्यापारासंबंधी अनेक जाचक कायदे लादले. ऱ्होड आयलंडमधील लोकांनी या ब्रिटिश कायद्यांना तीव्र विरोध केला. त्यातूनच १७६९ मध्ये न्यूपोर्ट येथे ‘लिबर्टी’ हे ब्रिटिश जहाज जाळण्यात आले. राज्यक्रांती सुरू झाल्यावर ऱ्होड आयलंडनेही तीत भाग घेतला. डिसेंबर १७७६ ते ऑक्टोबर १७७९ या काळात न्यूपोर्ट ब्रिटिश लष्कराने बळकावले. तथापि राज्यक्रांतीचे युद्ध ऱ्होड आयलंडच्या भूमीवर विशेष लढले गेले नाही. ग्रेट ब्रिटनपासून स्वातंत्र्य मिळविणारी ऱ्होड आयलंड ही पहिली वसाहत होय (४ मे १७७६). अधिकार विधेयक मंजूर झाल्यावर ऱ्होड आयलंडने संयुक्त संस्थानांच्या राज्यघटनेला मान्यता दिली.
ऱ्होड आयलंडच्या औद्योगिक विकासास १७०० च्या उत्तरार्धात सुरुवात झाली. वस्त्रोद्योग हा येथील पहिला उद्योग. देशातील पहिला हातमाग १७८७ मध्ये प्रॉव्हिडन्स येथे, तर जलविद्युत् शक्तीवर चालणाऱ्या यंत्राच्या साहाय्याने सूतकताई १७९० मध्ये पटकिट येते सुरू झाली. वस्त्रोद्योगाबरोबरच धातुनिर्माण, जडजवाहीर निर्मिती, मासेमारी, व्हेल माशापासून तेल काढणे हे उद्योगही विकसित झाले. १८०० च्या पूर्वार्धात ऱ्होड आयलंडमधील शहरे जलद विकसित होत गेली. त्यामुळे हजारो कॅनडियन, यूरोपीय व राज्यातील शेतकरी वरील विकास पावणाऱ्या शहरांतील कापड गिरण्यांकडे आकर्षित झाले. शहरातील वाढत्या गर्दीबरोबर राज्यात लोकांच्या हक्कांवरून राजकीय कलह निर्माण झाले. टॉमस डॉर याने राज्यात आपले शासन आणण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. १८४२ मध्ये राज्याचे नवीन संविधान तयार झाले व पुढल्याच वर्षी प्रत्यक्ष अंमलात आले. त्यात मताधिकाराबाबत काही अटी शिथिल केल्या गेल्या. नागरी युद्धानंतरही राज्याची भरभराट होत गेली. १८७० ते १९०० या काळात राज्यात लोकसंख्या जवळजवळ दुप्पट झाली.
पहिल्या महायुद्धकाळात राज्यात रसायने, दारूगोळा व इतर युद्धसाहित्य, जहाजबांधणी या उद्योगांचाही विकास झाला. १९२० पासून राज्यातील वस्त्रोद्योगाचे महत्त्व कमी होऊ लागले. मजूर व वाहतूक खर्च कमी येणाऱ्या दक्षिणेकडील प्रदेशात बऱ्याचशा कापड गिरण्यांचे स्थलांतर करण्यात आले. ही पोकळी यंत्रसामग्री, धातुउत्पादन यांसारख्या उद्योगांमुळे भरून निघण्यास मदत झाली. १९३० मधील प्रचंड मंदीमुळे पुन्हा आर्थिक विकासाचा वेग मंदावला. १९३८ मधील विनाशकारी हरिकेन व सागरी लाटा या नैसर्गिक आपत्तींचा तडाखा राज्याच्या