रेवदंडा :महाराष्ट्र राज्याच्या रायगड जिल्ह्यातील एक इतिहासप्रसिद्ध बंदर. हे अलिबाग तालुक्यात चौलच्या नैर्ऋत्येस रेवदंडा खाडीच्या मुखाशी वसलेले असून पूर्वी ‘खालचे चौल’ म्हणून ते ओळखले जात होते [⟶ चौल]. सांप्रत रेवदंडा व चौल ही दोन वेगवेगळी गावे आहेत. लोकसंख्या ७,२४६ (१९८१).

पूर्वीच्या अष्टागरांपैकी हे एक असावे असे मानले जाते. इ. स. सहाव्या शतकाअखेरील बादामीच्या चालुक्यांपैकी मंगलेश राजाने रेवतींद्वीप जिंकल्याचा उल्लेख ऐहोळेच्या शिलालेखात आढळतो. ते द्वीप म्हणजेच रेवदंडाक्षेत्र अथवा चंपावती (चौल) असावे असे म्हणतात. सोळाव्या शतकात पोर्तुगीजांनी याचा व्यापारी बंदर म्हणून खूपच विकास केला होता. परंतु कालांतराने गाळ साचल्याने व धरमतर बंदराच्या विकासामुळे, तसेच धरमतर खाडीवर बांधण्यात आलेल्या पुलामुळे रेवदंड्याचे व्यापारी महत्त्व कमी झाले. सांप्रत याला जिल्ह्यातील मोठ्या गावाचा दर्जा देण्यात आला असून येथून लहान नावा व होड्या यांमधून वाहतूक चालते. या बंदरातून मुख्यतः नारळ व मासे यांची निर्यात होते. गावात बँका, सार्वजनिक ग्रंथालय, दवाखाने, चित्रपटगृह व माध्यमिक शिक्षणापर्यंतच्या सुविधा उपलब्ध असून येथील ‘आगरकोट’ नावाचा किल्ला प्रसिद्ध आहे. 

चौंडे, मा. ल.