रोहिश : (रोज गवत हिं. रौसा घास गु. रोश सं. रोहिष, भुतिका, सुगंधिका इं. कॅमल हे लॅ. सिबोपोगॉन शोनॅन्थस कुल-ग्रॅमिनी). एक उपयुक्त व तैलयुक्त गवत. वाळा, गुच्छ, रोशा गवत, गवती चहा इ. गवतांच्या सिंबोपोगॉन प्रजातीतील ही वनस्पती असून तिचा प्रसार मोठा आहे. या प्रजातीत सु. ६० जाती असून त्यांपैकी भारतात २० आढळतात. रोहिशचे मूळ उत्पत्तिस्थान आशिया व आफ्रिका खंडांत मोरोक्कोपासून सिंधपर्यंत असून भारतातील उष्ण भागांत रानटी स्थितीत किंवा लागवडीत ते आढळते. पंजाब ते ब्रह्मदेशपर्यंत व प. आणि द. भारतात त्रावणकोरपर्यंतही त्याचा प्रसार झालेला आढळतो. या बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणाऱ्या) व झुबक्यासारखी उगवणाऱ्या ⇨ औषधीची उंची सु. एक मीटर असते. पाने अरुंद, सु. २३ सेंमी. X १ मिमी. व सुगंधी असतात. त्यांवर तळाशी लहान केसाळ, ताठर व पापुद्र्यासारखे उपांग (जिव्हिका) असते. फुलोरा लांब, झुबकेदार आणि जमिनीतील खोडापासून [मूलक्षोडापासून ⟶ खोड] वर आलेल्या सरळ उभ्या फांदीवर असतो. तो शाखामुक्त [परिमंजरी प्रकारचा ⟶ पुष्पबंध] असून त्यावर लहान फुलोरे (कणिशके) जोडीने येतात. आकार व लिंग या दृष्टीने ती सारखी नसतात. काही बिनदेठांची कणिशके स्त्रीलिंगी किंवा उभय लिंगी असतात. पुं. व स्त्री. पुष्प एकाच झाडावर व फुलोऱ्यात असतात. एका कणिशकात एकच फूल असते व ते नर, मादी किंवा द्विलिंगी असते. फुले ऑक्टोबर ते नोव्हेंबरात येतात. त्यात दोन लघुतुषे (सूक्ष्म, मांसल तुसे) व नर फुलात ३ केसरदले असतात. किंजले दोन असतात [⟶ फूल]. याची इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ग्रॅमिनी अथवा तृणकुलात वर्णन केल्याप्रमाणे असतात. खानदेश व पंचमहाल येथे रोहिशची विशेष लागवड हलक्या जमिनीत करतात. पानांत प्रतिशत ०.४-०.८ सुगंधी तेल असते. पानांचे तेल काढतात. त्याला ‘रोशेल तेल’ म्हणतात. कोवळ्या पानांतून अधिक व चांगले तेल मिळते. ते ऊर्ध्वपातनाने काढतात. ते पिवळट व सुगंधी (गुलाबासारखे) असल्याने साबण व सुवासिक द्रव्ये बनविण्यास उपयुक्त असते. तंत्रिकाशूल व संधिवात यांवर लावण्यास ते वापरतात. गवताचा काढा सर्दी, पडसे व तापावर देतात. ही वनस्पती कडवट, जहाल व तिखट असते. ही खोकला, वेदना, हृदयविकार, घशाचे विकार व लहान मुलांचा अपस्मार इत्यादींवर उपयुक्त असल्याचे आयुर्वेदात नमूद आहे. वायूने सांधे अगर अंग दुखत असल्यास रोशेल तेल चोळतात.
संदर्भ : 1. Kirtikar, K. R. Basu, B. D. Indian Medicinal Plants, Vol. IV, New Delhi, 1975.
२. देसाई, वा. ग. ओषधीसंग्रह, मुंबई, १९७५.
३. पदे, शं. दा. वनौषधी गुणादर्श, मुंबई, १९७३.
ठोंबरे, म. वा.
“