अर्थव्यवस्थेला बसला. दुसऱ्या महायुद्धकाळात संयुक्त संस्थानांच्या नौसेना विभागाने ‘क्वॉनसिट पॉइंट नेव्हल एअर स्टेशन’ची केलेली स्थापना (१९४१) व इतर युद्ध साधनसामग्री निर्मिती कारखान्यांचा राज्याच्या आर्थिक विकासास चांगला फायदा मिळाला. युद्धोत्तर काळात युद्ध साधनसामग्री निर्मितीचे कारखाने बंद करण्यात आले, तथापि वस्त्रोद्योगाचे दक्षिणेकडील स्थानांतर चालूच राहिले. त्यामुळे आर्थिक विकासाची गती मंदावली. १९४९ मध्ये १७% पेक्षा अधिक कामगार बेकार झाले. १९५०-६० च्या दरम्यान मात्र इलेक्ट्रॉनिकीय साहित्य, रसायने, यंत्रसामग्री व प्लॅस्टिक उद्योगांमध्ये वाढ करण्यात येऊन १९६० पर्यंत बेकारीचे प्रमाण ३% पर्यंत खाली आणले गेले. त्याचवेळी पर्यटन व्यवसायाचा विकास तसेच ऱ्होड आयलंड विद्यापीठाची आणि एका प्रमुख वैज्ञानिक संशोधन केंद्राची स्थापना करण्यात आली. १९४० व १९५० मध्ये राज्याला हरिकेनचा पुन्हा तडाखा बसला, तरी १९३८ पेक्षा त्यांचे स्वरूप सौम्य होते. १९७० मध्ये राज्यातील न्यूपोर्ट नौसेना तळ बंद करण्यात आला व नौसेना सोयी-सुविधा कमी करण्यात आल्या, तेव्हापासून राज्याला अनेक आर्थिक प्रश्नांला तोंड द्यावे लागत आहे. त्याचबरोबर राज्यात शक्तिसाधनांचीही टंचाई निर्माण झाली आहे. १९८० मध्ये तर प्रचंड प्रमाणात बेकारीचा प्रश्न निर्माण झाला. तो सोडविण्यासाठी राज्याने केंद्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत घेतली. सागरविज्ञान संशोधनाचे ऱ्होड आयलंड हे जागतिक केंद्र निर्माण करण्याचे राज्याचे प्रयत्न चालू आहेत.
ऱ्होड आयलंड पाच परगण्यांमध्ये विभागण्यात आले आहे. राज्याचे विधान मंडळ ‘महासभा’ नावाने ओळखले जाते. राज्याची महासभा ही ५० सभासदांची अधिसभा (सीनेट) व १०० सभासदांचे प्रतिनिधिमंडळ (हाउस ऑफ रेप्रिझेंटेटिव्ह्ज) यांची मिळून बनलेली आहे. १९६६ मध्ये विधान मंडळ हे अधिसभा व प्रतिनिधी मंडळ असे दोहोंमध्ये विभागले गेले. दोहोंमधील सभासदांची निवड दोन वर्षासाठी केलेली असते. विधान मंडळाचे अधिवेशन दरवर्षी जानेवारी महिन्यातील पहिल्या मंगळवारी सुरू होते. अठरा वर्षे वयाच्या व राज्यात ३० दिवस वास्तव्य असणाऱ्या सर्व नागरिकांना मताधिकार प्राप्त होतो. देशाच्या काँग्रेसवर राज्यातून दोन सिनेटर व दोन प्रतिनिधी पाठविले जातात. राज्याचा गव्हर्नर दोन वर्षे कारभार सांभाळू शकतो, मात्र पुन्हा तो कितीही वेळा निवडून येऊ शकतो.
