भोपाळ संस्थान: ब्रिटिशांकित हिंदुस्थानातील विद्यमान मध्य प्रदेश राज्यातील एक संस्थान. क्षेत्रफळ १७,७२५.४४ चौ. किमी. लोकसंख्या सु. साडेसात लाख (१९४१). वार्षिक उत्पन्न जहागीरदारांचे धरून रु. ८० लाख. उत्तरेस ग्वाल्हेर, नरसिंहगढ-बासोडा, कोरवई-मधुसूदनगढ-टोंक संस्थाने पूर्वेस सागर-नरसिंगपूर जिल्हे दक्षिणेस नर्मदा नदी, पश्चिमेस ग्वाल्हेर व नरसिंहगढ संस्थानांचा काही भाग यांनी ते सीमित होते. त्यात पाच शहरे असून ३,०७३ खेडी होती. अठराव्या शतकाच्या सुरुवातीस नोकरीसाठी दिल्लीला आलेल्या दोस्त मुहम्मदखान याला बेरासिया परगण्याची मामलत मिळाली. त्यामुळे त्याने इस्लामनगर व भोपाळ ही शहरे वसवून व फतेगढचा किल्ला बांधून राज्यविस्तार केला. त्याच्या मृत्यूनंतर (१७४०) निजामाकडे ओलीस असलेला त्याचा अनौरस मुलगा यार मुहम्मदने नवाबी मिळवली. त्याच्या मृत्यूनंतर (१७५४) भाईजीराम या हिंदू दिवाणाने उत्तम कारभार केला पण पेशव्यांनी पूर्वीच माळवा कायम जिंकल्याने संस्थान अर्धेच राहिले. यार मुहम्मदनंतर प्रथम त्याचा थोरला मुलगा फैज मुहम्मद गादीवर आला. त्यांनतर धाकटा मुलगा हयात मुहम्मदखान (कार. १७७७-१८०७) संस्थानच्या गादीवर आला. याच्या कारकीर्दीत यार मुहम्मदची विधवा मामूल्लाह हिचा राजकारणावर प्रभाव होता. दिवाण वझीर मुहम्मदखानने अठराव्या शतकाच्या अखेरीस संस्थान सावरून धरले व हयात मुहम्मदचा त्रासदायक मुलगा गौसखान याला दाद दिली नाही. त्यामुळे त्याच्या मृत्यूनंतर (१८१६) गादी त्याच्या वंशजांकडे गेली. १८१८ मध्ये संस्थानने इंग्रजांची मांडलिकी पतकरली व सर्वतोपरी मदतीचे वचन दिले. तेव्हा त्या मोबदल्यात देविपुरा, अष्टा, सिहोरी, दुराह आणि इच्छावार हे परगणे व इस्लामनगरचा किल्ला संस्थानला मिळाला. १८५७ च्या उठावात केलेल्या मदतीबद्दल इंग्रजांनी धार दरबारकडून जप्त केलेला बेलासिया परगणाही भोपाळला बहाल केला. एकोणिसाव्या शतकात संस्थानचा कारभार अनुक्रमे कुदसिया, सिकंदर आणि शाहजहाँन या बेगमांच्या हाती होता. विसाव्या शतकाच्या सुरुवातीस गादीवर आलेल्या सुलतानजहाँ बेगमने १९२६ मध्ये स्वेच्छेने पदत्याग केला. त्यामुळे तिचा मुलगा हमिदुल्लाखान गादीवर आला. बेगमांच्या कारकीदींत रेल्वे, डाक-तार, वन संरक्षण, पक्क्या सडका, मोफत शिक्षण, आरोग्य, खातेवार शासन व्यवस्था अशा अनेक क्षेत्रांत सुधारणा झाल्या, संस्थान इंग्रजांना रु. १,६१,२९० खंडणी देई. शासनासाठी शुमाल, मश्‍रिक, जुनूब आणि मगरिब (उत्तर, पूर्व, दक्षिण व पश्चिम) अशा चार निजामतींत संस्थान विभागले होते. खुद्द भोपाळ शहर सोडले, तर बहुसंख्य प्रजा हिंदूच होती. १९४७ मध्ये संस्थान भारतात विलीन झाले. १९५० मध्ये त्याला ‘क’ राज्याचा दर्जा देण्यात आला. १ नोव्हेंबर १९५६ पासून ते मध्य प्रदेश राज्याचा भाग बनले आणि भोपाळ त्याची राजधानी झाली.

कुलकर्णी, ना. ह.