रोस्टो, वॉल्ट व्हिटमन : (७ ऑक्टो. १९१६- ). सुविख्यात अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ. न्यूयॉर्क शहरी जन्म. लिलियन व व्हिक्टर हे आई-वडील. यूजीन हा वॉल्टचा थोरला भाऊ. त्याने वकील, अर्थशास्त्रज्ञ व सरकारी अधिकारी म्हणून विविध पदांवर कामे केली. वॉल्टने १९३६ मध्ये येल विद्यापीठातून बी.ए. पदवी प्राप्त केली त्याच विद्यापीठातून १९४० मध्ये त्याने डॉक्टरेट संपादन केली. एल्सपेथ व्हॉन डेव्हीस या युवतीशी १९४७ मध्ये वॉल्टने विवाह केला. रोस्टो दांपत्याला एक मुलगा व एक मुलगी अशी दोन अपत्ये आहेत.
वॉल्ट याने १९३६-३८ या काळात ऑक्सफर्डच्या बॅल्यल महाविद्यालयात-ऱ्होडस शिष्यवृत्ती मिळवून काम केले. कोलंबिया विद्यापीठात अर्थशास्त्र विषयाचा निदेशक म्हणून त्याने आपल्या शैक्षणिक कारकीर्दीस प्रारंभ केला. दुसऱ्या महायुद्धात वॉल्ट लष्करात मेजर होता. दुसऱ्या महायुद्धानंतर मेजर रोस्टो अमेरिकेच्या स्टेट डिपार्टमेंटमधील जर्मन-ऑस्ट्रियन आर्थिक विभागप्रमुखाचे साहाय्यक म्हणून काम करू लागले. १९४६ मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठात ‘अमेरिकन इतिहास’ या विषयाचे हार्म्सबर्थ प्राध्यापक म्हणून रोस्टो अध्यापन करू लागले. १९४७ मध्ये यूरोपीय आर्थिक आयोगाच्या कार्यकारी सचिवाचे साहाय्यक म्हणून त्यांची नियुक्ती झाली. १९५०-६१ एवढा काळ ते एम्आयटी (मॅसॅचूसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी) या जगप्रसिद्ध संस्थेत आर्थिक इतिहासाचे प्राध्यापक म्हणून काम करीत होते. पुढे १९५१-६१ या काळात त्यांनी ‘सेंटर फॉर इंटरनॅशनल स्टडीज’ या संस्थेतही काम केले.
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जॉन एफ्. केनेडी यांनी १९६१ च्या आरंभी रोस्टो यांची एका वर्षासाठी राष्ट्राध्यक्षांच्या ‘राष्ट्रीय सुरक्षा कार्यालया’चे उपविशेषाधिकारी म्हणून नेमणूक केली. त्यानंतर त्यांची स्टेट डिपार्टमेंटच्या ‘धोरण नियोजन परिषदे’चे सल्लागार व अध्यक्ष (१९६१-६६) म्हणून नियुक्ती करण्यात आली. याच काळात ते आंतर-अमेरिकन विकास कार्यक्रम समिती’चे एक सदस्य म्हणून काम करीत होते. हे कार्य करताना रोस्टोंना राजदूताचा दर्जा देण्यात आला होता. यानंतर राष्ट्राध्यक्ष लिंडन बी. जॉन्सन यांनी रोस्टो यांना व्हाइट हाउसमधील राष्ट्रीय सुरक्षा घडामोडींचा अध्यक्षीय विशेष अधिकारी म्हणून कार्यनियुक्त केले. या पदावर ते जानेवारी १९६९ पर्यंत राहिले. फेब्रुवारी १९६९ पासून रोस्टो यांनी शासकीय सेवा सोडून दिली व ते टेक्सस विद्यापीठात (ऑस्टिन) अर्थशास्त्र व इतिहास या विषयांचे प्राध्यापक म्हणून अध्यापनकार्य करीत आहेत. रोस्टो यांना ‘लीजन ऑफ मेरिट’, ग्रेट ब्रिटनचा सन्माननीय ओ. बी. ई. हा किताब, राष्ट्राध्यक्षांचे स्वातंत्र्यपदक (१९६९). इ. अनेक मानसन्मान लाभले आहेत.
अर्थशास्त्र, इतिहासवेत्ता, राजकारणपटू, राजनीतिज्ञ अशा विविध नात्यांनी रोस्टो यांनी सु. २९ ग्रंथ लिहिले आहेत. त्यांपैकी त्यांचे द प्रोसेस ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ (१९५२) व द स्टेजिस ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ (१९६०) हे दोन ग्रंथ म्हणजे अर्थशास्त्रीय साहित्यातील अभिजात कृती मानल्या जातात. व्हाय द पूअर गट रिचर अँड द रिच स्लो डाउन (१९८०), रिच कंट्रीज अँड पूअर कंट्रीज : रिफ्लेक्शन्स फ्रॉम द पास्ट, लेसन्स फॉर द फ्यूचर (१९८७), एसेज ऑन ए हाफ सेंचरी : आयडियाज, पॉलिटिक्स अँड ॲक्शन (१९८८) हे त्यांचे अलीकडचे गाजलेले ग्रंथ होत.