आर्थिक स्थिती : ऱ्होड आयलंड हे मूलतः कारखानदारी राज्य आहे. राज्यातील सर्वांत जास्त म्हणजे सु. ३३% कामगार निर्मिती उद्योगांत असून सु. २० टक्क्यांपेक्षा अधिक कामगार किरकोळ व घाऊक व्यापारात गुंतलेले आहेत. शेती, मासेमारी व अरण्योद्योग यांत केवळ २० टक्क्यांपेक्षाही कमी लोक गुंतलेले आहेत. शेतीखालील क्षेत्र हळूहळू कमी होत गेलेले आहे. शेताचा सरासरी आकार ३५ हेक्टर असून अशी ६९७ शेते राज्यात आहेत. एक टक्क्यापेक्षाही कमी लोक शेतीव्यवसायात आहेत. रोपवाटिकांमधून मिळणारे उत्पादन विशष महत्त्वाचे आहे. एकूण कृषि-उत्पन्नापैकी ३३% उत्पन्न शोभेची झाडे-झुडपे व रोपवाटिकांतील इतर उत्पादनांच्या विक्रीपासून, तर २०% भाजीपाल्यापासून, २०% दुग्धोत्पादनापासून व १२.५% उत्पन्न कुक्कुटपालनापासून मिळते. बटाटे हे प्रमुख कृषि-उत्पादन असून त्याशिवाय मका, गवत, टोमॅटो, हिरवी मिरी, कडधान्ये, कोबी, सफरचंद, सप्ताळू ही उत्पादने घेतली जातात. भाजीपाल्याचे उत्पादन मुख्यतः केंट, प्रॉव्हिडन्स व वॉशिंग्टन परगण्यांत अधिककरून घेतले जाते. दुग्धोत्पादनासाठी आयर्शर, गर्न्सी, होल्स्टीन, जर्सी या जातींच्या गाई पाळल्या जातात. अंडी व मटण उत्पादनासाठी ऱ्होड आयलंड रेड व इतर जातींच्या कोंबड्या पाळल्या जातात. मासेमारी हा येथील एक जुना व्यवसाय आहे. नॅरागँसिट उपसागर व अटलांटिक महासागर यांमध्ये मासेमारी केली जाते. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात व एकोणिसाव्या शतकच्या पूर्वार्धात देवमाशांच्या शिकारीसाठी हे राज्य महत्त्वाचे होते. गॅलिली, न्यूपोर्ट, ब्रिस्टल व वॉरन ही मासेमारीची प्रमुख केंद्रे आहेत.
सॅम्युएल स्लॉटर याने १७९० मध्ये पटकिट येथे राज्यातील पहिल्या कापडगिरणीची स्थापना केली. जलविद्युत् शक्तीवर चालणारी ही अमेरिकेतील पहिली कापडगिरणी म्हणजे देशातील आधुनिक कारखानदारी व्यवसायाचा श्रीगणेशाच ठरला. मुबलक जलविद्युत् शक्ती निर्मितीची संभाव्यता, मुबलक भांडवल पुरवठा आणि सुयोग्य व्यवस्थापन हे घटक येथील कापड उद्योगाच्या विकासाला अनुकूल ठरले. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात राज्यात धातु-जोडकाम व जडजवाहीर निर्मिती उद्योगांची स्थापना झाली, तर एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात रबर उद्योग महत्त्वाचा बनला. विसाव्या शतकात राज्यातील उद्योगधंद्यात बरीच विविधता निर्माण झाली होती. त्यामुळे तसेच दक्षिणेकडील कापड उद्योगाच्या वाढत्या स्पर्धेमुळे राज्यातील कापड उद्योगाचे महत्त्व कमी झाले. जडजवाहीर, चांदीच्या वस्तू, कापड, मूळ धातू, यंत्रसामग्री, अन्नसामग्री, संरचित धातू, विद्युत साहित्य, रबर, प्लॅस्टिक उत्पादने व रसायने, लहान बोटी व शीडजहाजे ही येथील महत्त्वाची औद्योगिक उत्पादने आहेत. छपाई व प्रकाशन उद्योगही मोठा आहे. नॅरागँसिट उपसागराच्या सभोवती व या उपसागराला मिळणाऱ्या नद्यांच्या काठी उद्योगधंद्यांचे केंद्रीकरण झालेले आहे. वुनसॉकिट, पटकिट, सेंट्रल