रोझनबेर्ख, आल्‌फ्रेट : (२२ जानेवारी १८९३-१६ ऑक्टोबर १९४६). नाझी  तत्त्वज्ञानाचा एक जर्मन पुरस्कर्ता व ॲडॉल्फ हिटलरचा घनिष्ठ सहाध्यायी. त्याच जन्म चांभाराच्या कुटुंबात एस्टोनिया या त्यावेळच्या रशियन प्रांतातील रेव्हाल (टॅलन) गावी झाला. त्याने सुरुवातीचे शिक्षण रेव्हाल इथे घेऊन मॉस्को विद्यापीठात वास्तुशास्त्राच्या अभ्यासास प्रारंभ केला, पण अर्धवट शिक्षण सोडून तो रेव्हाल येथे पुन्हा शिक्षक म्हणून १९१९ पर्यत काम करीत होता. क्रांतिविरोधी कृत्यांबद्दल त्याला अटक करण्याचा हुकूम निघाल्यानंतर तो म्यूनिकला (जर्मनी) पळून गेला आणि नाझी पक्षात सामील झाला. हिटलरशी त्याची मैत्री झाली आणि पक्षाच्या मुखपत्राच्या संपादकपदी त्याची नियुक्ती करण्यात आली. हिटलरला १९२३ मध्ये राष्ट्रविरोधी कारवायांत कारावासात जावे लागले. तेव्हा पक्षाचा तो तात्पुरता प्रमुख झाला. त्याने द फ्यूचर डायरेक्शन ऑफ जर्मन फॉरिन पॉलिसी (इं. भा. १९२७) हे पुस्तक लिहून पोलंड व रशियावरील आक्रमणांचा पुरस्कार केला. नंतर त्या Der mythus des 20 Jahrhunderts (१९३०), द मिथ ऑफ ट्‍वेटिएथ सेंचरी-(इं. भा. १९३४) हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामुळे त्याची पक्षांतर्गत लोकप्रियता वाढली व हिटलरच्या सेमिटिक-ज्यू-द्वेषाला त्यामुळे तात्त्विक अधिष्ठान प्राप्त झाले. या ग्रंथात त्याने जर्मन नॉर्डिक वंशाच्या रक्तशुद्धतेचा दावा केला असून हा वंशच यूरोपवर अधिसत्ता गाजविण्यास लायक आहे, असे मत मांडले. शिवाय रशियन, तार्तर व सेमिटिक वंशाचे लोक हे जर्मनांचे कट्टर शत्रू आहेत. त्यामुळे नाझी पक्षाच्या तत्त्वज्ञानाचे कार्य त्याच्याकडे दिले गेले. पक्षाच्या परराष्ट्र खात्याचे त्याला मुख्य चिटणीस नेमण्यात आले (१९३३). नाझी पक्ष सत्तारुढ झाल्यावर त्याच्याकडे परराष्ट्र खाते देण्यात आले. त्याच्या परराष्ट्रीय धोरणाचे मूलतत्त्व कम्युनिस्ट विरोध हे होते. दुसरे महायुद्ध सुरू होण्याआधी ते हिटलरने स्वतःकडे घेतले. परंतु तरीही रोझनबेर्खच्या व्यक्तिमत्त्वाचा परिणाम त्यावर थोडाफार तरी झालाच. दुसऱ्या महायुद्धानंतर त्यास अटक करण्यात आली आणि न्यूरेंबर्गच्या खटल्यात युद्धगुन्हेगार म्हणून त्याची चौकशी होऊन त्यास न्यूरेंबर्ग येथे फाशीची सजा देण्यात आली. त्याचे स्फुटलेख आणि भाषणे Blut and Ehre (ब्‍लड अँड ऑनर, इं. भा. १९३४-४१) या शीर्षकाने चार खंडांत प्रसिद्ध झाली आहेत.

संदर्भ : Cecil, Robert, The Myth of the Master Race, New York, 1972.  

देशपांडे, अरविंद