राधनपूर संस्थान : ब्रिटिशांकित हिंदुस्थानातील गुजरात राज्यातील पूर्वीच्या पालनपूर एजंसीमधील एक संस्थान. क्षेत्रफळ २,९४४ चौ. किमी. लोकसंख्या ६७,६९१ (१९४१) वार्षिक उत्पन्न सु. साडेदहा लाख रुपये. उत्तरेस मोरवाडा-तेरवाडा, पूर्वेस बडोदे संस्थान, पश्चिमेस वाराही व पालनपूर ही संस्थाने व दक्षिणेस अहमदाबाद जिल्हा व काठेवाडातील झिंझूवाडा यांनी सीमित. यात राधनपूर शहर व १५९ खेडी समाविष्ट होती. राधनपूर हे नाव सहाव्या शतकातील राधनदेव चावडावरून पडले असावे, असे एक मत आहे तर काही विद्वान गुजरातच्या सुलतानाचा या भागातील जहागीरदार राधनखानवरून ते पडले असे मानतात. हुमायूनबरोबर भारतात आलेल्या बाबी वंशातील जाफरखानने १६९६ मध्ये औरंगजेबाकडून राधनपूर, समी, मुंजपूर व तेरवाडा यांची फौजदारी मिळविली. त्याला सफदरखान हे बिरुद देण्यात आले. नंतर त्यात गुजरातमधील विजापूर (१७०४) व पाटणची (१७०६) भर पडली. बाबी वारसांकडे मोगलांनी राज्यपालाचे अधिकार दिले. जाफरखानचा नातू कमालुद्दीनने मोगल सत्तेला उतरती कळा लागलेली पाहून अहमदाबादही बळकावले पण १७५३ मध्ये राघोबादादा आणि दमाजी गायकवाड यांनी कमालुद्दीनचा पराभव केला व नंतर त्याच्या कडे फक्त मूळची जहागीर ठेवून उरलेला भाग बडोद्याला जोडला. १८१३ मध्ये इंग्रजांनी बडोद्याची राधनपूरवरील अधिसत्ता मान्य केली, पण १८२० मध्ये सिंधमधील खोसा जमातीचे हल्ले परतवून संस्थानाकडून त्या मोबदल्यात रु. १७,००० खंडणी घ्यायला सुरुवात केली. पुढे पाच वर्षांनी ती रद्द केली. नबाबाला अकरा तोफांच्या सलामीचा मान असून न्यायदानाचे पूर्णाधिकार होते. तसेच इस्लामी विधीनुसार संस्थानास ज्येष्ठतेप्रमाणे वारसा ठरविण्याची सनद ब्रिटिशांनी दिली होते. नरेंद्रमंडळाचाही संस्थानिक सदस्य असे. कच्छ-गुजरातचे व्यापारी केंद्र म्हणून राधनपूरचे त्यावेळी महत्त्व होते. विसाव्या शतकात चोवीस प्राथमिक-माध्यमिक विद्यालये होती आणि संस्थानची सहा रुग्णालये होती. यांशिवाय खासगी सैन्यही होते. १९४८ मध्ये संस्थान मुंबई राज्यात आणि १ मे १९६० पासून गुजरात राज्यात विलीन झाले.

कुलकर्णी, ना. ह.