रोस्टो यांच्या द स्टेजिस ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ या ग्रंथामुळे अमेरिकेतच नव्हे, तर सर्वच देशांत वादविवाद निर्माण झाले. या ग्रंथामधून रोस्टोंनी अर्थव्यवस्थेच्या विकास-प्रक्रियेच्या पाच अवस्था पुढीलप्रमाणे वर्णिल्या आहेत : (१) पारंपरिक समाज, (२) उत्थानाकरिता आवश्यक असणाऱ्या गोष्टी (शर्ती), (३) उत्थान (टेक्ऑफ), (४) परिपक्वतेकडे वाटचाल व (५) प्रचंड सेवनाचा काळ. या पाच अवस्थांपैकी तिसऱ्या अवस्थेची तुलना विमानाच्या उड्डाणाशी करण्यात आली आहे. एक विशिष्ट वेग संपादन केल्यावर ज्याप्रमाणे विमान उड्डाण करायला योग्य ठरते, त्याप्रमाणे ही उत्थान अवस्था असते. रोस्टो यांच्या मताप्रमाणे सांरचनिक दृष्ट्या पारंपरिक समाज हा मर्यादित उत्पादन कार्यानिशी विकसित होत असतो. दुसऱ्या अवस्थेच्या रूपाने उत्थानासाठी आवश्यक असणाऱ्या निकषांची निर्मिती होत असते. या अवस्थेत प्रमाणित विकास साध्य केला जातो.
उत्थान अवस्था म्हणजे, रोस्टो यांच्या मते, औद्योगिक क्रांतीच असते ती उत्पादन-पद्धतींमध्ये होत जाणाऱ्या आमूलाग्र बदलांशी निगडित असते अतिशय थोड्या कालावधीमध्ये तिचे निर्णायक परिणाम दृग्गोचर होत असतात. उत्थान ही अवस्था समाजजीवनात शीघ्र विकास घडवून आणते. या अवस्थेत रुढिबद्ध विचारसरणी आणि आधुनिकीकरणाच्या प्रेरणा यांत संघर्ष चालू असतो. पारंपरिक समाजाची मूल्ये या संघर्षातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करीत असतात. परिणामी, समाजाच्या संरचनेत संयुक्त हितसंबंध निर्माण होतात.
रोस्टो यांच्या मतानुसार उत्थानासाठी परस्परांशी निगडित व आवश्यक अशा तीन अटी पूर्ण करणे आवश्यक असते : (१) राष्ट्रीय उत्पन्न वा निव्वळ राष्ट्रीय उत्पाद यांच्या पाच टक्के वा त्यांहून कमी असलेली गुंतवणूक दहा टक्क्यांवर नेणे. (२) उच्च विकासदर असलेल्या एक वा अधिक निर्मितिउद्योगांची वाढ करणे. (३) अद्ययावत क्षेत्राला पोषक अशी राजकीय, सामाजिक व संस्थात्मक चौकट उभारणे. या अटींची पूर्ती झाल्यास आधुनिक विभागांचा विस्तार होऊ शकतो व एकूणच जलद विकास साधला जाण्याची शक्यता निर्माण होते.
रोस्टो यांच्या सिद्धांतानुसार उत्थानाची प्रक्रिया भारतात १९६४-६५ साली म्हणजे तिसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या अखेरीस सुरू झाली, असे काही भारतीय अर्थशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. रोस्टो हे आर्थिक इतिहासाचे नामवंत प्राध्यापक असून त्यांच्या मते लोकसंख्यावृद्धीचा ताण, ऊर्जा समस्या तसेच भाववाढ ह्या गोष्टी अटळ आहेत. सार्वजनिक धोरणाच्या विकासाकरिता केन्सप्रणीत तत्त्वज्ञान आता उपयोगी पडणार नाही, असे त्यांचे ठाम मत आहे आणि म्हणूनच नवीन तंत्रविद्यांचा स्वीकार करण्याबाबत आपण पुढाकार घ्यावयास हवा, असे त्यांचे आग्रहाचे प्रतिपादन आहे. १९८० च्या पुढील काळात चौथ्या औद्योगिक क्रांतीचा उगम झाला असून जगातील अनेक अर्थव्यवस्था तीमधून जात आहेत, असे मत रोस्टो यांनी व्यक्त केले आहे.
गद्रे, वि. रा.
“