फॉल्स, प्रॉव्हिडन्स, क्रॅनस्टन व वॉरिक ही येथील महत्त्वाची औद्योगिक शहरे आहेत. राज्यात एकूण ३,१७० कारखाने आहेत. येथील पर्यटन व्यवसायही मोठा आहे. येथील बहुतांश वीजउत्पादन औष्णिक स्वरूपाचे असून जलविद्युत्निर्मिती एक टक्क्यापेक्षा कमी आहे. न्यूपोर्ट व प्रॉव्हिडन्स यांना आंतरराष्ट्रीय जहाजवाहतुकीच्या दृष्टीने सुरुवातीपासूनच महत्त्व होते, परंतु १८३० पासून लोहमार्गांचा विकास झाल्याने या दोन्ही बंदरांचे महत्त्व त्यामानाने कमी झाले. राज्यातील पहिला लोहमार्ग प्रॉव्हिडन्स-बॉस्टन यांदरम्यान १८३५ मध्ये सुरू झाला. लोहमार्गांची एकूण लांबी २१७ किमी. होती (१९८७). राज्यातील रस्त्यांची एकूण लांबी ९,३७६ किमी.पैकी २,९७१ किमी. रस्ते राज्याच्या मालकीचे असून नोंदणीकृत वाहनांची संख्या ७,५४,२९४ होती (१९८७). २३ विमानतळांपैकी सहा विमानतळ राज्याच्या अखत्यारीतील आहेत. वॉरिक येथील ‘थीओडोर फ्रान्सिस ग्रीन एअरपोर्ट’ हा सर्वांत मोठा विमानतळ आहे. येथे १२ विमानमार्ग येऊन मिळतात. १९८७ मध्ये येथून २० लक्ष प्रवासी व २२० लक्ष पौंड मालवाहतूक झाली. राज्यातील पहिले नभोवाणी केंद्र १९२२ मध्ये व दूरचित्रवाणी केंद्र १९४९ मध्ये सुरू झाले. राज्यात २४ नभोवाणी केंद्रे व ५ दूरचित्रवाणी केंद्रे आहेत.
ऱ्होड आयलंडलमधून ३० वृत्तपत्रे व २० नियतकालिके प्रसिद्ध होतात. प्रॉव्हिडन्स ईव्हनिंग बुलेटिन, प्रॉव्हिडन्स जर्नल, पटकिट टाइम्स व वुनसॉकिट कॉल ही महत्त्वाची दैनिके आहेत. ऱ्होड आयलंड गॅझेट हे पहिले वृत्तपत्र १७३२ मध्ये सुरू झाले.
लोक व समाजजीवन : राज्याची १९८० ची एकूण लोकसंख्या ९,४७,१५४ असून १९७० च्या (९,४९,७२३) तुलनेत ही ०.३ टक्क्याने कमी झालेली आढळते. राज्यातील दरहजारी जननसंख्या १३,३२४, मृत्युसंख्या ९,५८७, बालमृत्युसंख्या १२५ होती. एकूण ८,१०३ विवाह झाले व ३,६८३ घटस्फोट घेण्यात आले (१९८६). सर्वाधिक लोक रोमन कॅथलिक पंथाचे आहेत. यांशिवाय प्रॉटेस्टट, एपिस्कोपल, बॅप्टिस्ट, काँग्रिगेशनल, मेथडिस्ट, ज्यू या धार्मिक गटांतील लोक आहेत.
वसाहतकाळात ऱ्होड आयलंडच्या अनेक मंत्र्यांनी मुला-मुलींच्या शिक्षणासाठी शाळांची स्थापना केली. १६४० मध्ये न्यूपोर्टच्या लोकांनी गरीब विद्यार्थांच्या मोफत शिक्षणासाठी एका शाळेची स्थापना केली. १८०० मध्ये संपूर्ण राज्यासाठी ‘विद्यानिकेतना’ बाबतचा (पब्लिक स्कूल) एक कायदा संमत करण्यात आला परंतु १८०३ मध्ये तो कायदा बरखास्त करण्यात आला. १८२८ मध्ये तो पुन्हा अंमलात आणला गेला व त्याच वर्षी ऱ्होड आयलंड विधान मंडळाने राज्यात पहिला स्थायी विद्यानिकेतन निधी सुरू केला. १८८३ पासून राज्यात शिक्षण सक्तीचे करण्यात आले. येथे राज्य शिक्षण प्रतिनिधी मंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे. यामध्ये १५ सभासद असून सिनेटच्या सल्ल्याने गर्व्हनर ह्या सभासदांची तीन वर्षांसाठी नेमणूक करीत असतो. गर्व्हनर व प्रतिनिधी मंडळाचे सभासद मिळून शिक्षण आयुक्ताची निवड करतात. हे मंडळ राज्याचे शैक्षणिक धोरण ठरविते.
