राम गोपाल : (२० नोव्हेंबर १९१७ –). प्रख्यात भारतीय नर्तक. बंगलोर येथे जन्म. त्यांचे वडील अजमीरमध्ये वकील होते आणि आई ब्रह्मदेशातील होती. बालपणापासूनच राम गोपाल यांचा कल नृत्याकडे होता. परंतु तत्कालीन प्रतिष्ठेच्या रूढ कल्पनांनुसार वडिलांना आपल्या मुलाचे नृत्यप्रेम नापसंत होते. तथापि अशा विरोधी वातावरणातही राम गोपाल यांनी बालपणी एकलव्याच्या निष्ठेने ध्वनिमुद्रि
कांवरून नृत्य शिकण्याचा प्रयत्न केला. अशा अखंड परिश्रमांतूनच पुढे त्यांनी स्वतंत्र नृत्यप्रयोग सादर करण्यास सुरूवात केली. त्यांच्यातील कलेचे हे उत्स्फूर्त बीज पाहून म्हैसूरच्या युवराजांनी त्यांना आपल्या दरबारी आश्रय दिला. त्यानंतर त्यांनी सुप्रसिद्ध नृत्यगुरू कुंचू कुरूप ह्यांच्याकडे कथकळी, मीनाक्षीसुंदरम् पिळ्ळै यांच्याकडे भरतनाट्यम्, मिश्रांकडे कथ्थक व नबकुमार यांच्याकडे मणिपुरी या विविध नृत्यशैलींचे शिक्षण घेतले. बंगलोर येथे १९३५ मध्ये त्यांनी स्वतःच्या नृत्यसंस्थेची स्थापना केली. ला मेरी या अमेरिकन नर्तनकीने त्यांची नृत्यातील जोडीदार म्हणून निवड केली आणि तिच्याबरोबर त्यांनी जागतिक दौरे केले (१९३७ – ३९).
राम गोपाल ह्यांनी नृत्यनाट्यांच्या परिणामकारक प्रयोगासाठी डोळसपणे व चिकित्सक दृष्टीने रंगभूमीची आधुनिक तंत्रे आत्मसात केली. त्यासाठी त्यांनी अतोनात परिश्रम घेतले. रंगमंचावरील सुविहित व्यवस्था व रंगमंचाची अद्ययावत सजावट ह्यांकडे बारकाईने लक्ष पुरविले. प्रकाशयोजना, बंदिस्त हालचाली, सुयोग्य विवरण इ. रंगभूमीची विविध अंगे त्यांनी भारतीय नृत्यप्रयोगांत समाविष्ट केली. आधुनिक प्रसिद्धी-माध्यमांचा त्यांनी सुयोग्य उपयोग करून घेतला. परंपरागत वेशभूषा वर्ज्य मानून त्यांनी नवीन, सूचक व आकर्षक अशी वेशभूषा नृत्यात आणली. नृत्ये व नृत्यनाट्ये सादर करण्याचे पाश्चात्य तंत्र त्यांनी आत्मसात केले होते. ह्या सर्व नवीन तंत्रप्रयोगांचा वापर करून त्यांनी अमाप प्रसिद्धी व कीर्ती मिळविली. त्यांनी इंग्लंड, अमेरिका येथे वारंवार दौरे केले. एडिंबरे येथील महोत्सवात त्यांनी नृत्यनाट्य सादर केले (१९५६). राष्ट्रकुल कला-महोत्सवात भाग घेतला (१९६५). त्यांनी १९६२ मध्ये लंडन येथे भारतीय नृत्य व संगीताची अकॅडमी स्थापन केली व तेथेच ते स्थायिक झाले आहेत. त्यांनी सादर केलेल्या नृत्यनाट्यांत पुढील नृत्यनाट्ये उत्कृष्ट गणली जातात : डान्सेस ऑफ इंडिया, लेजंड ऑफ ताजमहाल, डान्स ऑफ द सेटिंग सन इत्यादी. ह्या नृत्यनाट्यांच्या आकृतिबंधांत त्यांनी त्यांच्या कथकळी व भरतनाट्यम् नृत्यांच्या ज्ञानाचा कुशलतेने उपयोग करून घेतला.
सामान्यतः भरतनाट्यम् हे स्त्रियांचे नृत्य मानले जात असले, तरी राम गोपाल ह्यांनी असामान्य प्रावीण्य मिळविले. लवचिक, सुडौल शरीर व प्रसन्न व्यक्तिमत्व या नैसर्गिक गुणांना त्यांनी कल्पकता व अखंड परिश्रम ह्यांची जोड दिली आणि भरतनाट्यम्मधील एकमेवाद्वितीय पुरुष कलाकार अशी मान्यता मिळविली.
विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात, हीन गणल्या गेलेल्या भारतीय नृत्यास पाश्चात्य नृत्यव्यासंगाची जोड देऊन ज्या नर्तकांनी पारंपरिक भारतीय नृत्य आगळ्या नाविन्यपूर्ण रूपात मांडण्याचा प्रयत्न केला आणि त्यास आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा मिळवून दिली त्यांत राम गोपाल ह्यांचे स्थान उच्च दर्जाचे आहे. उदय शंकर, मेनका व राम गोपाल ह्यांनी भारतीय नृत्य जागतिक रंगमंचावर नेले व त्याला रशियन बॅले खालोखाल जागतिक कीर्ती मिळवून दिली. ऱ्हिदम इन द हेवन्स हे आत्मचरित्रपर पुस्तक त्यांनी लिहिले आहे. प्रसिद्ध फ्रेंच दिग्दर्शिका मादाम क्लॉद ला मॉरिस ह्यांनी राम गोपाल ह्यांच्यावर दोन अनुबोधपट तयार केले आहेत.
संदर्भ : Ambrose, Kay, Classical Dances and Costumes of India, London, 1957.
वडगावकर, सुरेंद्र
“