राज्यातील २३१ सार्वजनिक प्राथमिक शाळांत १९८६-८७ मध्ये ३,८५४ शिक्षक व ६८,६९८ विद्यार्थी, तर खाजगी व स्थानिक शाळांत २८,००० विद्यार्थी होते. तसेच ६१ माध्यमिक शाळांत ३,७०२ शिक्षक व ६५,४५१ विद्यार्थी होते. राज्यात उच्च शिक्षणाच्या ११ संस्था आहेत.
ऱ्होड आयलंड महाविद्यालय (प्रॉव्हिडन्स), ऱ्होड आयलंड विद्यापीठ (साउथ किंग्जटाउन), ब्राउन विद्यापीठ (प्रॉव्हिडन्स), प्रॉव्हिडन्स महाविद्यालय (प्रॉव्हिडन्स), ब्रायन्ट महाविद्यालय (स्मिथफील्ड), ऱ्होड आयलंड अभिकल्प विद्यालय (प्रॉव्हिडन्स) ह्या राज्यातील महत्त्वाच्या उच्च शिक्षणसंस्था आहेत. राज्यात ५० सार्वजनिक, २० विद्यापीठीय महाविद्यालयीन आणि ४० विशेष ग्रंथालये आहेत.
कला संग्रहालय (प्रॉव्हिडन्स), रॉजर विल्यम्स पार्क संग्रहालय (प्रॉव्हिडन्स), साउथ काउंटी संग्रहालय (विकाफोर्ड), वेस्टर्ली म्यूझीयम व आर्ट गॅलरी अशी विविध संग्रहालये राज्यात आहेत.
राज्यात २२ रुग्णालये असून त्यांपैकी ४ मनोरुग्णालये आहेत. रुग्णालयांतील खाटांची संख्या ७,००० पेक्षा अधिक होती (१९८७) १९८६ मध्ये १५,९०० कुटुंबांतील ४४,२०० अवलंबी मुलांना प्रतिकुटुंबास दरमहा सरासरी ३६१ डॉलर एवढी आर्थिक मदत करण्यात आली.
महत्त्वाची स्थळे : राजधानी प्रॉव्हिडन्सशिवाय राज्यात वॉरिक (लोकसंख्या १९८० : ८७,१२३), क्रॅन्स्टन (७१,९९२), पटकिट (७१,२०४), ईस्ट प्रॉव्हिडन्स (५०,९८०), वुनसॉकिट (४५,९१४), न्यूपोर्ट (२९,२५९), नॉर्थ प्रॉव्हिडन्स (२९,१८८), कंबरलँड (२७,०६९) ही प्रमुख शहरे आहेत. आकर्षक सृष्टिसौदर्य, सुंदर ऐतिहासिक स्थळे व वसाहतकालीन वास्तू, जुनी चर्च, उद्याने, पुळणी मनोरंजनाची अन्य स्थळे तसेच जलतरण, नौकाविहार, मासेमारी इत्यादींच्या सुविधांमुळे हजारो पर्यटक या राज्यातील विविध प्रेक्षणीय स्थळांना भेटी देण्यासाठी येतात. ब्लॉक बेट, नॅरागँसिट, न्यूपोर्ट, स्टोन टॉवर, मार्बल हाउस, वॉच हिल, नॉर्थ किंग्जटाउन, प्रॉव्हिडन्स ही येथील उल्लेखनीय प्रेक्षणीय स्थळे आहेत.
चौधरी, वसंत
“